अग्रलेख : दुफळीचे कंगोरे

अध्यक्षीय निवडणुकीची नेपथ्यरचना सुरू असताना अमेरिकेतील राजकीय चर्चाविश्व वाढत्या दुफळीने ग्रासलेले राहणे केवळ त्या देशाच्या नव्हे तर जगाच्याही दृष्टीने काळजीचे असेल.
Donald Trump
Donald Trumpsakal

अध्यक्षीय निवडणुकीची नेपथ्यरचना सुरू असताना अमेरिकेतील राजकीय चर्चाविश्व वाढत्या दुफळीने ग्रासलेले राहणे केवळ त्या देशाच्या नव्हे तर जगाच्याही दृष्टीने काळजीचे असेल.

कोणत्याही देशातील लोकशाही परिपूर्ण नि निर्दोष नसली तरी आजवर जेवढ्या शासनपद्धती होऊन गेल्या, त्यात हीच सर्वात चांगली पद्धती आहे, असे मानले जाते. ते रास्तही आहे. याचे कारण ती पद्धती कोणत्याही सत्ताधीशाला अनियंत्रित होऊ देत नाही. ठरावीक काळानंतर का होईना, राज्यकर्त्यांना लोकांपुढे जाऊन त्यांची मान्यता मिळवावी लागते. शिवाय सत्तेचे विभाजन आणि समतोल-नियंत्रणाच्या व्यवस्था यामुळे सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवला जातो.

व्यवस्थेपेक्षा मोठे होऊ पाहणाऱ्यांना वेळीच वेसण घातली जाते. सध्या अमेरिकी महासत्तादेखील याच अनुभवातून जात आहे. गेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांच्याकडून हरल्यानंतर हा पराभव पचवता न आल्याने रिपब्लिकन पक्षाचे नेते, माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी थयथयाट केला. कॅपिटॉल हिलवर हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या हल्ल्याला चिथावणी दिली ती ट्रम्प यांनीच, असा आरोप होता.

लोकशाहीतील सर्व पर्याय वापरत त्या प्रणालीलाच नख लावणे, हा एक चिंताजनक प्रवाह आता अनेक देशांत जाणवतो आहे. अमेरिकेत जे घडते आहे, ते यापेक्षा वेगळे नाही. कोलरेडो येथील सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प दोषी असल्याचा निकाल दिला असून, त्यामुळे पुन्हा निवडणूक लढविण्याच्या ट्रम्प यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले जाऊ शकते.

एवढ्या गंभीर आरोपाबद्दल अमेरिकेच्या एखाद्या अध्यक्षावरील आरोप राज्यातील न्यायालयात सिद्ध होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अद्याप फेडरल सरकारच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय ट्रम्प यांना उपलब्ध असला आणि तेथे त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असली तरी, जे झाले आहे, त्याने रिपब्लिकन पक्षाचीच नव्हे तर अमेरिकी राजकीय व्यवस्थेचीही प्रतिमा डागाळली गेली, यात शंका नाही.

एकूणच हडेलहप्पी कारभार आणि ट्रम्प हे समीकरणच बनले आहे. पण ही कथा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. काळ्या-पांढऱ्या रंगात ती रंगवून ट्रम्प यांना खलनायक ठरवून मोकळे होणे सोपे आहे; पण प्रश्न त्यापलीकडील आहे. एकूणच अमेरिकी समाजात वाढत असलेली दुफळी चिंताजनक आहे. न्यायालयाच्या हेतूंविषयी शंका घेण्याचे कारण नाही.

परंतु या निर्णयावर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, त्यावरून ही दुफळी तर दिसतेच; पण त्याचबरोबर अमेरिकी न्यायव्यवस्थाही राजकीयीकरणाने झाकोळली गेली आहे का, याची शंका निर्माण होते. कोलेरेडो न्यायालयातील निर्णय अपेक्षितच होता, असे सांगितले जात आहे आणि फेडरल न्यायालयात ट्रम्प यांनीच नेमलेले तीन न्यायाधीश असल्याने तेथे ट्रम्प यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता उघडउघड व्यक्त केली जात आहे.

अशा प्रकारच्या प्रतिक्रिया स्वायत्त आणि निःपक्ष न्यायसंस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे करतात. शिवाय आपल्या बाजूने निर्णय दिला की न्यायसंस्था स्वतंत्र आणि विरोधात गेली की ती पक्षपाती असा दृष्टिकोन अमेरिकेतही अनेकांच्या बाबतीत दिसतो. अध्यक्षीय निवडणुकीची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे. २०२०मध्ये ज्यो बायडेन अध्यक्ष झाल्यापासून त्यांची लोकप्रियता उत्तरोत्तर घसरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

वेगवेगळ्या सर्वेक्षणांतून ट्रम्प यांची लोकप्रियता वाढते आहे तर बायडेन यांची उताराला लागल्याचे दाखवले आहे. हा फरक ३७-३८ टक्के आणि ४४-४५ टक्के एवढा लक्षणीय दिसतो आहे. जनमताचा झोका जर एवढा विरोधात जात असेल तर ट्रम्प रिंगणातच न येणे हेच डेमोक्रॅटिक पक्ष आणि बायडेन यांच्या पथ्यावर पडणारे आहे.

त्यामुळे साऱ्या प्रचाराचा, माहितीप्रसाराचा रोख ट्रम्प हे मुळातच निवडणूक लढविण्यास कसे अपात्र आहेत, हे सांगण्याकडे आहे. आपल्या एकूण वैचारिक परिघाबाहेरील व्यक्ती सत्तास्थानी येणे हे वास्तव डेमोक्रॅटिक पक्षाला पचविणे अवघड जात आहे. हिलरी क्लिंटन यांना हरवून पहिल्यांदा ट्रम्प सत्तेवर आले तेव्हापासून लागलेल्या ‘सुतका’तून अद्यापही या पक्षाचे बरेच नेते नि सहानुभूतिदार बाहेर येऊ शकलेले नाहीत.

ट्रम्प यांच्या मांडणीचा वैचारिक मुकाबला लोकांमध्ये जाऊन करण्याची जिद्द या पक्षाने गमावली आहे काय, असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. परंतु त्यांच्या या पवित्र्यामुळे दुफळी आणखीनच वाढण्याची शक्यता असून स्थलांतरितांच्या विरोधातील ट्रम्प यांचा प्रचारही त्यामुळे अधिकाधिक तिखट होत चालला आहे. दुसरीकडे बायडेन यांच्या कारभारातून निर्माण झालेले प्रश्न आहेत.

जगात दोन मोठी युद्धे सुरू असून ती थांबविण्याबाबत अमेरिकेकडून कोणताच प्रयत्न परिणामकारक होताना दिसलेला नाही. त्यामुळे जगाच्या दृष्टीनेही बायडेन यांचा एकूण कारभार निराशाजनक ठरला, हे मान्य करावे लागेल. अध्यक्षीय निवडणुकीची नेपथ्यरचना सुरू असताना अमेरिकेतील राजकीय चर्चाविश्व वाढत्या दुफळीने ग्रासलेले राहणे केवळ त्या देशाच्या नव्हे तर जगाच्याही दृष्टीने काळजीचे असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com