esakal | अग्रलेख : येवा, मुंबई आपलीच असा...!
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane

अग्रलेख : येवा, मुंबई आपलीच असा...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने ‘नारायणास्त्र’ शिवसेनेच्या विरोधात वापरण्याचे ठरविले आहे, हे उघड आहे. शिवसेनाही आक्रमक झाली आहे, पण या रणधुमाळीत या महानगरीच्या नागरी प्रश्नांचे काय?

मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीवर सत्ता कोणाची असते, याकडे केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचेही लक्ष असते. त्याचे कारण या महाकाय महानगरीच्या कोट्यवधींच्या अर्थकारणात असते! त्यामुळेच देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या या महानगरीच्या अवघ्या पाच-सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप सारी शक्ती पणाला लावताना दिसत आहेत. पण त्या निमित्ताने लोकांचे मूलभूत नागरी प्रश्न ऐरणीवर येतील, त्यांच्यावरील संभाव्य उपायांची चर्चा होईल, अशी आशा कोण बाळगत असेल तर मात्र साफ निराशा होईल, असेच सध्याचे वातावरण आहे. राजकारणातील वाढती व्यक्तिपूजा हे लोकशाहीवरील संकट आहे, असा इशारा घटनाकारांनी दिला होता खरा; पण सध्या त्यालाच ऊत आलेला दिसतो.

राणे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला भेट देण्याचे पाऊल उचलणे आणि त्या ठिकाणी राणे गेले म्हणून शिवसेनेने ती जागा ‘शुद्ध’ करणे, या प्रकारांना काय म्हणायचे? शिवसेना अलीकडच्या काळात आपण प्रागतिक भूमिका घेत असल्याचा दावा करीत असते. मग हे शुद्धिकरणासारखे प्रकार त्यात बसतात का, हे त्या पक्षाच्या नेत्यांना विचारायला हवे. भाजपही डावपेचांवरच जास्त भिस्त ठेवताना दिसतो. लोकाभिमुख राजकारण वगैरे गोष्टी बोलण्यापुरत्याच असतात की काय, असा प्रश्न सध्याची राजकारणाची पातळी पाहून पडतो. महापालिका निवडणुकीसाठी भाजपने राणे नावाचे ‘अस्त्र’ शिवसेनेच्या विरोधात वापरण्याचे ठरविले आहे, हे उघड आहे.

महिनाभरापूर्वीच केंद्रीय मंत्रिपदाची वस्त्रे परिधान करणारे नारायण राणे यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंगच मुंबईत फुंकले. तेही थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावरच! राणे यांची संभावना गेली १५ वर्षे शिवसेना ‘गद्दार’ म्हणून करत असताना, राणे यांनी भाजपच्या ‘जनआशीर्वाद’ यात्रेचे निमित्त साधून शिवाजी पार्कवरील या स्मृतिस्थळास भेट देण्याचा घाट घातला तेव्हाच काही तरी अनवस्था प्रसंग गुदरणार, अशी शंका अनेकांच्या मनात येऊन गेली होती. प्रत्यक्षात राणे यांची ही भेट विनासायास पार पडली. त्यानंतर सावरकर स्मारक आदी स्थळांना भेटी दिल्यावर राणे यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेना आणि मुख्यत्वे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ तोंडसुखही घेतले होते. त्याची परिणती अखेर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या शिवसैनिकांनी केलेल्या ‘शुद्धिकरणा’त झाली! त्यानंतर मग शिवसेना तसेच बाळासाहेब यांच्या मुशीतच राजकारणाचे प्राथमिक धडे घेतलेल्या राणे यांनी शिवसेनेला प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची आठवण करून दिली. हे सारे भाजपला हवेहवेसे नाट्य राणे यांनी घडवून आणले.

महापालिकेतील शिवसेनेची गेल्या दोन अडीच दशकांची सत्ता हिसकावून घेण्यास राज्याची सत्ता गमावल्यापासून भाजप कमालीचा उतावीळ झाला आहे. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतच राज्यातील सत्तेत भागीदार असलेले हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले, तेव्हाच ही लढत अटीतटीची झाली होती. ‘वाघाच्या जबड्यात घालूनी हात, मोजतो दात... अशी ही जात...’ अशा तिखट शब्दांत देवेन्द्र फडणवीस यांनी शिवसेनेला आव्हान दिले होते आणि भाजपने तेव्हाच खरे तर शिवसेनेच्या बरोबरीने जागा जिंकल्या होत्या. मात्र, राज्याची सत्ता राखण्यासाठी भाजपने सावध पवित्रा घेऊन शिवसेनेच्या हातात मुंबईचे राज्य सोपविले होते.

राणे हे १५-१६ वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हाच त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी जमत नाही, हे स्पष्ट झाले होते. त्या काळात शिवसेनेची पूर्ण सूत्रे ही उद्धव ठाकरे यांच्याच हातात होती आणि तेव्हाच ‘शिवसेनेने पदांचा बाजार मांडला आहे!’ असा आरोप राणे यांनी केला होता. आताही त्यांच्या टीकेचा रोख हा उद्धव ठाकरे यांच्याच दिशेने आहे. राणे यांनी शिवसेनेत असताना महापालिकेत प्रदीर्घ काळ सत्ता म्हणजे काय ते अनुभवले आहे. त्यामुळेच ‘मुंबई महापालिकेत काय चालते, ते मला पूर्ण ठाऊक आहे आणि वेळ येताच मी तो ‘पोलखोल’ करीन’,असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांनी खरेच शिवसेनेच्या कारभाराची लक्तरे चव्हाट्यावर आणली, तर राज्याच्या तसेच अन्य महापालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. पण मुख्यमंत्रिमंत्रीपदासाठी काँग्रेस तसेच मग भाजप असा प्रवास करणाऱ्या राणे यांनी आपली पतही गेल्या काही वर्षांत गमावली आहे, हे नाकारता येणार नाही.

कोकणात त्यांना तगडे आव्हान उभे करण्यात शिवसेनेला बऱ्यापैकी यश आले आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांना मुंबईकर कसा आणि किती प्रतिसाद देतात, हे बघावे लागेल. मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांची पहिली सत्त्वपरीक्षा ही मुंबई महापालिकेच्याच निवडणुकीत होणार आहे आणि त्याचे परिणाम राज्यभरात उमटल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळेच आता शिवसेना आणि विशेषत: ठाकरे यांना गाफील राहून चालणार नाही. राणे हे वचपा काढण्याच्या भावनेने कसे पेटलेले आहेत, याची प्रचीती त्यांच्या गुरुवारच्या मुंबई दौऱ्यात आली आहे. त्यामुळे आता पुढचे सहा महिने या लढतीचा धुराळा असाच वेगाने उडत राहणार, हे उघड आहे.

loading image
go to top