अग्रलेख : सत्तातुरांच्या कसरती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

शिवसेना येत्या दहा तारखेस गुजराती भाषिकांचा मेळावा आयोजित करणार असून,त्यासाठी ‘मुंबई मा जलेबी फाफडा;उद्धव ठाकरे आपडा!’ अशी घोषणाही दिली आहे.ही घोषणा जितकी आकर्षक आहे, तितकेच हे गुजरातीप्रेम फसवे आहे.

सत्तेसाठी हव्या तशा तडजोडी करणे, ही शिवसेनेच्या राजकारणाची शैलीच झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आयोजिलेला गुजराती भाषिकांचा मेळावा हे त्याचे ताजे उदाहरण. इतर पक्षही अशा तडजोडींमध्ये मागे नाहीत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महाराष्ट्रात सध्या बोचऱ्या थंडीचे शीतल वारे वाहत असले, तरी प्रत्यक्षात राजकारणात मात्र गरमागरमी सुरू झाली आहे! खरे तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहायला हवे; प्रत्यक्षात रणधुमाळी तसेच सुंदोपसुंदी सुरू झाली आहे ती मुंबई तसेच औरंगाबाद महापालिकांच्या निवडणुकीवरून. बादशहाचा प्राण जसा पिंजऱ्यातील पोपटात होता, तसंच शिवसेनेचा प्राण हा मुंबई महापालिकेतील सत्तेत आहे, हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व ताकदीनिशी शिवसेनेला ‘लक्ष्य’ केले आहे. तर त्याचवेळी शिवसेनेनेही ‘महाविकास आघाडी’च्या सर्वसमावेशक धोरणाला अनुसुरून आपला एकेकाळचा ‘बाणा’ आवरता घेऊन चक्क गुजराती भाषिकांना गोंजारावयास सुरुवात केली आहे. शिवसेना येत्या दहा तारखेस गुजराती भाषिकांचा मेळावा आयोजित करणार असून, त्यासाठी ‘मुंबई मा जलेबी फाफडा; उद्धव ठाकरे आपडा!’  अशी घोषणाही दिली आहे. ही घोषणा जितकी आकर्षक आहे, तितकेच हे गुजरातीप्रेम फसवे आहे.  मात्र, असेच फसवे डावपेच भाजपनेही औरंगाबादच्या नामांतराच्या प्रश्नावरून आखले आहेत. महाराष्ट्रात १५ वर्षांनंतर राज्यात पुनश्‍च भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले होते, त्यावेळी यासंदर्भात मिठाची गुळणी घेऊन बसलेल्या भाजपने आता हा विषय तापवायला सुरुवात केली आहे. गुजराती भाषिकांना ‘आवो मारे गुज्जूभाई!’ म्हणून आवतण देणे, जितके सवंग पद्धतीचे राजकारण आहे, तेवढेच भाजपने हा नामांतराचा विषय ऐरणीवर आणणे ढोंगीपणाची साक्ष आहे. औरंगाबादचे नामांतर कितीही हवे असले, तरी काँग्रेसचा त्यास विरोध असल्याने, शिवसेनेला आता राज्यातील सत्तेपोटी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून स्वस्थ बसणे भाग पडले आहे. त्यामुळेच त्या पक्षाला कोंडीत पकडण्याची संधी भाजप घेत आहे. या साऱ्या राजकारणाचा अर्थ शिवसेना असो की काँग्रेस की भाजप; सर्वांनाच आपापल्या मतपेढ्या जपायच्या आहेत, एवढ्यापुरताच मर्यादित आहे. मात्र, त्यामुळे राज्याच्या विकासात कोणत्याच पक्षाला रस नसून केवळ सत्ताकारणच सध्या कसे सुरू आहे, यावर लख्ख प्रकाश पडला आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करा, अशी मागणी खरे तर १९९०च्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या महापालिकेची निवडणूक पहिल्यांदा लढवताना करून, तेथील हिंदू तसेच मराठी मतदारांच्या अस्मितेला साद घातली होती. त्यानंतर १९९५मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकारही राज्यात आले आणि तसा रीतसर प्रस्तावही सादर झाला. मात्र, तो न्यायालयाच्या चावडीवर रेंगाळला आणि नामांतर झालेच नाही. अर्थात, त्यापलीकडची बाब ही राज्याच्या सत्तेपोटी शिवसेनेला आपल्या भूमिका किती वेळा बदलायला लागल्या ही आहे. सत्ताग्रहण करताच महिनाभरात नागपूरला झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातच उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेनेने राजकारणाची धर्माशी घातलेली सांगड ही आमची मोठी चूक होती,’ अशी जाहीर कबुली दिली होती. तरीही काँग्रेस नेते शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत प्रश्न उपस्थित करत राहिले आणि नेमक्‍या याच संधीचा फायदा उठवत भाजपने शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी असल्याचे टीकास्त्र सोडले. तेव्हा उद्धव यांनी थेट अयोध्येत जाऊन दाशरथी रामाची आळवणी केली! मात्र, त्याचवेळी काँग्रेसने आणखी प्रश्न उपस्थित करू नयेत, म्हणून महाराष्ट्रात मात्र ‘सेक्‍युलर’ बुरखा घेणे शिवसेनेला भाग पडत होते. त्याचा स्फोट अखेरीस शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात झाला आणि आपल्या कट्टर हिंदुत्वाची जाणीव उद्धव ठाकरे यांनी जहाल शब्दांत करून दिली. हेही आपली मतपेढी जपण्यासाठीच होते. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने त्यास आक्षेपही घेतला खरा; मात्र, राज्याच्या सत्तेतील चतकोर-नितकोर वाट्याचा मोह काँग्रेसलाही असल्याने ही सुंदोपसुंदी शाब्दिक लढायांपुरतीच मर्यादित राहिली. आता शिवसेनेच्या ताब्यात गेली दोन दशके असलेली मुंबई महापालिका हिसकावून घेण्यास भाजप आतूर झाल्याने ऐन थंडीत ही राजकीय गरमागरमी सुरू झाली आहे. आजवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या आश्रयाने मिळेल तेवढ्या जागा पदरात पाडून घेण्यावर समाधान मानणाऱ्या भाजपने २०१७मध्ये शिवसेनेच्या विरोधात जोरदार लढत दिली. तेव्हा प्रथमच भाजपने शिवसेनेच्या बरोबरीने, म्हणजेच ऐंशीहून अधिक जागा जिंकल्या. तरीही राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेची सोबत आवश्‍यक असल्याने ३५-४०हजार कोटींची पालिका शिवसेनेला आंदण देणे, भाजपला भाग पडले होते.

