अग्रलेख : क्रिकेट आणि एमएसपी!

Vivo-IPL
Vivo-IPL

खेळाडूंच्या पिढ्या बदलतात. खेळही बदलतो, तसा क्रिकेटचा तोंडावळाही बदलत असतो. तसा तो बदलताना यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये प्रत्यक्ष बघायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. बाकी क्रिकेटच्या बाजारपेठेतील ‘तेजी’ डोळे दिपविणारी आहे, हे लिलावातून स्पष्ट झालेच.

कोरोनाच्या महासाथीने अर्थव्यवस्था काही कोलमडलेली वगैरे नाही, इंधन दरवाढीमुळे कुणाची कंबरडीही मोडलेली नाहीत, शेतकऱ्यांची सुगी सुरु झाली असून मायंदाळ पीक आल्याने सारे काही आलबेल आहे, भारताची अर्थव्यवस्था काहीच्या काहीच सुधारली असून पाच ट्रिलियनचे लक्ष्य वगैरे केव्हाच मागे पडले आहे, असा काहीसा भास ‘आयपीएल’च्या लिलावामुळे कुणाला झाला असेल, तर त्यात चूक नाही. चेन्नईत गुरुवारी पार पडलेल्या या ‘आयपीएल’च्या खेळाडूंच्या बाजारात ज्या कोट्यानुकोटींच्या बोली लावल्या गेल्या, आणि तब्बल १४५ कोटींचे व्यवहार-वायदे पार पडले, ते पाहता कुणालाही ‘अच्छे दिन’ अवतरल्यासारखे वाटेल. शेतकऱ्यांच्या किमान हमी भावाचे काय होईल ते होवो; पण क्रिकेटच्या मार्केटमधला खेळाडूंना मिळणारे किमान आधारभूत किंमती ऊर्फ एमएसपी पाहिल्या तरी डोळे फिरावेत. आधीच ‘आयपीएल’चा उत्सव म्हटले, की आपले क्रिकेटवेडे भारतीय मन फुलून येते. साऱ्या चिंता-काळज्या खड्ड्यात जातात, आणि यंदा कोण बाजी मारणार याची उत्सुकता आभाळभर पसरते. व्यवहार आणि तर्कशास्त्र इथे थिटे पडते. कारण शेवटी मामला क्रिकेटचा असतो. लिलावातील घडमोडींमुळे त्याचेच प्रत्यंतर आले.     

गेल्या वर्षी कोरोनाच्या विषाणूमुळे उडालेल्या हाहाकाराला न जुमानता संयुक्त अरब अमिरातींमध्ये रिकाम्या स्टेडियममध्ये ‘आयपीएल’चे सामने खेळवण्यात आले. ‘आयपीएल’ हा मुळात खेळ कमी, आणि ‘धंदे की बात’ जास्त. कोट्यवधींचा जाहिरातींचा, प्रक्षेपण हक्कांचा महसूल हे त्यातील इंगित. म्हणूनच गतसाली कोरोनाचे जगभर थैमान चालू असताना ‘आयपीएल’चा अट्टहास करण्यात आला. यंदा तर मायदेशातील प्रेक्षकांचा जल्लोष सोबतीला असेल. देशी-परदेशी खेळाडूंच्या लिलाव कार्यक्रमानेच हा दरवर्षीचा क्रिकेटोत्सव सुरु होतो, तसा तो गुरुवारी झाला. यंदाच्या लिलावात भरभक्कम रकमेची बोली लागणार नाही, असे वाटले होते, पण तसे घडलेले नाही.

