mamta-banerjee
mamta-banerjee

अग्रलेख : हल्ल्याचे गौडबंगाल!

पश्चिम बंगालमध्ये गेले दहा वर्षें असलेले तृणमूल काँग्रेसचे राज्य ममता बॅनर्जी यांच्या हातातून हिसकावून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला घमासान संघर्ष हा अक्षरश: हातघाईवर येऊन ठेपल्याचे बुधवारी नंदीग्राममध्ये ममतादीदींवरच झालेल्या ‘हल्ल्या’मुळे समोर आले आहे. खरे तर बंगाल हा विचारकलहासाठी प्रसिद्ध असलेला प्रांत. तेथे एकोणिसाव्या शतकापासूनच अशा अनेक लढाया खेळल्या गेल्या आहेत. अलीकडच्या काळात हा प्रांत त्यापासून बराच दूर गेला आहे, हे निवडणुकीत ज्या प्रकारचे विषय, ज्या पद्धतीने मांडले जात आहेत, त्यावरून स्पष्ट होते. त्या प्रचाराला ध्रुवीकरणाची धार आहे. प्रथम त्याचे स्वरूप स्थानिक विरुद्ध उपरे, असे होते. पुढे त्यास हिंदू विरुद्ध इतर असे रूपडे बहाल करण्यात येऊन ध्रुवीकरणाचा डाव मांडला गेला आणि अखेरीस त्या लढाईला साक्षात प्रभू रामचंद्र विरुद्ध दुर्गामाता असे वळणही देण्यापर्यंत मजल गेली. ही सर्व चर्चा सुरू असतानाच, मैदानी लढत हातापायीवर येत होतीच आणि बंगाली जनतेलाही निवडणूक म्हटले की अशा प्रकारच्या थोड्याफार हिंसाचाराची सवय ही मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्षानेही लावली आहेच! मात्र, या हिंसाचाराची मजल थेट ममतादीदींवर ‘हल्ला’ करण्यात होईल, याची कोणालाच कल्पना नसणार. ‘झेड’ दर्जाची सुरक्षा असलेल्या नेत्यावर अशा प्रकारचा हल्ला  होऊ शकतो, यावरूनच बंगालमध्ये एकंदरित कायदा तसेच सुव्यवस्था कोणत्या स्तराला जाऊन पोचली आहे, तेच बघावयास मिळाले. मात्र, त्यामुळेच केवळ भाजपच नव्हे तर काँग्रेसनेही हा ‘हल्ला’ झालाच नसून, ही निव्वळ मतांच्या बेगमीसाठी सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेली पटकथा असल्याचा आरोप केला आहे.

ममतादीदींनीही आता ‘व्हीलचेअर’वरून प्रचाराचा निर्णय घेतला आहे. मात्र, या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आज कोठेही साधी टाचणी पडली तरी त्या घटनेचे व्हीडिओ लगोलग व्हायरल होण्याच्या काळात, ममतादीदींवर झालेल्या या हल्ल्याचे फुटेज मात्र मिळत नाही. त्यामुळे या घटनेबाबत उभे राहिलेल्या गूढाचे निराकारण करण्यासाठी या घटनेची चौकशी होण्याची नितांत गरज आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या ‘हल्ल्या’च्या बातमीनंतर, या निवडणुकीचे अवघे ‘नॅरेटिव्ह’च बदलून गेले असून, आता ‘हल्ला’ झाला की नाही, यावरूनच वितंडवाद सुरू झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीवर झालेल्या या अशा प्रकारच्या ‘हल्ल्या’ची चौकशी व्हायला हवी, यात शंकाच नाही. मात्र, तृणमूल काँग्रेसलाही चौकशी हवी असली तरी ती हा हल्ला कोणी केला याचा शोध घेण्यासाठी! तर भाजपला चौकशी हवी आहे, ती हा हल्ला खरोखरच झाला होता नाही, हे तपासून पाहण्यासाठी. त्यामुळेच या चौकशीनाट्याच्या मागणीला अर्थातच अनेक पदर आहेत. भाजपने ही चौकशी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘सीबीआय’मार्फत व्हावी, अशी मागणी थेट निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या म्हणण्यानुसार निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही निवडणूक आयोगाचीच असते. त्यातच या आयोगाने ममतादीदींवरील हल्ल्याच्या चार दिवस आधीच पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे फर्मान जारी केले होते. त्यामुळे आता जे काही घडले वा भाजपचा दावा खरा मानला तर, रचण्यात आले, त्यापासून निवडणूक आयोगाला हात झटकून मोकळे होता येणार नाही. 
आयोगानेही आता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, तीन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून या घटनेसंबंधात अहवाल मागवले आहे. ते आले तरी त्यानंतर दोन्ही बाजूंकडून पुन्हा राजकीय धुरळा उडवला जाईलच. त्यामुळेच आता पुढची सारी निवडणूक याच घटनेभोवती भिरभिरत राहणार आणि संशयाचे वातावरण कायम ठेवण्यासाठी या हल्ल्याचे गौडबंगाल हे गुलदस्त्यातच राहणार, अशीच सध्याची चिन्हे आहेत. मात्र, या घटनेमुळे बंगालातील आधीच तापलेले वातावरण अधिकच भडकत जाणार, यात शंका नाही. तृणमूल काँग्रेस असो की भाजप वा डावे आणि काँग्रेसची तथाकथित आघाडी असो; या साऱ्यांनाच या संशयाचा आपापल्या बाजूंनी फायदा उठवायचा आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता या निवडणुकीतही भडकलेल्या इंधनदराचा प्रश्न असो की बंगालच्या विकासाचा, ते प्रचाराच्या एकूण अवकाशात कोपऱ्यात ढकलले जातील, अशी शक्यता आहे. 

आता यापुढच्या काळात अवघ्या बंगाललाच नव्हे तर देशालाही ‘व्हीलचेअर’वरील रणरागिणी या स्वरूपात ममतादीदींचे दर्शन होणार आहे! राजकारणातील प्रतीकांचा वापर अलीकडे मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. भाजप यात माहीर आहेच. त्या पक्षाला तसेच उत्तर देण्याइतका खमकेपणा ममतादीदींकडे असल्याने झाल्या प्रकारचा त्या पुरेपूर राजकीय फायदा उठवणार, यात शंका नाही. तृणमूल काँग्रेसने आपल्या दहा वर्षांच्या राजवटीत बंगालला केवळ आर्थिकच नव्हे तर बहुतेक क्षेत्रांत पांगळे करून सोडल्याचे आरोप भाजप करत असतानाच, ममतादीदींना आता ‘पांगुळगाड्या’वरून प्रचाराचे नाट्य उभे करता येणे, हा योगायोग म्हणायचा की अपघात, हे या ‘हल्ल्या’च्या चौकशीनंतरच निष्पन्न होणार आहे! मात्र, अत्यंत नाट्यपूर्ण पातळीवर जाऊन पोचलेल्या या चुरशीच्या लढतीची पटकथा त्यामुळेच अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com