अग्रलेख : राष्ट्रकुलातील ‘अमृत’यश!

बर्मिंगहॅममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडासोहळ्यात भारताच्या पथकाने दणकून ६१ पदके लुटून आणली, त्यातली २२ तर बहुमोलाची सुवर्णपदके आहेत.
common wealth game
common wealth gamesakal
Summary

बर्मिंगहॅममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडासोहळ्यात भारताच्या पथकाने दणकून ६१ पदके लुटून आणली, त्यातली २२ तर बहुमोलाची सुवर्णपदके आहेत.

बर्मिंगहॅममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडासोहळ्यात भारताच्या पथकाने दणकून ६१ पदके लुटून आणली, त्यातली २२ तर बहुमोलाची सुवर्णपदके आहेत. अवघ्या राष्ट्रकुलात चौथ्या स्थानी आलेल्या भारतीय खेळाडूंचे हे यश डोळ्यात भरण्याजोगे आहे यात शंका नाही. त्यांचा वेगळा कौतुक सोहळा सध्या समाजमाध्यमांवर पार पडताना दिसतोच आहे. क्रिकेटसितारा विराट कोहली याने तर खास भारतीय खेळाडूंचे ‘कोलाज’ चित्र ट्विटरवर टांगले, आणि उद्गार लिहिले : ‘‘वुई आर सो प्राऊड ऑफ यु…जय हिंद’. त्याच्या या ट्विटनेदेखील लोक थरारुन गेले. जणू संपूर्ण देशाची भावनाच कोहलीने व्यक्त केली. यंदा आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. ज्या साम्राज्याचे जोखड फेकून देऊन भारत स्वतंत्र झाला, त्याच साम्राज्याचा कुळाचार म्हणून दर चार वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडासोहळा पार पडत असतो.

कुणा प्रखर देशाभिमान्याला ‘गुलामीचे कसले आलेय कुळ?’ असाही कडवट प्रश्न पडेल. पण खेळांच्या राज्यात सरहद्दी आणि साम्राज्यांचे अर्थ बदलतात, हे लक्षात घ्यायला हवे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी मंगल-कलशाच्या मुखावर भारतीय पथकाने यशस्वितेचे टप्पोरे फूल ठेवले आहे. साहेबाच्याच मायभूमीत मिळालेले हे यशही रग्गडच म्हणायचे.

अर्थात, पदकांची निव्वळ संख्या पाहू गेल्यास साठाच्यावर पदके मिळवण्याची भारतीय खेळाडूंची ही पाचवी खेप आहे. २०१०मध्ये राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेचे यजमानपद भारताकडेच होते. तेव्हा यजमानांनी थोडीथोडकी नव्हे, १०१ पदकांची लयलूट केली होती. त्याआधी २००२ मध्ये मँचेस्टर येथे ६९ पदके, २०१४ मध्ये ग्लासगो येथे ६४ पदके, २०१८ मध्ये गोल्डकोस्टला ६६ पदके अशी लूट भारतीय खेळाडूंनी केली होती. पण यंदाची पदकसंख्या ही विशेषत्वाने लक्षणीय मानावी लागेल, याचे कारण भारताचा हातखंडा असलेले नेमबाजी आणि तिरंदाजी हे क्रीडाप्रकार यंदा बर्मिंगहॅमला नव्हते. हमखास पदके मिळवून देणारे हे क्रीडाप्रकार असते तर भारताने यंदाही शंभराच्या वर पदके खेचून आणली असती, आणि तिसऱ्या क्रमांकावरच्या कॅनडालाही मागे टाकले असते. पण भारतीय खेळाडूंनी नवनव्या क्षेत्रात घवघवीत यश संपादले, म्हणून त्याचे महत्त्व आगळे.

