अग्रलेख : ‘साथ’ नको, साथ हवी

Support
Support

मास्क हा केवळ नाका-तोंडाला नव्हे, तर हनुवटीला लावण्याचा एक ‘अलंकार’ आहे, असेच बहुधा अनेकांना वाटते आहे. नियम पालनातील हा ‘सैल’पणाच आता अंगाशी येतो आहे. पुन्हा एकदा जनजागृतीची, त्याचबरोबर कल्पक आणि दूरगामी हिताच्या सरकारी धोरणांची आवश्यकता आहे. 

अवघ्या देशाबरोबरच महाराष्ट्रावर घोंगावणाऱ्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचे संकट स्पष्ट दिसत असतानाही, बेजबाबदार वर्तन करणाऱ्या राज्यातील जनतेला अखेरचा इशारा देणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाग पडले आहे. ही अर्थातच काही सुखद अशी बातमी नाही आणि ती मास्क न घालणे आणि गर्दी न टाळणे, अशा आपल्या वर्तनामुळे लोकांनीच ओढवून घेतली आहे. ऑक्टोबरनंतर प्रथमच राज्यात रविवारच्या एकाच दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत जवळपास सात हजारांची भर पडली आहे. विदर्भातील अमरावती आणि अन्य परिसरात बाधितांचे प्रमाण लक्षणीय असल्यामुळे तेथे ‘मिशन बिगिन अगेन!’ या आपल्याच भूमिकेला टाळे लावणे, सरकारला भाग पडले आहे, तर सावधगिरीचा उपाय म्हणून पुणे परिसरात शाळा-कॉलेजे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी जनतेला आठ दिवसांची मुदत दिली असून, या काळात मास्क घालणे आणि शारीरिक दुरस्थता पाळणे, या दोन साध्या नियमांचे पालन न झाल्यास पुनश्च एकवार ठाणबंदी लागू करणे भाग पडेल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

गेल्या मार्चमध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या चार तासांच्या इशाऱ्याने देशव्यापी ठाणबंदी जारी केली होती. ती वाढता वाढे या न्यायाने वाढतच गेली आणि आता गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून जनजीवन सुरळीत सुरू होत असल्याचे दिसू लागताना, पुन्हा हे ‘लॉकडाऊन’चे संकट दाराशी येऊन ठेपले आहे. अर्थात, उद्धव ठाकरे हे काही मोदी यांच्याप्रमाणे अवचित काही निर्णय घेऊ इच्छित नाहीत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. थेट प्रसारणाद्वारे जनतेशी संवाद साधताना, त्यांनी ते स्पष्टही केले. ‘ठाणबंदी’ हवी आहे की नाही, हे आता जनतेनेच ठरवावे, असे सांगत त्यांनी तो निर्णय जनतेवर सोपवताना ‘मी जबाबदार!’ असा कार्यक्रमच लोकांपुढे ठेवला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खरे तर मोठ्या प्रतीक्षेनंतर या विषाणूवर प्रतिबंधक लस आल्यानंतर हे प्रमाण कमी होईल आणि आता पुनश्च ठाणबंदीचे नावही निघणार नाही, असे सर्वांच्या मनात होते. प्रत्यक्षात गेले जवळपास दोन महिने आपण सारेच हा कोरोना नावाचा जीवघेणा विषाणू या भूतलावर जणूकाही अवतरलाच नव्हता, अशा प्रकारे सामाजिक  तसेच आरोग्यविषयक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून वागू लागलो आहोत. मास्क हा तर केवळ नाका-तोंडाला नव्हे तर हनुवटीला लावण्याचा एक ‘अलंकार’ आहे, असेच बहुधा अनेकांना वाटते आहे. खरे तर ठाणबंदीचा फटका जगभरातील बहुतेकांना बसला आहे. अनेकांचे रोजगार गेले, शैक्षणिक वर्ष अभ्यासाविना बुडून गेले, अर्थव्यवस्था कोलमडून पडली आणि अनेक जण नैराश्याच्या गर्तेत सापडले. 

तरीही ठाणबंदीचे कुलूप उघडले जाताच, सारेच एकदम बहकल्यासारखे वागू लागले. गेल्या नोव्हेंबरनंतर प्रथमच देशभरातील बाधितांची संख्या ही एका आठवड्यात ३१ टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. यावरचा उपाय हा नागरिकांनी संबंधित नियम पाळण्याबरोबरच लसीकरणाचा वेग वाढवणे, हाच आहे. इस्राईलसारख्या अवघी सहा-साडेसहा कोटी लोकसंख्या असलेल्या देशाने अल्पावधीत जवळपास तीन कोटी लोकांना लस दिली आहे. आपल्या देशात मात्र  १३५ कोटींपैकी जेमतेम पाच ते सहा कोटींपर्यंतच लस पोचली आहे. ही जबाबदारी अर्थातच सरकारची आहे. जितक्या जास्त लोकांचे लसीकरण होईल, तेवढ्या प्रमाणात सामूहिक प्रतिकारशक्ती –हर्ड इम्युनिटी- वाढीस लागेल आणि बाधितांचे प्रमाणही कमी कमी होत जाईल. मात्र, लस घेतल्यानंतरही मास्क आणि अन्य नियमांचे कठोरपणे पालन हे तुम्हा-आम्हालाच करावे लागणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने आणि विशेषत: महानगरे तसेच मोठी शहरे येथील रहिवाशांची येत्या आठ दिवसांत कसोटी लागणार, हे स्पष्ट दिसत आहे.

खरे तर आता पुन्हा किमान आठवडा वा पंधरवड्यासाठी जरी ठाणबंदी लागू झाली, तर ती कोणालाच परवडणारी नाही. अर्थव्यवस्थेचे रूळांवरून घसरलेले चाक आता कोठे काही गती घेऊ पाहत आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांचा इशारा गांभीर्याने घेऊन मास्क तसेच अन्य नियमांचे लोकांनी कसोशीने पालन करायला हवे. ठाणबंदी हा या विषाणूवरील कायमस्वरूपी उपाय नाही, असे संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ आणि राज्य सरकारचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनीही स्पष्टपणे सांगितले आहे. सरकारही ते लक्षात घेईलच. राज्यात गेल्या तीन महिन्यांत झाली नव्हती इतकी मोठी वाढ गेल्या आठवडाभरात झाली आहे, हे आपण सर्वांनीच ध्यानात घ्यायला हवे आणि सरकारनेही एकदम राज्यव्यापी ठाणबंदी जारी न करता, ज्या ज्या भागात बाधितांचे प्रमाण अधिक आहे, तेवढ्यापुरतीच ती मर्यादित ठेवायला हवी. युद्धपातळीवर विषाणूचा मुकाबला करायचा आहे, याचे भान ठेवून चिवटपणे आणि एकत्रितरीत्या प्रयत्न केले तर यश मिळणे अशक्य नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com