अग्रलेख : पब्लिक, पाऊस, पैसा! editorial article writes ipl cricket public rain money | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hardik pandya and mahendra singh dhoni

अग्रलेख : पब्लिक, पाऊस, पैसा!

‘आयपीएल’ हा क्रिकेटचा ऊरुस आहे, तिथे पैशांचा पाऊस धुवांधार कोसळतो. त्या पावसात ‘आयपीएल’शी संबंधित तमाम घटक सुखनैव चिंब होत असतात.

अखेरच्या दोन चेंडूंवर निर्णायक षटकार- चौकार मारत रवींद्र जडेजाने चेन्नई सुपरकिंग्जला ‘आयपीएल’चा महागडा करंडक पाचव्यांदा मिळवून दिला, मावळतीला निघालेल्या आपल्या कर्णधाराला अनोखी मानवंदना दिली आणि पब्लिकलाही खुश करुन टाकले. पावसाच्या सावटामुळे दोन दिवस या अंतिम लढतीचे कवित्व सुरु होते. पण अवकाळी पावसापेक्षा ‘आयपीएल’च्या मैदानात षटकार आणि चौकारांच्या हंगामी पावसाचा भाव मोठा! चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची ही अखेरची ‘आयपीएल’ स्पर्धा असेल, असेही बोलले जात होते.

एक्केचाळीस वय असलेल्या या जुन्याजाणत्या फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याआधीच निवृत्ती घेतली असली तरी ‘आयपीएल’च्या जत्रेत मात्र तो आवर्जून खेळतो. अंतिम सामन्यात तो शून्यावर बाद झाला हे खरे; पण त्याआधी ‘गुजरात टायटन्स’च्या शुभमन गिल या आजच्या सर्वात चुस्त आणि तरुण फलंदाजाला यष्टिचित करताना यष्टिरक्षक धोनीने जी चपळाई दाखवली, ती पाहता त्याच्याठायी अजून भरपूर क्रिकेट उरले आहे, याची साक्ष मिळाली.

‘निवृत्ती जाहीर करायला ही आदर्श वेळ आहे, हे मान्य; पण ही बाब स्वीकारणे पब्लिकच्या प्रेमामुळेच कठीण झाले आहे,’ असे सामन्यानंतर धोनी म्हणाला. या संपूर्ण ‘आयपीएल’च्या हंगामात ज्या ज्या वेळी महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरला, त्या त्या वेळी त्याच्या नावाचा जयघोष देशभर घुमला. त्याचे मैदानात असणे हीच मुळात चेन्नई संघासाठी जमेची बाजू आहे, याचे प्रत्यंतर वारंवार येत होते. दहा वेळा अंतिम फेरीपर्यंत गेलेल्या या संघाने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे.

वीस कोटी रुपयांचे इनाम असलेल्या या स्पर्धेत आजवर शंभर कोटींची इनाम रक्कम तर चेन्नईकडेच गेली आहे, असा याचा सरळ अर्थ! यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये ‘गुजरात टायटन्स’मधून खेळणारा शुभमन गिल, रिद्धिमन सहा, ‘कोलकाता नाइट रायडर’चा रिंकू सिंग, ‘मुंबई इंडियन्स’चा मधवाल, चेन्नईचा ज्युनियर मलिंगा म्हणून ओळखला जाणारा पातिराणा असे अनेक तरुण क्रिकेटपटू चमकले. शुभमन गिलच्या सातत्याचे कौतुक करायलाच हवे. तीन शतके आणि अर्धाएक डझन अर्धशतके झळकावणारा हा युवक फलंदाजीचे नवे धडे शिकवून गेला. एकाअर्थी ‘आयपीएल’ ही जशी पैशाची खाण आहे, तशीच ती क्रिकेटमधल्या उद्याच्या हिरेमाणकांचीही खाण आहे.

