अग्रलेख : उंच झोक्याचा ‘अर्थ’

शेअर बाजाराने उंच झोका घेतला म्हणून त्या आधाराने निष्कर्षांची मोट बांधणे, हे फारच धाडसाचे असते.
Indian Economy
Indian EconomySakal

भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आता आव्हान आहे ते मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे.

शेअर बाजाराने उंच झोका घेतला म्हणून त्या आधाराने निष्कर्षांची मोट बांधणे, हे फारच धाडसाचे असते, याचे कारण अभ्यास-आडाखे, भावना, अंदाज, भीती, भाकीत, विश्वास अशा वेगवेगळ्या गोष्टींचे मिश्रण या हेलकाव्यांना कारणीभूत ठरलेले असते. त्यातून अर्थव्यवस्थेच्या पायाभूत स्थितीविषयी काही निष्‍कर्ष काढणे, हे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे ठरू शकते.

पण काहीवेळा मात्र त्यातून सूचित होणाऱ्या प्रवाहांकडे दुर्लक्ष करता येत नाही. सेन्सेक्सने उसळी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडी माघारही घेतली, तरीपण निर्देशांकाने सत्तर हजाराच्या मुक्कामाला केलेला स्पर्श ही घटना नक्कीच दखलपात्र आहे. भारतीय अर्थव्यवस्थेपुढे अनेक प्रश्न आणि आव्हाने आहेतच आणि त्यांना तोंड देण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे, यात कोणतीही शंका नाही.

मात्र सेन्सेक्समुळे दिसणारे काही उजेडाचे ठिपके पुढच्या वाटचालीसाठी प्रेरक ठरतील, असे नक्कीच म्हणता येते. अनेक बड्या देशांना जाणवत असलेले आर्थिक ताण, त्यातच दोन ठिकाणी सुरू असलेले युद्ध, खनिज तेलाचे वाढणारे दर अशा अनेक कारणांच्या सावल्या जगभरातील शेअर बाजारांवर दिसत असल्या तरी भारतातील स्थिती आशादायक दिसते आहे, हे नाकारता येणार नाही.

रूळ बदलताना नेहेमीच खडखडाट होतो; आपल्याकडे जरा जास्तच. त्यामुळे आर्थिक सुधारणांच्या प्रत्येक टप्प्यावर विरोध तर झालाच; पण त्या बरोबरीनेच एकूण आर्थिक चित्र निराशाजनक रंगवले गेले. एका पाठोपाठ एक येत गेलेल्या संकटांमुळे ते आणखीनच गडद होत गेले. परंतु सगळाच अंधार नाही, हे वास्तव समजून घेण्यासाठी सेन्सेक्सची ऐतिहासिक झेप हे निमित्त योग्य ठरेल.

२०१७ मध्ये वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणल्यानंतर त्यातून निदान एक लाख कोटीचा महसूल जमा होईल का, याविषयीदेखील साशंकता व्यक्त होत होती. त्या शंका-कुशंकांची जळमटे भेदून आता `जीएसटी’चा महसूल एक लाख साठ हजार कोटींवर गेला आहे. पण हा मुद्दा केवळ एवढ्यापुरता मर्यादित नाही.

स्थानिक करांच्या वसुलीसाठी ठिकठिकाणी मालवाहतुकीचे ताटकळणारे ट्रक, त्यामुळे माल पोचविण्यात लागणारा विलंब, दीर्घ प्रतीक्षेमुळे होणारी इंधनाची नासाडी या गोष्टी जीएसटी आल्यामुळे टळल्याचा फायदा नक्कीच होतो. त्यातही वेळ वाचणे हा फायदा महत्त्वाचा. पायाभूत सुविधांच्या विकासाचा भागही यात आहे. रस्ते चांगले झाल्यानेदेखील मालवाहतूक वेगाने होते.

कंपन्यांचे उत्पन्न वाढल्याने त्याचा सकारात्मक परिणाम नक्कीच शेअर बाजारावर पडतो. सध्याच्या उसळीला बुडबुडा म्हणता येणार नाही. काही विशिष्ट कंपन्यांच्या बाबतीत तसे आहे; परंतु समग्र विचार करता हा झोका नक्कीच आशावादही उंचावणारा आहे. थकित-बुडिताच्या प्रश्नाने गांजलेल्या बॅंकिंगच्या क्षेत्रात झालेल्या स्वच्छता मोहिमेनंतर तेथेही परिस्थिती सुधारलेली आहे.

पण या सगळ्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा हा मागणीचे गोठलेपण दूर करणारा आहे. हळूहळू देशांतर्गत मागणी वाढत आहे, हे सुचिन्ह. त्यामुळेच परकी वित्तसंस्थांच्या हालचालींनुसार हिंदकळणारा निर्देशांक आता मात्र देशांतर्गत परिस्थितीच्या घटकालाही ठळक प्रतिसाद देताना दिसतो आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढले की परकी वित्तसंस्था तिकडे वळतात. याचा परिणाम आपल्या शेअर बाजारातील घसरणीत होतो.

परंतु तेथील व्याजदरवाढ थांबली आहे. शिवाय तेथील महागाईदरही कमी झाला आहे. सेन्सेक्सच्या झोक्याला या सगळ्या गोष्टी कारणीभूत झाल्या आहेत. यातून भारताला जो ‘संधि’प्रकाश दिसतो आहे, तो लक्षात घेऊन प्रयत्नांची गती वाढवायला हवी. वस्तुनिर्माण क्षेत्राकडे लक्ष देऊन तिथे आणखी वाढ कशी होईल, हे पाहायला हवे. उद्योगपूरक धोरणे हवीतच.

भारतात अलीकडे त्यावर जवळजवळ सहमती दिसते. प्रश्न निर्माण होतो तो तपशीलाचा. त्या बाबतीत सरकारच्या कौशल्याचा कस लागेल. याचे कारण आर्थिक-औद्योगिक प्रगतीसाठी धोरणात्मक सातत्य हवे असते. चढउतारांच्या परिस्थितीतही ते टिकवणे हे देशांतर्गत पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवरही देशाची विश्वासार्हता वाढविणारे असते. गुंतवणूकदार त्याचा विचार करतात.

बऱ्याच बाबतीत ते दिसत असले तरी अनेकदा राजकीय अपरिहार्यता वरचढ ठरतात आणि त्यापुढे सरकार वाकते. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचे उदाहरण ताजेच आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणे, करदात्यांच्या पैशातून खिरापती वाटणे, त्यात स्पर्धा करणे यापेक्षा दूरगामी आर्थिक धोरणे आखली तर अर्थव्यवस्थेला त्याचे फायदे मिळतात.

झोका जसा उंच जातो, तसाच तो खालीही येऊ शकतो; परंतु पायाभूत स्थिती उत्तम असेल तर त्याची काळजी करण्याचे कारण नसते. रिझर्व्ह बॅंकेने भारताच्या आर्थिक वाढीच्या दराचा आधीचा अंदाज बदलून तो सात टक्क्यांजवळ राहील, असे म्हटले आहे. इतर पतमानांकन संस्थांनीही आधीच्या अंदाजापेक्षा भारताची वाढ चांगली होईल, असा निर्वाळा दिला आहे. आता आव्हान आहे ते मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com