अग्रलेख : शांततेची आस

अकोल्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त पोस्टमुळे दोन समाजात वादाला तोंड फुटले. जुने शहरातून दंगल भडकली.
Akola Riot
Akola Riotsakal
Summary

अकोल्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त पोस्टमुळे दोन समाजात वादाला तोंड फुटले. जुने शहरातून दंगल भडकली.

राज्यातील दोन ठिकाणचे हिंसक उद्रेक धोक्याचा इशारा देणारे आहेत. सरकारने आणि समाजानेही त्यांची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.

महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था स्थिती सर्वसाधारणपणे चांगली आहे. राज्यातील शांतताही बऱ्याच अंशी अबाधित आहे, ही समाधानाची बाब असली तरी या बाबतीत जराही बेसावध राहून चालणार नाही. अकोला आणि शेवगाव भागात घडलेल्या घटनांनी हा धोक्याचा कंदील दाखवला आहे.

अकोल्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त पोस्टमुळे दोन समाजात वादाला तोंड फुटले. जुने शहरातून दंगल भडकली. एकाचा बळी गेला, पोलिसांसह दहा-बाराजण जखमी झाले. अशा प्रसंगी अलीकडे तातडीच्या उपायांमधील एक उपाय म्हणजे इंटरनेट सेवा खंडित करणे हा आहे. यावेळीही तसेच करण्यात आले. हे वास्तवच समाजाच्या सद्यःस्थितीविषयी; त्यातही प्रामुख्याने तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी बरेच काही सांगून जाते. जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा सरकारने दोन पातळ्यांवर विचार करणे अपेक्षित असते.

एक म्हणजे तातडीचा प्रतिसाद आणि दुसरा म्हणजे दूरगामी. अकोल्याचे पालकमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना त्वरेने अकोल्यात पाठवले. पोलिसांनी ठोस भूमिका घेत कारवाईचे सत्र आरंभले आणि आता तिथे स्थिती नियंत्रणात आहे. अकोल्यातील वातावरण निवळत असतानाच शेवगावात रविवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने निघालेल्या मिरवणुकीवर दगडफेक झाली. आगी लावण्यात आल्या. या दोन्हीही ठिकाणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली. समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून मोठ्या प्रमाणात अटकसत्र राबवले. त्यामुळे आता दोन्हीही शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आता मुख्य प्रश्न आहे तो दूरगामी उपायांचा.

समाजस्वास्थ्य टिकविण्यासाठी वातावरण पोषक असावे लागते. राजकीय स्वार्थासाठी आगी लावण्याचे उद्योग हा तर कमालीचा बेजबाबदारपणा ठरेल. सरकार आणि एकूणच राजकीय वर्गाने आपल्यामुळे वातावरण दूषित होत नाही ना, याची काळजी घेतलीच पाहिजे. अर्थात या प्रश्नात केवळ त्यांचीच भूमिका आहे आणि समाजाची, नागरिकांची, संस्थांची काहीच भूमिका नाही, असे समजणे चुकीचे होईल. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. एखाद्या पोस्टमुळेदेखील समाजात तेढ निर्माण होणे, अफवा पसरणे; परिणामी शांततेला गालबोट लागणे अशा घटना वरचेवर घडताहेत.

सोशल मीडिया हाताळताना, त्यावर पोस्ट टाकताना आणि पुढे पाठवताना अधिक सजगतेची आवश्‍यकता आहे. त्याबाबत सरकारने कितीही नियम, कायदे केले तरी त्याच्या वापरकर्त्यांमध्ये सामाजिक भान आणि जाण यांची रुजवात अधिक गरजेची आहे. ‘सायबर सिक्युरिटी’ नावाची यंत्रणा अधिक सक्षम आणि सावध केली पाहिजे. विशेषतः सोशल मीडियावरील वादग्रस्त, समाजातील शांततेला तडा देणाऱ्या पोस्टवर नजर ठेवणे आणि प्रसंगी अशा पोस्ट पसरवणाऱ्या कारवाई करणे अशी ठोस पावलेदेखील पोलिसांना यामुळे उचलता येतील.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने कितीतरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत; पण त्यांचा वापरच जर वाईट कारणांसाठी व्हायला लागला तर कशी अनवस्था ओढवते, याचा प्रत्यय सध्या येत आहे. अर्थात समाजमाध्यमे हे या दंगलींचे एकमेव कारण आहे, असे नाही. त्यामुळे एकूण सामाजिक सामंजस्य कसे वाढेल, हेही पाहण्याची गरज आहे. अकोला आणि परिसराला दंगलीच्या घटना नव्या नाहीत. पणे ते अकोला इतिहासजमा झाले आहे हे निश्‍चित. तेथील समाज एकदिलाने प्रगतीची आणि विकासाची पावले टाकत आहे.

अशा स्थितीत रविवारी तिथे दंगल का उसळली, त्यामागे कोणते षड्‍यंत्र होते का, त्याचे बोलाविते धनी कोण होते, याची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत. त्याचप्रमाणे शेवगावातील मिरवणूक शांततेत सुरू असताना अचानक दगडफेकीला सुरवात होऊन तिचे दंगलीत रुपांतर होण्यामागे असलेल्या समाजकंटकांचा शोध घ्यावा. महत्त्वाची बाब अशी की, पोलिसांना अशा घटनांची कुणकुण लागली होती का, नसेल तर का नाही? आणि असेल तर त्याबाबत सावधगिरीचा उपाय म्हणून कोणती पावले उचलली गेली, याची चौकशी झाली पाहिजे.

दंगलीच्या अप्रिय घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यभरातील पोलिस आणि प्रशासनाने सज्ज राहिले पाहिजे. येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. त्यानिमित्ताने समाजातील वेगवेगळ्या घटकांना चुचकारणे, त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांना हात घालणे, मतपेढीच्या संवेदनशीलतेचा विचार करून काही घटना घडवून आणणे याच्यापासून ते माथी भडकावून अशांततेला निमंत्रण देण्यापर्यंतचे प्रकार घडू शकतात, याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस व प्रशासनाची सज्जता गरजेची आहे.

‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सकारात्मक आणि स्वागतार्ह पावले उचलली आहेत. तथापि, राज्यातील शांतता अबाधित राखण्याला अग्रक्रम द्यायला हवा. महाराष्ट्र पुरोगामी, विचारी, विवेकी आहे. साधकबाधक विचारांती निर्णय घेतो. तथापि, त्याचे समाजमन अस्वस्थ करण्याचे, काही बाबतीत अवास्तव भीती निर्माण करण्याचे उद्योग विविध पातळ्यांवर सुरू आहेत. त्यामुळेच सरकारने दोन्ही पातळ्यांवर उपाययोजना कराव्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com