अग्रलेख : ‘वॉलेट’ सांभाळा!

सर्वच व्यवहार; त्यातही प्रामुख्याने आर्थिक व्यवहार सुरळीत चालायचे असतील तर नियमांचे भक्कम कोंदण अत्यंत आवश्यक असते.
paytm
paytmesakal

कारभारात पारदर्शकता नसेल तर संशयाचे धुके गडद होते. तसे होणे हे संबंधित कंपनी आणि तिचे ग्राहक यांच्यावर परिणाम करतेच; पण एकूण वित्तीय स्थैर्यावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण करते. नियामकांची भूमिका म्हणूनच महत्त्वाची.

सर्वच व्यवहार; त्यातही प्रामुख्याने आर्थिक व्यवहार सुरळीत चालायचे असतील तर नियमांचे भक्कम कोंदण अत्यंत आवश्यक असते. नियमांची चौकट आणि तिचे कसोशीने पालन हा एखादी व्यवस्था विकसित की मागासलेली हे ठरविण्याचा एक महत्त्वाचा निकष असतो.

परंतु ही चौकटच कमकुवत असेल, किंवा चौकट भक्कम; पण अंमलबजावणी ढिसाळ असेल तर गोंधळ तर माजतोच; पण त्या गोंधळात अनेक लोक विनाकारण भरडले जातात. भारतात केवळ वित्तीय क्षेत्राचा विचार केला, तर अनेक प्रकरणांत सर्वसामान्यांना असा फटका बसला आहे.

अधिक व्याजाचे आमिष दाखवून फसविणाऱ्या कंपन्यांपासून ते बुडालेल्या बॅंकांपर्यंत अनेक प्रकरणांत सर्वसामान्यांची ससेहोलपट झाली. पुरेशी खबरदारी न घेता कर्जवाटप करणाऱ्यांमुळे बॅंक रसातळाला गेली असेल तर त्यात सर्वसामान्य ठेवीदारांचा दोष काय असतो? परंतु दोष एकाचा, शिक्षा भलत्यालाच असे अनेकदा घडते.

त्यामुळेच अशा आर्थिक बेबंद कारभाराला वेळीच पायबंद घातला जाणे, ही बाब फार महत्त्वाची ठरते. पेटीएम बॅंकेचे व्यवहार बंद करण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने जानेवारीच्या अखेरीस जारी केलेले निर्बंध हे त्याचे सर्वांत ताजे आणि ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल. या निर्बंधांची माहिती कळताच त्या कंपनीच्या शेअरचा भाव कोसळला आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.

‘पेटीएम’चे वॉलेट फेब्रुवारीअखेर बंद होणार असल्याने ‘फास्टॅग’सह अनेक सेवांसाठी ‘पेटीएम’चा उपयोग करणाऱ्या लाखो ग्राहकांत अस्वस्थता निर्माण झाली. आता अन्य कोणत्या बॅंकेमार्फत हे व्यवहार पुढे चालू ठेवता येतील, याची बोलणी सुरू आहेत; परंतु पेच या थरापर्यंत गेलाच कसा, हा प्रश्न निर्माण होतोच. कंपनीने आरोप फेटाळले असून २९ फेब्रुवारीनंतरही ग्राहकांना अडचण येणार नाही, असा दावा केला आहे. तरीही समोर आलेल्या प्रश्नांची दखल घ्यावी लागेल.

झटपट आर्थिक व्यवहार होण्यासाठी डिजिटल सुविधा तयार होणे ही मोठीच सोय आहे, याविषयी दुमत नाही. हेच ओळखून तंत्रज्ञानाधारित वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्या पुढे सरसावल्या. गुगल पे, फोन पे आदी सुविधा वापरून पैशाचे विनासायास हस्तांतर घडू लागले; परंतु ही ‘ॲप’ केवळ हस्तातंराची सेवा देतात, तिथे पैसे ठेवता येत नाहीत. त्यामुळेच या हस्तांतरसेवेला ‘वॉलेट’ची जोड देणारे ‘पेटीएम’सारखे स्टार्ट अप लोकप्रिय झाले.

नोटाबंदीनंतरच्या काळात तर कंपनीला वाढायला ‘सुपीक जमीन’च मिळाली. ‘पेटीएम’मार्फत झालेल्या व्यवहारांची एकूण रक्कम आहे आठ हजार कोटी रुपये. दुकानांमध्ये ‘पीटीएम’मार्फत खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या आहे जवळजवळ तीन कोटी. बॅंक खात्यात सर्वसामान्य ठेवीदारांकडून ‘केवायसी’ (नो युवर कस्टमर) भरून घेतले जाते, एवढेच नव्हे तर वारंवार ते अपडेटही करावे लागते.

ज्या नावाने खाते उघडले आहे, तीच व्यक्ती व्यवहार करते आहे ना, हे तपासले जाते. ‘पेटीएम’ला परवाना देताना जे नियम घालून देण्यात आले होते, त्यात ‘केवायसी’बाबतचे नियम फार कडक नव्हते. या फटीचा फायदा घेऊन एकाच खात्यावर अनेक व्यवहार केले गेले असू शकतात. मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा करण्याचे प्रयत्न या प्लॅटफॉर्ममार्फत झाल्याचा संशयही आहे.

शिवाय पेटीएम समूहातील अन्य कंपन्यांना या प्लॅटफॉर्मचा फायदा करून दिला गेला का, याविषयीदेखील प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘आरबीआय’ने स्पष्टपणे कारणे नमूद केलेली नाहीत; पण जे कठोर पाऊल उचलले आहे, ते पाहता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते. आता या सगळ्याची चौकशी होऊन सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा आहे; परंतु जे घडले त्यातून मिळालेल्या धड्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये.

कारभारात पारदर्शकता नसेल तर संशयाचे धुके गडद होते. या कंपनीपुरताच हा विषय नाही. तर वित्तीय व्यवस्थेच्या स्थैर्याचाही आहे. ते टिकवण्यात सर्वांत कळीची भूमिका असते, ती नियामकांची. ‘आरबीआय’ची कारवाई नियामकाची जबाबदारी पार पाडणारी आणि म्हणून स्वागतार्ह असली तरी एवढा काळ सर्वसामान्य गुंतवणूकदार अंधारात राहिले, हेही नाकारता येणार नाही.

आर्थिक विकासाची आकांक्षा, नवकल्पनांना प्रोत्साहन हे सध्याच्या परिस्थितीत गरजेचे आहे, हे कुणीही मान्य करेल. पण यात प्रमुख जबाबदारी नियामक यंत्रणांवर येते आणि या ‘आर्थिक खेळा’त भाग घेणाऱ्या खेळाडूंवरही. ‘नीति-नियमां’नुसार वागावे, असे आपण नेहमी म्हणतो. यातील ‘नियम’ ही बाब कायदेशीर आणि तांत्रिक असते.

त्यांची पूर्तता वेळच्यावेळी होत आहे ना, हे पाहाणे नियामक यंत्रणांचे काम असते. ते तर कार्यक्षम रीतीने झालेच पाहिजे; परंतु त्याहीपलीकडेची बाब ‘नीती’ची आहे आणि तिचा एवढा ऱ्हास आपल्याकडे का जाणवत आहे, हा एकूणच समाजापुढचा व्यापक प्रश्न आहे. खरे तर आपल्याला या दोन्ही प्रश्नांना भिडावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com