सर्वात झळाळता आणि अनपेक्षित पराक्रम महाराष्ट्राच्या अविनाश साबळेनं गाजवला, असे म्हणावे लागेल. लष्करात भरती झालेल्या बीड जिल्ह्यातल्या अविनाशने पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टिपल चेस शर्यतीत ८ मिनिटे ११ सेकंदांचा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवत रौप्यपदकाची कमाई केली. या शर्यतीत गेली पंचवीसेक वर्षे केनियाच्या धावपटूंची अबाधित सत्ता आहे. पण त्यांना धक्का देत अविनाश साबळेने इतिहास रचला. तिहेरी उडीत आइडहॉस पॉलनंही अशीच नजरेत भरण्याजोगी कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. चाळीस वर्षे वयाच्या शरत कमलने टेबल टेनिसमधली चार पदके एकट्याने आणली. पीव्ही सिंधू ही तर भारताची आता आशास्थान नव्हे, तर प्रेरणास्थान ठरु लागली आहे. बॅडमिंटनमधले सुवर्ण तिच्याच मालकीचे होते, आणि ते तिच्याकडेच आले. कुस्तीगिरांच्या पथकाने तर कमाल केली. बारा भारतीय कुस्तीगीरांनी दहाएक पदके खेचून आणली. किंबहुना यंदा एकही कुस्तीगीर बर्मिंगहॅममधून हात हलवीत परत आलेला नाही! अशा अनेक भारतीय यशोगाथा यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडासोहळ्यात नोंदल्या गेल्या आहेत.

हे सारे कशामुळे घडले असेल? याची चिकित्सा येत्या काही काळात क्रीडापंडित करतीलच. अचूक नियोजन आणि काटेकोर प्रशिक्षण यामुळे हे यश प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया भारतीय ॲथलेटिक्सचे प्रमुख आदिल सुमारीवाला यांनी दिली आहे. त्यात थोडेफार तथ्य असू शकेल, पण एकंदऱीत आपल्या खेळाडूंची शारिरीक आणि मानसिक क्षमता सुधारत चालली आहे, याचेच हे फलित असावे. प्रथमदर्शनी एवढे मात्र नक्की म्हणता येते की, भारतीय क्रीडाक्षेत्रात आता नवी उमेद जागी होते आहे. जिंकण्याची ईर्ष्या, शारीरिक क्षमता पणाला लावण्याची जिद्द हे गुण नव्या स्वरुपात दिसू लागले आहेत. कुणी याला ‘नीरज चोप्रा इफेक्ट’ असे म्हणतात. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या टोकियो ऑलिंपिक सोहळ्यात भारताच्या नीरज चोप्राने ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक पटकावून नवा इतिहास घडवला होता.

गेल्या जुलै महिन्यात झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतही नीरज चोप्राने रौप्यपदकाची कमाई करत आपला लौकिक कायम राखला. दुखापतीमुळे त्याला राष्ट्रकुल स्पर्धेत उतरता आले नाही हे खरे, पण त्याच्या कामगिरीमुळे नीतीधैर्य उंचावलेल्या भारताच्या अन्य खेळाडूंनीही मग गगनाला गवसणी घालण्याच्या इराद्यानेच मैदान गाठले. नीरज चोप्राचे स्वर्णिम यश ही भारताची क्रीडाक्षेत्रातील नवी पहाट ठरेल, असे भाकित तेव्हा काही जणांनी केले होते. ते खरे ठरतानाचे पुरावे राष्ट्रकुलाच्या क्रीडासोहळ्यात बघायला मिळाले. अर्थात आता तयारीला लागावे लागेल २०२४मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक सोहळ्यासाठी. तिथे भरीव यश मिळवायचे असेल तर भारतीय खेळाडूंना आणखी बरीच मजल मारावी लागणार आहे, यात शंका नाही. ते यश जसे खेळाडूंच्या तपश्चर्येवर अवलंबून असेल, तेवढेच ते देशात कशाप्रकारे आपण क्रीडा संस्कृती निर्माण करतो, यावरही ठरणार आहे, हे धोरणकर्त्यांनीही लक्षात घ्यायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com