शिवसेनेला या राजकीय कोलांटउड्या मारणे, सध्या भाग पडत असले तरी २००३मध्ये शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख झाल्याबरोबरच उद्धव यांनी ‘मराठी’ या शिवसेनेच्या तोपावेतोच्या भूमिकेपुढे जाऊन, ‘मी मुंबईकर’ अशी घोषणा दिली होती. शिवसेनेने त्यानंतरच उत्तर भारतीयांचे मेळावेही आयोजित केले आणि ‘छठ पूजा’ही केली होती. आताच्या ‘मुंबई मा जिलेबी फाफडा’ या घोषणेमागे राजकारण आहेच; तरी खरे तर ‘मी मुंबईकर’ या भूमिकेशी ते सुसंगतच आहे. पण प्रश्‍न असा आहे, की हे आत्ता अचान का आठवले?  ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा ‘खेळ’ नव्याने सुरू झाल्याने त्यास राजकीय रंग येणे अपरिहार्य आहे. शिवाय, त्यामुळेच सत्तेपोटी राज्यातील राजकारण कोणत्या थराला जाऊ शकते, त्याचीही प्रचीती आली आहे. शिवाय, आपापल्या मतपेढ्यांच्या लांगूलचालनात कोणताच पक्ष मागे कसा नाही, तेही उघड झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article about political shivsena Mumbai Municipal Corporation elections