अग्रलेख : महत्त्वाकांक्षी कर्मयोगी

pranab mukherjee
pranab mukherjee

प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारताच्या राजकीय रंगमंचावरील एक बुहुआयामी व्यक्‍तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ‘प्रणवदा’ या नावाने ते निकटवर्तीयांमध्ये ओळखले जात आणि पंतप्रधानपदाने त्यांना एकदा नव्हे तर दोनदा हुलकावणी दिल्यानंतरही त्यांचे स्थान दिल्लीच्या वर्तुळात आदराचे असेच असायचे. त्याला कारण त्यांची बहुश्रुतता तसेच अभ्यासू व्यक्‍तिमत्त्व.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंतप्रधान तर त्यांना व्हायचेच होते; पण  त्या पदावर विराजमान होण्याची त्यांची मनीषा अपुरी राहिली. मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी स्वीकारून काँग्रेसने त्यांच्या कर्तृत्वाचा यथोचित गौरव केला. खरे तर प्रणवदा हे इंदिरा गांधी यांच्या निकटच्या वर्तुळातच होते, असे नव्हे तर १९६९मध्ये काँग्रेस फुटल्यानंतर इंदिरा गांधींनीच त्यांना राज्यसभेवर निवडून आणले. तेव्हापासून आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते चर्चेत राहिले. त्यांची स्मरणशक्‍ती तल्लख होती आणि अनेकदा त्यांचे सहकारी कम्प्युटरपेक्षाही अधिक मेमरी असलेले, असाच करत.

अर्थखाते असो की परराष्ट्र की संसदीय व्यवहार; या साऱ्यातील त्यांची पारंगतता वेळोवेळी दिसून आली. ते भावनाप्रधानही होते आणि त्याचवेळी त्यांचा प्रक्षोभ कधी उफाळून येईल, तेही सांगता येत नसे. मात्र, त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खरा बहर आला तो आणीबाणीतील पराभवानंतर इंदिरा गांधी पुन्हा १९८०मध्ये पंतप्रधान झाल्यानंतरच्या चार वर्षांत. इंदिरा गांधी यांच्या ऑक्‍टोबर १९८४ मध्ये झालेल्या निर्घृण हत्येनंतरचा काही काळ मात्र ते राजीव गांधी यांच्यापासून दुरावले होते. त्यास कारण अर्थातच पंतप्रधानपदाची त्यांची मनीषा हे होते.  

इंदिरा गांधी यांची हत्या झाली, तेव्हा राजीव गांधी आणि प्रणवदा हे दोघेही योगायोगानें कोलकात्यातच  होते आणि एकाच विमानाने ते दोघेही दिल्लीला परतले. प्रणवदांची ओळख त्या काळात ‘नंबर २’ अशीच होती. त्यामुळे विमानातच इंदिरा गांधी निवर्तल्याचे वृत्त आले, तेव्हा प्रणवदांनी सारी सूत्रे हाती घेऊन विमानतळावरच ज्येष्ठ लष्करी तसेच सनदी अधिकाऱ्यांना पाचारण केले. पंतप्रधानांचे निधन झाले असले, तरी कारभारात (गव्हर्नन्स) खंड पडू नये, एवढाच त्यांचा हेतू होता. कदाचित हंगामी पंतप्रधान म्हणून का होईना आपल्या हाती धुरा येईल, असेही त्यांना वाटले असणार. मात्र, राजीव गांधी यांनी त्याचा अर्थ वेगळा लावला आणि त्यांना प्रारंभी आपल्या मंत्रिमंडळातही घेतले नाही. त्यानंतर प्रणवदा काही काळ काँग्रेसमधून बाहेरही पडले होते.

मात्र, विश्‍वनाथप्रताप सिंग यांच्या बंडखोरीनंतर राजीव गांधी यांनी प्रणवदांना सन्मानाने पुन्हा पाचारण केले. प्रणवदा अर्थमंत्री असताना, डॉ. मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर होते. मात्र, काव्यगत न्याय म्हणा की आणखी काही, याच प्रणवदांना पुढे डॉ. सिंग यांच्याच नेतृत्वाखाली काम करावे लागले.

अर्थात, त्यांनी तो सल आपल्या मनात ठेवला नाही आणि आपले सर्वस्व पणाला लावून काम केले. पुढे अमेरिकेशी होऊ घातलेल्या अणुकरारावरून डाव्यांनी डॉ. सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला, तेव्हा झालेल्या राजकीय रणधुमाळीत ते सरकार टिकवण्यातही त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती. 

त्यामुळेच २००९मध्ये तरी आपल्याला पंतप्रधानपद मिळेल, असे त्यांना वाटले असणार. मात्र, तेव्हाही त्या पदाने त्यांना हुलकावणी दिली. डॉ. सिंग यांनी नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री म्हणून काम करताना, भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र क्रांती घडवून आणली. अर्थखाते प्रणवदांच्या हाती असते, तर कदाचित आर्थिक धोरणाचा चेहरामोहरा वेगळा झाला असता. डॉ. सिंग यांच्याइतकी त्यांची भूमिका लवचिक नव्हती, हे वास्तव आहे. मात्र एक मुरब्बी नेता आणि प्रशासक असा त्यांचा लौकिक होता. अनेक मंत्रिगटांचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. केंद्रातील   महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली.

त्यांच्या कार्यक्षमतेचा खरा गौरव अखेर २०१२मध्ये राष्ट्रपतिपदी त्यांची निवड करून काँग्रेसने केला. मात्र, नंतरच्या दोनच वर्षांत काँग्रेसची सत्ता गेली आणि नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाची सत्ता आली. या सर्वच काळात प्रणवदांनी राष्ट्रपतिपदाचा आब आणि प्रतिष्ठा सांभाळत काम केले. ते ‘भारतरत्न’ ठरले. प्रणवदांचे व्यक्‍तिमत्त्व हे एका अर्थाने वादळी आणि मनस्वी होते आणि राष्ट्रपतिपदावरून पायउतार झाल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावून, त्यांनी त्याची प्रचीतीही आणून दिली होती. राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांनी कधीही लपविली नाही. राजकारणाच्या क्षेत्रात ती असणे साहजिकच आहे; पण तरीही स्वीकृत जबाबदाऱ्यांमध्ये आणि कामांमध्ये ते स्वतःला ज्या पद्धतीने बुडवून घेत ते पाहता त्यांना `कर्मयोगी’ म्हणावे लागेल.

या दोन्ही गोष्टी त्यांच्या बाबतीत परस्परविरोधी वाटत नाहीत आणि हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य. राजकारणात सक्रिय असूनही त्यांचे तटस्थ विश्‍लेषण करण्याची क्षमता असलेले प्रगल्भ व्यक्तिमत्व आपल्यातून गेले आहे. स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकारणातील `प्रणवपर्वा’चा अस्त झाला आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com