अग्रलेख : घातक औषधाचे बळी

कोणत्याही बाजारपेठेत पाय घट्ट रोवून उभे राहायचे तर गुणवत्तेबाबत दक्षता आणि त्याचे सातत्यपूर्ण कठोर पालन आवश्‍यक असते.
Medicine
MedicineSakal
Summary

कोणत्याही बाजारपेठेत पाय घट्ट रोवून उभे राहायचे तर गुणवत्तेबाबत दक्षता आणि त्याचे सातत्यपूर्ण कठोर पालन आवश्‍यक असते.

कोणत्याही बाजारपेठेत पाय घट्ट रोवून उभे राहायचे तर गुणवत्तेबाबत दक्षता आणि त्याचे सातत्यपूर्ण कठोर पालन आवश्‍यक असते. त्याच्याच बळावर व्यवसायात मोठी झेप घेता येते. सध्या जगात भारतीय औषधांचा दबदबा निर्माण झाला आहे,त्याला असेच प्रयत्न कारणीभूत आहेत. कोरोनाच्या महासाथीच्या काळात आपली ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ही गाजली आणि त्याने अनेक देशांना कोरोनावर मात करायला बळही दिले होते. तथापि, पश्‍चिम आफ्रिकेतील तीस लाख लोकसंख्येच्या गांबिया या ठिपक्यासारख्या वाटणाऱ्या देशात ‘मेडन फार्मास्युटिकल्स’ या भारतीय कंपनीच्या कफावरील औषधाने साठहून अधिक बालकांचा बळी घेतल्याच्या वृत्ताने केवळ संबंधित कंपनीच्या नव्हे तर देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) त्याची दखल घेत त्या कंपनीच्या प्रोमिथाझीन ओरल सोल्युशन, कोफेक्समॅलीन बेबी कफ सोल्युशन, मोकऑफ बेबी कफ सीरप, मॅगरीप एन कोल्ड सीरप यांच्या वापराबाबत इशारा दिला आहे. औषधांचा बालकांवर वापर केल्यानंतर त्यांच्या मूत्रपिंडांवर दुष्परिणाम होऊन ती दगावल्याचे म्हटले आहे.

या घटनेच्या निमित्ताने एकूणच आपल्या देशातील औषधांच्या दुष्परिणामांचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. औषधांचा अवाजवी मारा, भेसळ, अज्ञानातून परस्पर घेतली जाणारी औषधे वा मार्केटिंग कंपन्यांच्या आक्रमक प्रयत्नांमुळे रुग्णांच्या माथी मारली जाणारी औषधे असे प्रकारही नित्य घडत असतात. आरोग्यसुरक्षेवर असा घाला घालणारे सर्व गैरप्रकार रोखण्यासाठीही कंबर कसली पाहिजे. अर्थात केवळ कंपन्याच यात दोषी असतात, असे नाही तर अनेक डॉक्टर, औषधविक्रेते, रुग्ण आणि त्यांचे नातलग असे अनेक घटकही अनेकदा कारणीभूत ठरतात.

गांबियातील घटनेने भारतीय औषधे उद्योगाकडे संशयाची सुई वळली आहे. तांदळात खडे असतात म्हणून कोणी तांदूळ टाकून देत नसते. तसे एका कंपनीच्या कारभाराने इतरांवर शिंतोडे उडता कामा नयेत, याची दक्षता घेतली पाहिजे. मात्र संबंधित कंपनीच्या कारभारात दोष आढळल्यास तिच्यावर कठोर कारवाईही केली पाहिजे. तशी ग्वाही आपण ‘डब्लूएचओ’ला दिली आहे. भारताचे औषध महानियंत्रक तसेच केंद्रीय औषध मानक नियंत्रक संघटना यांनीही गांबियामधील घटनेची गंभीर दखल घेत कार्यवाही चालवली आहे. या कंपनीच्या औषधात डायइथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे घातक घटक असल्याचा दावा केला आहे. ही दोन्हीही रसायने बाजारात ग्लिसरीनच्या तुलनेत खूपच स्वस्तात उपलब्ध असतात. त्यांचा औद्योगिक वापरही मोठ्या प्रमाणात होतो. तथापि, औषधे तयार करताना ग्लिसरीनऐवजी ते वापरणे घातक असते. कारण अशा औषधाच्या सेवनाने मूत्रपिंड निकामी होणे, पोटदुखी, मळमळ, हगवण, डोकेदुखी असे त्रास होतात.

