अग्रलेख : पांढऱ्या निशाणाचे रहस्य!

प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून, सध्याचे महाविकास आघाडी सरकार मोडून शिवसेनेने थेट भाजपशी हातमिळवणी करावी, असा या पत्राचा गाभा आहे.
Pratap Sarnaik
Pratap SarnaikSakal

भाजपशी जुळवून घ्या, असा सल्ला देणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवून शिवसेना आमदाराने खळबळ माजविली आणि राजकीय तर्क-वितर्कांना ऊत आला. पण या पत्रामागची अगतिकता तपास यंत्रणांच्या राजकीय वापरावर झगझगीत प्रकाश टाकते.

शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासह आपल्या महाविकास आघाडी सरकारातील घटकपक्षांवर केलेल्या टोलेबाजीच्या बातम्यांची शाई वाळायच्या आतच शिवसेनेचेच एक आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट या सरकारवरच पत्राचा बाण मारला आहे. सरनाईक यांनी हे पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिले असून, सध्याचे महाविकास आघाडी सरकार मोडून शिवसेनेने थेट भाजपशी हातमिळवणी करावी, असा या पत्राचा गाभा आहे. मात्र, आपल्या या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी जो काही युक्तिवाद केला आहे, तो बघितला की संपूर्ण शिवसेनेने पांढऱ्या रुमालात हात बांधून भाजपला शरण जावे, अशीच त्यांची इच्छा आहे. त्यांच्या या पत्रानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या बघता, हा पक्ष केंद्रातील तपास यंत्रणांचा राजकीय कारणांसाठी गैरवापर करतो, हेच उघड होते. मात्र, राज्याची सत्ता मिळवण्यासाठी कमालीच्या उतावीळ झालेल्या भाजप नेत्यांना त्याचीही पर्वा उरलेली नाही. सरनाईक नेमके कशामुळे इतके अगतिक झाले, त्याची कारणेही स्पष्ट आहेत. गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालय (‘ईडी’) ‘टॉप सिक्युरिटी’ प्रकरणात त्यांची चौकशी करत आहे. या चौकशीच्या विरोधात सरनाईक यांचा न्यायालयीन लढा सुरू असतानाही चौकशी थांबलेली नाही. दरम्यानच्या काळात तर याच चौकशीला तोंड द्यावे लागू नये म्हणून स्वत: सरनाईक हे ‘गायब’ झाल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या.

अशाच प्रकारच्या चौकशीचा ससेमिरा हा शिवसेनेचे मंत्री अनिल परब तसेच आमदार रवींद्र वायकर यांच्याही मागे लागत आहे, असेही सरनाईक यांनीच उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या या पत्रात नमूद केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा शिवसेनेच्या या नेत्यांमागे लागलेला ससेमिरा थांबवण्यासाठी भाजपशी जुळवून घ्यावे, अशी विनंती सरनाईक यांनी या पत्रातून शिवसेना पक्षप्रमुखांना केली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. एकाच वेळी शिवसेनेने भाजपशी ‘तह’ करावा, अशी मागणी करतानाच ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आपल्या अधिकारकक्षेतील चौकशी यंत्रणांचा वापर हा विरोधी राजकीय नेत्यांना त्रास देऊन, त्यांना आपल्या छावणीत येण्यास भाग पाडत आहेत, असा थेट दोषारोप करत आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या कारभारावर प्रकाश पडला. अर्थात, या आधीही अशा घटना घडल्या आहेत. पश्चिम बंगालमधील ‘नारद’ प्रकरणात तृणमूलच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले; तर भाजपमध्ये आलेल्यांवर मेहेरनजर दाखवली गेली. महाराष्ट्रात आता सरनाईक यांना भाजपला शरण जाणे कसे भाग पाडले जात आहे, हे या पार्श्वभूमीवर लगेचच लक्षात यावे.

सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकीय पातळीवर खळबळ उडणे साहजिकच होते. मात्र, उठता-बसता स्वबळाचा नारा देणारे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा ‘शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे!’ असे सांगून अधिक भाष्य करणे टाळले. तर शिवसेनेनेही मौन बाळगले. मात्र, ‘महाविकास आघाडीचे हे सरकार कधी एकदाचे पडते,’ यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या! प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर ‘भाजपशी जुळवून घ्या!’ हेच आम्ही २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर १५ दिवस घसा फुटेपर्यंत सांगत होतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे भाजपबरोबर न आल्यानेच शिवसेनेच्या नेत्यांमागे चौकश्यांचा ससेमिरा लावला गेला, यावरच अप्रत्यक्षरीत्या का होईना शिक्कामोर्तब झाले. गेल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील काही नेत्यांनी भाजपचा रस्ता धरला होता, तेव्हाही या नेत्यांच्या सहकारी संस्था टिकाव्यात आणि त्यांच्यामागे चौकश्यांचे शुक्लकाष्ठ लागू नये, म्हणूनच त्यांनी हा मार्ग पत्करल्याचे सांगण्यात येत होते. या अगतिकतेचा अर्थ या सर्वच नेत्यांचे हात कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गुंतलेले आहेत, असाही लावता येतो.

मात्र, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया बघता, आपले सरकार स्थापन करण्यासाठी भाजप कोणत्या थराला जाऊ पाहत आहे, त्यावरच झगझगीत प्रकाश पडला आहे.

सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना केलेल्या या विनंतीचे रहस्य आता आणखीनच गडद होत चालले आहे; कारण हे पत्र त्यांच्याकडून शिवसेनेनेच लिहून घेतले, असेही प्रसिद्ध झाले आहे. तसे असेल तर मग मुख्यमंत्र्यांनी हे पत्र महाविकास आघाडीतील आपल्याच मित्रपक्षांवर दबाव आणण्यासाठी लिहून घेतले, की त्यांची स्वत:चीच इच्छा भाजपबरोबर हातमिळवणी करण्याची आहे, असे प्रश्न उपस्थित होतात. मात्र, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची प्रतिक्रियादेखील केंद्रातील तपास यंत्रणांचा वापर राजकीय हेतूंसाठी होत असल्याची बाब अधोरेखित करणारी आहे. ‘आता अटक समोर दिसत असल्यानेच सरनाईक यांनी हे पत्र लिहिले आहे,’ ही सोमय्या यांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. सरनाईक यांच्या पत्रामागील आणखी एक रहस्य म्हणजे सरनाईक यांनी नऊ जून रोजी लिहिलेले हे पत्र नेमके शिवसेना वर्धापन दिनानंतरच माध्यमांच्या हाती लागणे, हे आहे. ‘पांढऱ्या निशाणा’मागील या साऱ्या रहस्यांचा उलगडा फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com