esakal | अग्रलेख : लोकक्षोभाचा दाह
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : लोकक्षोभाचा दाह

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे पेट्रोल हल्ल्यामुळे गंभीररीत्या भाजलेल्या युवतीचा मृत्यू झाल्यामुळे प्रत्येक घर तर हळहळलेच; त्याचबरोबर या निर्दयी हल्ल्याबद्दलच्या संतापाचा उद्रेकही झाला. ते स्वाभाविकही म्हणावे लागेल.

अग्रलेख : लोकक्षोभाचा दाह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे पेट्रोल हल्ल्यामुळे गंभीररीत्या भाजलेल्या युवतीचा मृत्यू झाल्यामुळे प्रत्येक घर तर हळहळलेच; त्याचबरोबर या निर्दयी हल्ल्याबद्दलच्या संतापाचा उद्रेकही झाला. ते स्वाभाविकही म्हणावे लागेल. महाविद्यालयात अध्यापनाचे काम करणाऱ्या त्या युवतीच्या डोळ्यांसमोर अनेक स्वप्ने असतील आणि अनेक मनोरथही तिने रचलेले असतील. मात्र, गेल्या सोमवारी एका नराधमाने अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले आणि अवघ्या काही क्षणांत या सर्व स्वप्नांचा अक्षरशः कोळसा झाला. ‘त्या नराधम आरोपीला आपल्या ताब्यात द्या’, इथपासून ‘त्यालाही तिच्याबरोबरच जाळा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांमधून उमटल्या. या जनक्षोभाला अर्थातच कारणीभूत आहे, ती आपल्या न्यायसंस्थेतील कामकाज प्रक्रिया. दिल्लीत सात वर्षांपूर्वी झालेल्या अमानुष बलात्काराच्या व खुनाच्या ‘निर्भया’ प्रकरणातील आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर आणि फाशीच्या शिक्षेची तारीख जाहीर झाल्यावरही, कायद्यातील अनेक तरतुदींमुळे ती फाशी प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. या आणि अशा अनेक प्रकरणांत न्यायप्रक्रियेतील दिरंगाई दिसली. त्यामुळे इथल्या न्यायव्यवस्थेत वेळेवर न्याय मिळेल का, याविषयीच शंका निर्माण झाली आहे. हिंगणघाट परिसरातील जनक्षोभाचे हेही एक ठळक कारण आहे, याची गंभीर दखल घेतली पाहिजे. हा लोकक्षोभ एवढा तीव्र होता, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीव्हीवर येऊन, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी पावले उचलण्याचे आश्‍वासन देणे भाग पडले. हे आश्‍वासन प्रत्यक्षात येईल काय? आंध्रमध्ये बलात्काराच्या खटल्यातील आरोपींसाठी असलेल्या कायद्याचा अभ्यास करून त्या धर्तीवर नवा परिपूर्ण कायदा आणण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले खरे; पण २०१६ मध्ये महाराष्ट्रात कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार प्रकरणातील खटला ‘फास्ट ट्रॅक’ पद्धतीने चालूनही आरोपींची शिक्षा पूर्णत्वास गेलेली नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थात, हा सारा न्यायप्रक्रियेचा भाग झाला; पण खरे प्रश्‍न त्या पलीकडले आहेत आणि त्यांचे स्वरूप एका शोकांतिकेतून उभ्या राहिलेल्या अनेक शोकांतिकांसारखे आहे. ही दुर्दैवी युवती त्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्‍ती होती. तिचा लहान भाऊ शिक्षण घेत आहे. त्यामुळे आता या कुटुंबापुढे आर्थिक विवंचनेपासून अनेक प्रश्‍न उभे आहेत. त्याचबरोबर मूलभूत प्रश्‍न हा समाजातील अशा नराधमी प्रवृत्तीचा बीमोड कसा करता येईल, हा आहे. या घटनेनंतर या गावातील अनेक पालक आपल्या मुलींना घराबाहेर पाठवायला तयार नसल्याने त्या युवतींच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार, तसेच गावातील मान्यवरांनी त्याबाबत पुढाकार घेऊन हिंगणघाट परिसरात भयमुक्‍त वातावरण निर्माण करावे लागणार आहे. हैदराबादमध्ये गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या बलात्कारानंतर आरोपींचे ‘एन्काउंटर’ झाल्यामुळे आता अनेकांनी, अगदी काही लोकप्रतिनिधींनीही ‘न्यायाची हीच खरी व्यवस्था’, असा समज करून घेतला आहे. त्यापासून त्यांना परावृत्त करणे, हे एक मोठे काम आहे. हिंगणघाटमधील या अभागी युवतीला श्रद्धांजली वाहत असतानाच, हे आव्हान किती मोठे आहे, तेच समोर आले आहे. त्याचबरोबर स्त्रियांच्या जीवावर उठणारी मानसिक विकृती आणि हिंस्र विखार यांचे समूळ उच्चाटन कसे करता येईल, हे व्यापक आव्हानही समोर आले आहे. आपला समाज ते पेलू शकेल काय?

loading image