अग्रलेख : लेनिन, मार्क आणि मुकेश! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

 भारतातील एक प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी आणि अमेरिकन उद्योजक मार्क झुकेरबर्ग यांचे हे मिलन जितके धक्‍कादायक आहे, तितकेच ते भारतातील इंटरनेट क्रांतीला एका नव्या वळणावर घेऊन जाणारे आहे. 

प्रख्यात कम्युनिस्ट नेते आणि सोव्हिएत महासंघाला नव्या दिशेने घेऊन जाणारे क्रांतिकारी व्लादिमीर लेनिन यांच्या दीडशेव्या जन्मदिनाच्या मुहूर्तावर जगातील इंटरनेट क्रांतीच्या व्यवसायातील दोघा बड्या उद्योजकांनी केलेली हातमिळवणी, ही अनेकांना अचंब्यात टाकून गेली आहे. एकीकडे कोरोना विषाणूने जगभरात घातलेले थैमान हा भांडवलशाही राजवटीचा पराभव आहे, असे प्रतिपादन कम्युनिस्ट विचारवंत करत आहेत आणि त्याचवेळी भारतातील एक प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी आणि अमेरिकन उद्योजक मार्क झुकेरबर्ग यांचे हे मिलन जितके धक्‍कादायक आहे, तितकेच ते भारतातील इंटरनेट क्रांतीला एका नव्या वळणावर घेऊन जाणारे आहे. झुकेरबर्ग यांच्या "फेसबुक' या माध्यमाने अंबानी यांच्या "रिलायन्स जिओ' या देशवासीयांना स्वस्तात "डेटा' उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या कंपनीत थोडी थोडकी नव्हे, तर 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करून या भारतीय कंपनीतील 9.99 टक्‍क्‍यांचा हिस्सा आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यामुळे आता "जिओ'चे एकूण मूल्य हे चार लाख 62 हजार कोटींवर जाऊन पोचले आहे आणि शिवाय त्याचा रिलायन्स उद्योग समूहाला होणारा आणखी एक मोठा लाभ म्हणजे आपल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जांतून काही प्रमाणात मुक्‍ती होण्यास साह्य होणार आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये मुकेश अंबानी यांच्या "रिलायन्स'वर 40 अब्ज डॉलरचे कर्ज होते, हे लक्षात घेतले की या गुंतवणुकीमागील रहस्य स्पष्ट होते. त्याचवेळी "डेटा'साठी आसुसलेल्या भारतीयांच्या भल्या मोठ्या बाजारपेठेत आपले पाय अधिक भक्‍कमपणे रोवण्याचे "फेसबुक'ला सहज शक्‍य होणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्याच्या बाजारपेठीय अर्थव्यवहारात या दोन बड्या डिजिटल कंपन्या एकत्र येणे, यात खरे तर काहीच नवल असायला नको होते. मात्र, अवघ्या सव्वा वर्षांपूवी, म्हणजे डिसेंबर 2018 मध्ये याच मुकेशभाईंनी "डेटा वसाहतवादा'च्या विरोधात जोरदार रणशिंग फुंकले होते! अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात जगभरात युरोपीय देशांनी प्रस्थापित केलेल्या वसाहतवादापेक्षाही हा "डेटा वसाहतवाद' अधिक धोकादायक आहे, असे त्यांनी तेव्हा ठामपणे प्रतिपादन केले होते. त्यामुळेच "जिओ'मधील "फेसबुक'च्या गुंतवणुकीमुळे सारेच चकित झाले आहेत. मात्र, मुकेश आणि मार्क यांच्या या हातमिळवणीचा अधिक तपशीलात जाऊन विचार केला, की "कोरोना'च्या या संकटकाळातही प्रत्येक जण आपापले "व्यवहार' कसे जपू पाहत आहे, तेच समोर येते. आजमितीला 130 कोटी भारतीयांपैकी किमान 70 कोटी भारतीयांच्या हातात मोबाइल फोन आहेत आणि त्यापैकी साधारण 56 कोटी लोकांनी इंटरनेटशी आपले नाते जोडून घेतले आहे. या पार्श्‍वभूमीवर "जिओ' आणि "फेसबुक' यांच्या भारतातील बाजारपेठेचा आढावा घेतला, की या हातमिळवणीची किमान काही कारणे स्पष्ट होतात. "जिओ' या डेटा पुरवठा करणाऱ्या कंपनीचे आज भारतात 38 कोटींहून अधिक ग्राहक असल्याचा दावा "रिलायन्स' करत आहे तर "फेसबुक' वापरणाऱ्या भारतीयांची संख्या ही 32 कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. ही आकडेवारीच मुकेश यांना सव्वा वर्षांपूर्वीच्या आपल्याच प्रतिपादनाला विस्मरणाच्या खंदकात ढकलून देण्यास कारणीभूत ठरली असणार, हे उघड आहे. अर्थात, ही गुंतवणूक जगभरातील कोणत्याही दूरसंचार कंपनीत झालेल्या एकहाती गुंतवणुकीपेक्षा सर्वात मोठी असली, तरी त्यामुळे "जिओ'वरील "रिलायन्स'च्या मालकी हक्‍काला कोणतीही बाधा पोचणार नाही, याचीही दक्षता हा करार करताना घेण्यात आली आहे. 

अर्थात, हा सारा व्यवहार हा केवळ "जिओ'मधील गुंतवणूक, तसेच "फेसबुक'चे वाढणारे उपभोक्‍ते यांच्यापुरता मर्यादित नाही. "या भागीदारीमुळे भारतातील डिजिटल क्रांतीला एक नवा आयाम प्राप्त होणार आहे!' असे दस्तुरखुद्द मुकेशभाईंनीच या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर केले आहे. अंबानी यांचे हे वक्‍तव्य प्रसारित होण्याआधीच झुकेरबर्ग यांनी त्यास दुजोरा देतानाच, यामुळे भारतातील बाजारपेठेत व्यापाराच्या नव्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असल्याचे नमूद केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची "इझ ऑफ लिव्हिंग' आणि "इझ ऑफ डुईंग बिझिनेस' ही स्वप्नेही या भागीदारीमुळे लवकरात लवकर प्रत्यक्षात येतील, असाही दावा अंबानी यांनी केला आहे. त्याचवेळी भारतातील किमान तीन कोटी छोट्या किराणा दुकानदारांनाही या नव्या भागीदारीमुळे आपले व्यवहार डिजिटल करणे सुकर जाणार आहे, असेही "रिलायन्स' सांगत आहे. हे सारे खरे असूही शकते. मात्र, दोन बडे भांडवलदार एकत्र येतात, तेव्हा त्यांनी समाजकल्याणाचा कितीही आव आणला, तरी ते आपले हित सुरक्षित ठेवूनच सारी पावले उचलत असतात, हे ध्यानात घ्यायला हवे. अर्थात, मुकेशभाईंनी मात्र समाजकल्याणासाठीच आपल्या "डेटा वसाहतवाद'विरोधी भूमिकेला तिलांजली दिली काय, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र काळच देणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article Internet revolution in India