अग्रलेख : परिसस्पर्शाची आस

महाराष्ट्राला संस्कार आणि क्रांतीची शिकवण देणा-या साने गुरूजींच्या कर्मभूमीत अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात सुरू झाले आहे.
97th akhil bharatiya marathi sahitya sammelan at amalner
97th akhil bharatiya marathi sahitya sammelan at amalnerSakal

मराठी भाषा मरत असल्याबद्दल नुसते गळे न काढता साहित्याशी तरुण पिढीला जोडून घ्यायला हवे. त्यासाठी संवादाच्या नव्या वाटा धुंडाळायला हव्यात.

महाराष्ट्राला संस्कार आणि क्रांतीची शिकवण देणा-या साने गुरूजींच्या कर्मभूमीत अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात सुरू झाले आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी `अमळनेरचे अमर हुतात्मे` हा पोवाडा लिहून अमळनेरच्या लढवय्या वृत्तीचा गौरव केला आहे. साने गुरुजींच्या संस्कारातून प्रेरणा घेऊन उत्तमराव पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबाने स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले.

याच नगरीत आजपासून(ता.३) १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनही सुरू होत आहे. यानिमित्ताने बहिणाबाई चौधरी, बालकवी, महानोरांच्या खानदेशात होत असलेला साहित्याचा जागर साहित्यप्रेमी आणि रसिकांसाठीही पर्वणी ठरेल. अमळनेरसारख्या छोट्या शहरात अखिल भारतीय संमेलन घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने एक धाडसी पण कौतुकास्पद पायंडा पाडला आहे.

संमेलनाच्या निमित्ताने त्या परिसरातील वाड्.मयीन पर्यावरणाला निश्चितच चालना मिळू शकेल. संमेलनाला वारकऱ्यांच्या निष्ठेने दरवर्षी हजेरी लावणारे साहित्य रसिक ज्या स्वागतशील वृत्तीने संमेलनाचा विचार करतात, तेवढा सरळ विचार संमेलनाच्या आयोजकांच्या डोक्यात नसतो.

संमेलनाच्या स्थळनिश्चितीपासून, निधी मिळवण्याच्या उद्देशाने राजकारण सुरू होते आणि संमेलन पार पडेपर्यंत संमेलनावर राजकारणाचा आणि अर्थकारणाचा वरचष्मा असतो. संमेलनाला उपस्थित असलेले मुख्यमंत्री श्रोत्यांमध्ये पहिल्या रांगेत बसल्याची घटना अलीकडच्या दोन दशकांमधली आहे, यावर विश्वास बसणार नाही. याचे कारण आज मुख्यमंत्रीच नव्हे, तर त्यांच्या कर्मचारीवर्गासाठी मंचावर व्यवस्था करावी लागते.

निधी देणाऱ्या सरकारच्या उपकाराच्या ओझ्याखाली अभिव्यक्तीचा हा मंच किती वाकणार? हा प्रश्न आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत असताना काहीएक लोकशाही पद्धत होती. महामंडळाने निवडणूक बंद केली आणि महामंडळाच्या घटकसंस्थांमधील गटबाजी आणि शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जिथे होते, त्याच शहरात त्याच तारखांना अलीकडच्या काळात विद्रोही साहित्य संमेलन भरवले जाते. अखिल भारतीय साहित्य संमेलन सर्वसमावेशक नाही आणि ते विशिष्ट वर्गाचे संमेलन असल्याचा आरोप करून विद्रोही संमेलन सुरू झाले. विद्रोहाची दखल घेऊन अखिल भारतीय संमेलनाने स्वतःमध्ये बदल घडवायला हवा होता, परंतु एखाद्या-दुसऱ्या वर्षाचा अपवाद वगळता तसे घडले नाही.

एकीकडे विद्रोही संमेलनात वर्तमानाला भिडणारे विषय असतात, तर अखिल भारतीय संमेलनात त्याच त्या पारंपरिक आणि वर्षानुवर्षे चर्वितचर्वण केलेल्या विषयांचे दळण दळले जाते. अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. शोभणे यांची साहित्यसंपदा गुणात्मक आणि संख्यात्मकदृष्ट्याही दखलपात्र आहे.

अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणात शोभणे यांनी सरकारला मराठीविषयीच्या अनास्थेबद्दल काही सुनावले आहे आणि मराठी शाळा बंद पडत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. पण यात सरकारइतकीच मराठी संस्था, विद्यार्थी आणि पालकवर्ग किंबहुना सर्वसामान्य मराठीजन या सर्वांचीच जबाबदारी आहे. ती कोणती याचे दिग्दर्शन अध्यक्षांकडून व्हायला हवे. त्यातून व्यापक सांस्कृतिक चळवळ उभी राहिली तरच काही बदल घडू शकेल.

अन्यथा संमेलने होत राहतील आणि मराठीविषयीचे अरण्यरुदनही. एकूणच या संमेलनांतून तशी धार का निर्माण होत नाही, याचे आत्मपरीक्षण आवश्यक आहे. समाजातील जळते प्रश्न हातात घेण्याच्या आणि वर्तमानाला भिडण्याच्या वृत्तीमुळेच लोकवर्गणीतून उभारलेल्या विद्रोही संमेलनात रसिकांची गर्दी अधिक असल्याचे चित्र अलीकडच्या काळात दिसू लागले आहे.

‘कोटीच्या कोटीची उड्डाणे’ घेणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी या गोष्टीचा विचार करायला हवा. तसे केले नाही तर विद्रोही प्रवाहापुढे ‘अखिल भारतीय संमेलन’ बाजूला फेकले जाईल. अमळनेरला अखिल भारतीय संमेलन घेताना साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून घेण्यात आले;परंतु प्रत्यक्षात या संमेलनात साने गुरुजींचा विचार सोडून बाकी सगळे आहे.

महामंडळाच्या अशा धोरणामुळेच भालचंद्र नेमाडे यांच्यापासून यशवंत मनोहर यांच्यापर्यंतचे कसदार साहित्यिक संमेलनापासून दूर राहिले आहेत. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या अखिल भारतीय संमेलनाने काळाबरोबर बदलायला हवे. मराठी भाषा मरत असल्याबद्दल नुसते गळे न काढता साहित्याशी तरुण पिढीला जोडून घ्यायला हवे. त्यासाठी संवादाच्या नव्या वाटा धुंडाळायला हव्यात.

अमळनेरमध्ये काही काळ राहिलेले शाहीर साबळे यांनी ‘अमळनेरच्या परिसस्पर्शामुळे आपल्या आयुष्याचे सोने झाले’ असे म्हटले आहे. अमळनेरच्या संमेलनाला गेलेल्या साहित्यरसिकांना आणि खानदेशातील साहित्यप्रेमींना तशी अनुभूती आली तर संमेलन सुफळ संपूर्ण झाले, असे नक्कीच म्हणता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com