अग्रलेख  : सामूहिक सत्त्वपरीक्षा

Coronavirus
Coronavirus

भारतातील अर्धी-अधिक जनता कोरोना विषाणूच्या धास्तीमुळे आपापल्या घरांत ठाणबंद झाली असतानाच, देशाची आर्थिक राजधानी म्हणून जगभरात प्रतिष्ठा पावलेल्या मुंबापुरीत या रोगाने एक बळी घेतला आहे. संबंधित रुग्णाला आणखीही काही विकार होते आणि त्यामुळे त्याची प्रतिकारशक्‍ती बऱ्यापैकी कमी झालेली असणार. कोरोना विषाणूच्या देशातील बळींची संख्या आता तीन झाली असून, महाराष्ट्रात या बळींचे लोण पोचल्याने राज्यभरातील जनतेत घबराट निर्माण झाल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय, तसेच अन्य रुग्णालयांत या विषाणूची आपल्याला लागण होईल काय, याची चिंता न करता डॉक्‍टर आणि त्यांचे सहकारी जीव ओतून काम करीत आहेत. त्यामुळे धीर न सोडता जनतेने आपापल्या कामांत व्यग्र राहतानाच पुरेशी काळजी घेणे आवश्‍यक आहे. ही काळजी नेमकी कशी घ्यावी, यासंबंधात केंद्र व राज्य सरकारने हाती घेतलेली जनजागृती मोहीम, तसेच या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून योजलेल्या नानाविध उपायांमुळेच भारतात हा रोग जगभरातील काही देशांमध्ये ज्या वेगाने फैलावत आहे; त्या तुलनेत बराच नियंत्रणाखाली आहे, असे म्हणता येते.

या पार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) व्यक्‍त केलेला ताजा अभिप्राय महत्त्वाचा आहे. या रोगापेक्षाही जनतेच्या मनात त्यामुळे निर्माण झालेली भीती अधिक मोठी असली, तरीही समाजापासून फटकून राहण्याची गरज नाही, असे या इशाऱ्यात नमूद करण्यात आले आहे. यातील मर्म ओळखून त्यानुसार वागायला हवे. आपल्याकडे काही ठिकाणी निव्वळ संशयावरून एखाद्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार घडताहेत. तसे करणे बरोबर नाही. काळजी घेणे आवश्‍यकच आहे; परंतु काळजी घेणे आणि घबराट माजवणे, यात फरक असतो. ‘कोरोना’बाबतच्या ‘ब्रेकिंग न्यूज’साठी इलेक्‍ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये पसरलेली ‘साथ’ हीदेखील घातक म्हटली पाहिजे. एकूणच, या आपत्तीच्या काळात सामूहिक विवेकशक्तीची कसोटी आहे. त्याच बळावर त्यावर मात करता येईल. सरकार पावले उचलीत असले, तरी त्यातील लोकसहभाग कसा व किती, यावर यशापयश ठरणार आहे. अचूक माहिती लोकांपर्यंत पोचणे ही बाब कळीची आहे. याबाबतीत प्रसिद्धिमाध्यमे; विशेषतः समाजमाध्यमे यांतून सत्यापलाप करणारी माहिती पसरणार नाही, याची काळजी घेतली जावी. पडताळून पाहिल्याशिवाय कोणतीही माहिती पुढे ढकलता कामा नये. ‘कोरोना’ची लागण झालेल्या वा त्यामुळे मृत्यू पावलेल्यांची नावे जाहीर करू नयेत, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. त्यानंतर आता स्वत:हून समाजापासून विलगीकरणाची आवश्‍यकता असलेल्यांच्या हातावर शिक्‍के मारण्याचा मुंबई महापालिकेने घेतलेला निर्णय हा संबंधितांची ओळख अधोरेखित करणारा आहे. पण, हातावर शिक्‍का आहे म्हणजे लगेच ती व्यक्ती ‘कोरोनाग्रस्त’ झाली, असे नाही. या सर्व बाबी नीट लक्षात घ्यायला हव्यात.

सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र सरकार, तसेच आरोग्य सेवा राबविणाऱ्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी अधिकच वाढली आहे. पण, सगळीच जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. मुंबईतील रुग्णाच्या रूपाने या विषाणूने राज्यात पहिला बळी घेतला आहे आणि त्याशिवाय मुंबई महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रात या विषाणूची लागण आणखी किमान पाच जणांना झाल्याचे वृत्त आहे. कल्याण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नगर, यवतमाळ येथेही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संकटाची व्याप्ती केवळ विशिष्ट भागात आहे, असे म्हणता येणार नाही. काही दिवस तरी अखंड सावधानतेला पर्याय नाही. मुंबई परिसरात अनेक परदेशी नागरिकांचा मुक्‍त संचार सुरू आहे. हे परदेशी नागरिक नेमके कधी आणि कोणत्या देशांतून आले आहेत, याची खातरजमा करून घेण्याची गरज आहे. आपला देश सध्या ‘कोरोना’च्या संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे आणि तो पुढच्या टप्प्यात जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याकरिता आपल्या हातात तीस दिवसांचा अवधी आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकार करीत असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी पूर्ण सहकार्य करण्याची गरज आहे. स्वच्छतेच्या सवयी, सार्वजनिक शिस्त, संयम, परस्परांना सहकार्य, स्वयंसेवी संस्था आणि सरकार यांच्यातील समन्वय, या सर्वच बाबी आत्ताच्या घडीला महत्त्वाच्या ठरणार आहेत. संकटाला यशस्वीरीत्या तोंड देणे त्याआधारेच शक्‍य होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com