मूत्रपिंडे निकामी झाल्याने गांबियामधील मुलांचा मृत्यू झाल्याचे समजते. त्यामुळेच ही घटना गंभीर आहे. आपल्याकडेही ‘डायइथिलीन ग्लायकॉल’मुळे जम्मूमधील उधमपूर जिल्ह्यात २०२०मध्ये १२ मुलांचा, १९९८मध्ये दिल्लीत ३३ जणांचा तर १९८६मध्ये मुंबईत चौदाजणांचा मृत्यू झाल्याचा दाखला दिला जातो. तरीही ‘मेडन फार्मास्युटिकल्स’ कंपनीने त्यांचा वापर केला असल्यास ते गंभीर आहे. या कंपनीचा व्याप आणि उत्पादनक्षमता मोठी आहे. त्यांचे हरियानातील सोनिपत, पानिपत आणि कुंडली येथे औषधनिर्मिती प्रकल्प आहेत. आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत कंपनी औषधे निर्यात करते. केरळमधील न्यायालयाने कंपनीला एका प्रकरणात दोषी ठरवून शिक्षाही केली होती. गांबियातील घटनेसंदर्भात चौकशीनंतरच सत्य बाहेर येईल. ‘डब्लूएचओ’ने या मुलांच्या आरोग्य तपासणीत आढळलेल्या घातक घटकांबाबत वैद्यकीय विश्‍लेषणाचा अहवाल भारत सरकारला सादर केल्यावर तपास वेगाने होईल, अशी अपेक्षा आहे.

जागतिक बाजारपेठेतील दबदबा टिकवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गांबियातील घटना औचित्याची मानावी. भारतात १९७०मध्ये औषधाची बाजारपेठ ६५० कोटी रुपयांची होती, ती आता दीड हजार अब्ज रुपयांवर पोहोचली आहे. भारतातील औषधे निर्मात्यांनी देशासह परदेशातील बाजारपेठ काबीज केली आहे. गुणवत्तेबाबतच्या कठोर निकषांच्या पालनातून जागतिक गुणवत्तेतही आघाडी मिळवली आहे. २०४७पर्यंत हीच बाजारपेठ खूपच आक्राळविक्राळ रुप घेईल, असे सांगितले जाते. आपल्याकडे औषधेनिर्मितीबाबत निकष कठोर असले तरी त्यातील घटकांचा वापर, गुणवत्तेबाबत सातत्यपूर्ण देखरेख आणि सूचना याबाबत सरकारी यंत्रणा कमी पडते. ती काही वेळा कानाडोळाही करते, हे निदर्शनाला आले आहे.

काही औषधे अमेरिकेच्या बाजारातून मागे घ्यावी लागल्याची नामुष्की आपल्यावर ओढवली आहे. यानिमित्ताने औषधाची मात्रा दूषित करणाऱ्यांवर, उद्योगाला बट्टा लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. औषध शिफारशी आणि विक्रीतील अपप्रवृत्तींना ठेचावे. बाजारपेठेत ‘दिल्ली मेड’ हा शब्द व्यावसायिक बदमाशीशी नाते सांगतो. अशा औषधनिर्मित्यांवर सरकारने वक्रदृष्टी वळवावी. जागतिक बाजारात केवळ अस्तित्व निर्माण करून चालत नाही; तर गुणवत्तेचे, कसोशीचे नवे मापदंड निर्माण करायचे असतात. त्यात आघाडी घेऊन भारतीय औषध उद्योगाने गांबियातील घटनेने निर्माण केलेले मळभ दूर करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com