किंबहुना, आर्थिक चणचण, प्रायोजकांची वानवा या सगळ्या समस्यांचा जणू विसर पडल्यागत जाणवले. एकट्या ‘पंजाब किंग्ज’ने संघबांधणीसाठी सर्वाधिक ५३ कोटी रुपये उधळले. तमीळनाडूचा महम्मद शाहरुख खान हा नवाकोरा फलंदाज आपल्या तंबूत ओढण्यासाठी पंजाब किंग्जने २० लाखांच्या आधारभूत किंमतीपासून तब्बल सव्वा पाच कोटी रुपयांच्या बोलीपर्यंत मजल मारली. शिवाय न्यूझीलंडचा क्रिस मॉरिस याला करारबद्ध करण्यासाठी विक्रमी १६ कोटी २५ लाख रुपये मोजले. नवोदित शाहरुख खानचा हा पहिलाच आयपीएल अनुभव असणार आहे, हे विशेष. पदार्पणात एवढे मानधन रुपेरी पडद्यावरल्या शाहरुख खानाला मिळाले असेल का, अशी शंका आहे!

न्यूझीलंडचा क्रिस मॉरिसने गेल्या हंगामात आणि वर्षभरात फारसे काही चमकदार केलेले नाही, पण तरीही त्याला किंमत वधारुन मिळाली. बाकीच्या संघांनीही कमरेचे कसे ढिले सोडलेले दिसत आहेत. उदाहरणार्थ, कृष्णाप्पा गौतम या नवख्या खेळाडूसाठी चेन्नई सुपरकिंग्जने नऊ कोटी २५ लाख रुपयांची घसघशीत रक्कम मोजली, तर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल याच्यासाठी बंगळुरुच्या ‘रॉयल चॅलेंजर्स’ने १४ कोटी २५ लाख रु.मोजले. पण बहुतेक संघांमध्ये नवनवी नावेदेखील तितकीच दिसत आहेत. त्यातले एक नाव अर्जुन तेंडुलकरचे. या अर्जुनाला २० लाखांच्या आधारभूत किंमतीलाच ‘मुंबई इंडियन’ने स्वीकारले. गेल्या ‘आयपीएल’मध्ये अर्जुनने मुंबई इंडियन संघासाठी सराव गोलंदाज म्हणून कामगिरी पार पाडली होती, शिवाय चारेक वर्ष वानखेडे स्टेडियमवर त्याने बॉलबॉय म्हणून काढली आहेत. शिवाय त्याचे वडील सचिन तेंडुलकर आहेत! मुंबई इंडियन हे सचिनचे माहेरघर. आपले लेकरु स्वगृहीच राहिल्याचा आनंद सचिनलाही झालाच असणार! एकूण २९२ खेळाडूंनी लिलावासाठी आपली नावे नोंदवली होती, त्यातली दीडेकशे नावे लिलावात विकली गेली. 

जवळपास सगळ्या संघांनी संकटात संधी ओळखून संघाच्या पुनर्बांधणीवर भर दिला. बव्हंशी नवोदितांवर पैसे ‘गुंतवण्याची’ तयारी संघमालकांनी दाखवली, हे या ‘आयपीएल’चे वैशिष्ट्य. ‘आयपीएल’मध्ये नवे क्रिकेट बघायला मिळेल, असे दिसते. अर्थात रोहित शर्मा, महेंद्र धोनी, दिनेश कार्तिक, अजिंक्य रहाणे, असे यशस्वी कलावंत ‘आयपीएल’ उत्सवात दिसतीलच. या सिताऱ्यांमध्ये प्रेक्षक स्टेडियममध्ये खेचून आणण्याची क्षमता असते, जाहिरातदारांनाही असे वलयांकित चेहरे हवे असतात. मग त्यांनी कामगिरी धड केली नाही, तरी चालते. खेळाडूंच्या पिढ्या बदलतात. खेळही बदलतो, तसा क्रिकेटचा तोंडावळाही बदलत असतो. तसा तो यंदा बदलताना प्रत्यक्ष बघायला मिळावा.

म्हणजेच, नव्या दमाच्या खेळाडूंच्या समावेशामुळे यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये अधिक चुरस आणि दम असेल, असे मानायला हरकत नाही. कारण प्रेडिक्टेबल खेळाडूंपेक्षा नवे चेहरेच अधिक हिरीरीने खेळणार आणि तळपणार, हे उघड आहे. अर्थात यामुळे बेटिंगच्या उद्योगालाही यंदा निराळे स्फुरण चढणार, हे वेगळे सांगायची गरज नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com