अर्थात, ‘आयपीएल’चा आणि -ज्याला ‘जंटलमन्स गेम’ म्हणतात त्या - शास्त्रशुद्ध क्रिकेट या खेळाचा तसा काही संबंध नाही. ‘आयपीएल’ हा क्रिकेटचा ऊरुस आहे, तिथे पैशांचा पाऊस धुवांधार कोसळतो. त्या पावसात ‘आयपीएल’शी संबंधित तमाम सर्व व्यक्ती, संघ, संस्था, उद्योगधंदे, सुखनैव चिंब होत असतात. काव्यात्मक रुपक वापरायचे, तर ‘आयपीएल’ हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आवारातला कल्पतरु आहे, तो सर्वांच्याच अंगावर समृद्धीचा सडा पाडतो. या खेळातला पाणी पिण्याचा अडीच मिनिटांचा वेळही पुरस्कर्त्यांना विकलेला असतो.

लढतीतल्या प्रत्येक क्षणाचे पैशात मोल होत असते. ‘आयपीएल’च्या संघांनाही दर मिनिटागणिक बख्खळ गल्ला गोळा करता येतो. क्रिकेट सिताऱ्यांनाही कोट्यानुकोटींच्या झेपा घेता येतात, जाहिरातदारांचेही फावते, आणि जाहिरात कंपन्यांचेही! पुरस्कर्त्यांनाही लाभ होतो, आणि पब्लिकही खुश होते. बेटिंगवाल्यांसाठी तर ही पर्वणीच असते. सारांश, या उत्सवात कोणीही विन्मुख राहात नाही. हे पैशाचे झाड ‘बीसीसीआय’च्या आवारात लावणारा ललित मोदी नामक ‘उद्योजक’ स्वत: परागंदा अवस्थेत परदेशात कुठेतरी फिरत असला तरी त्याने लावलेले हे रोप मात्र आता चांगलेच फोफावले आहे, यात शंका नाही. आजमितीस ‘आयपीएल’चे ब्रँड मूल्य पन्नास हजार कोटींच्या घरात गेले आहे.

पुरस्कर्त्यांकडून मिळालेला निधी, सामन्यांच्या तिकिटविक्रीतून आलेली रक्कम आणि प्रक्षेपण आणि डिजिटल हक्कांचा येणारा पैसा यांचे गणित मांडले तर दर सामन्यागणिक मंडळाला साधारणपणे १०७ कोटी रुपये मिळतात, असे आकडेवारी सांगते. ‘मुंबई इंडियन्स’ किंवा ‘चेन्नई सुपरकिंग्ज’सारख्या संघांचे ब्रँड मूल्यदेखील दहा हजार कोटींच्या आसपास आहे, हे लक्षात घ्यायला हवे. किरकोळ हक्कांची किंमत इथे जमेस धरलेली नाही, किंवा बेटिंगमध्ये होणारी उलाढालही ग्राह्य धरलेली नाही. खरी मज्जा पुढेच आहे!

‘आयपीएल’ नावाचे पैशाचे झाड लावणारे क्रिकेट नियामक मंडळ हा धर्मादाय ट्रस्ट आहे. त्यामुळे प्राप्तिकर भरण्याची भानगड नाही. हे मंडळ क्रिकेटचा प्रसार करण्याचे उदात्त कार्य करीत असल्याने पैसा कमावणे हा काही त्या मंडळाचा उद्देश नसल्याचा निर्वाळा न्यायालयातच देण्यात आला आहे. ‘आयपीएल’ हे क्रिकेटप्रसाराचे निरपेक्ष आणि उदात्त कार्य आहे, असा दावा कुणी करत असेल, तर त्यापेक्षा मोठा आर्थिक विनोद नाही. ‘आयपीएल’च्या माध्यमातून वर्षाकाठी तीनेक हजार कोटींचा लाभ पदरात पाडून घेणाऱ्या मंडळाला प्राप्तिकर भरण्यास भाग पाडण्यासाठी अर्थ मंत्रालय गेले दशकभर प्रयत्न करत आहे; पण अजून तरी त्यास यश आलेले नाही. अर्थात या आर्थिक गणितांमध्ये क्रिकेटवेड्या ‘पब्लिक’ला रस नसतो. पावसाने हिरमोड केला, तरी त्यांना फारसा फरक पडत नाही. असली ‘निरर्थक’ आर्थिक आकडेमोड, आणि निसर्गाच्या लहरीपेक्षा ‘आयपीएल’ची झिंग भलतीच ‘कडक’ आहे, हे ध्यानी घ्यायला हवे.