अग्रलेख : संवेदनाच चितपट

कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत सत्ताधाऱ्यांकडून दाखविण्यात येत असलेली संवेदनहीनता ही चिंतेची बाब आहे.
Wrestler Agitation
Wrestler Agitationsakal

कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत सत्ताधाऱ्यांकडून दाखविण्यात येत असलेली संवेदनहीनता ही चिंतेची बाब आहे.

भारतीय क्रीडाक्षेत्रातील विशिष्ट गैरप्रकारांची लक्तरे महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय वेशीवर टांगली जात असतानाही, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे ‘बलाढ्य’ सरकार आपल्याच पक्षाच्या एका खासदारापुढे कसे हतबल झाले आहे, त्याचेच दर्शन मंगळवारी पुन्हा एकदा घडले.

गेला सव्वा महिना या महिला कुस्तीपटू भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष तसेच भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करून राजधानी दिल्लीच्या रस्त्यावर ठाण मांडून बसल्या होत्या. मात्र भाषणांतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ!‘ असा मंत्रजप करणारे पंतप्रधान मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्याकडे जराही लक्ष द्यावेसे वाटलेले नाही. त्याऐवजी नव्या ‘संसद भवना’च्या उद्‍घाटनाच्या सोहळ्यात हे महाशय थाटाने मिरवत असताना, या महिला कुस्तीपटूंशी हातघाईवर येत, त्यांना रस्त्यावरून फरफटत नेण्याचे काम दिल्ली पोलिसांनी नुकतेच केले.

राजधानीतील पोलिस केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे या महिलांवर ही कारवाई करण्याचे बळ या पोलिसांना कोणाच्या आशीर्वादामुळे प्राप्त झाले असेल, हे उघड आहे. त्यामुळे अखेर ‘ऑलिंपिक’ तसेच अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या या महिलांनी आपली पदके गंगार्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हे सारे पदकविजेते कुस्तीगीर हरिद्वार येथे जमाही झाले होते.

मात्र नरेश टिकैत यांच्या आवाहनानंतर पाच दिवस थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला. क्रीडापटूंसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकलेल्या पदकाचे मोल किती असते, हे सांगण्याचीही गरज नाही. काही क्रीडापटू तर पदके पूजेच्या देव्हाऱ्यात ठेवतात. इतके भावनिक नाते जडलेली ही पदके ‘गंगार्पण’ करण्याचा निर्णय जेव्हा एखादा खेळाडू घेतो, तेव्हा त्याच्या वेदनांची तीव्रता किती टोकाची असेल, हे कळते. पण ते जाणण्याची संवेदनशीलताही उरलेली नाही.

त्यामुळेच टीव्हीवरचे भाजपचे बोलके पोपट याची संभावना ‘स्टंटबाजी’ अशी करत आहेत. बक्षीसाची रक्कमही परत करा किंवा स्वतःच गंगार्पण व्हा, या प्रकारची भाषाही वापरली गेली. यावरून भाजपमधील काहींना सत्तेचा मद कसा चढला आहे आणि किमान संवेदनशीलतेशीच त्यांनी कशी फारकत घेतली आहे, हे दिसले. समाजातील पुरुषी मनोवृत्ती कसा फणा काढते, हे समाजात वेळोवेळी प्रत्ययाला येते. आरोप करणाऱ्या महिलेवरच दोषारोप करून तिच्या अब्रूविषयी कुजबूज केली जाते. दुर्दैवाने हे प्रकरणही त्याला अपवाद नाही.

गेला सव्वा महिना महिला कुस्तीपटू हे आंदोलन करत असतानाही भाजपची मंडळी हाताची घडी घालून, तोंडावर बोट ठेवून गप्प राहिली आहेत. महिला नेत्याही आवाज उठवायला तयार नाहीत. खरे तर पोलिसांनी या आंदोलकांना कसे वागवले, याचे थेट दर्शन सर्वांना झाले आहे. पण दिशाभूल करण्यासाठी ‘चॅट जीपीटी’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून या आंदोलक महिला व पोलिस एकत्रित सेल्फी काढत असल्याचे छायाचित्र तयार करून ते पसरविण्यात आले. ही आणखी एक गंभीर बाब या निमित्ताने समोर आली.

तंत्रज्ञानाच्या वापरातून समाजात कशाप्रकारे अनर्थ घडवले जाऊ शकतात, याची चुणूक दाखविणारा हा प्रसंग आहे. ब्रिजभूषण हे नेमके कोण आहेत आणि त्यांच्या हातात मोदी, शहा वा भाजप यांच्या अशा कोणत्या चाव्या आहेत की या सर्वांनी त्यांच्यापुढे नांगी टाकावी, असा प्रश्नही यामुळे उपस्थित झाला आहे. खरे तर या कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप करण्यापूर्वी ब्रिजभूषण गजाआड जायला हवा, अशा गंभीर गुन्ह्यांची त्याच्या नावे नोंद आहे. मोदी यांच्याच सरकारमधील एक मंत्री एम.जे. अकबर यांच्यावर २०१८ मध्ये अशाच स्वरूपाचे काही आरोप झाल्यावर त्यांची तत्काळ उचलबांगडी झाली होती.

मग आता ब्रिजभूषण याच्यावर कारवाई करण्यास हे सरकार तसेच भाजप हा पक्षही का कुचराई करत आहे, हे मोठे गूढ आहे. आता अयोध्येत ब्रिजभूषण यांच्या समर्थनार्थ मेळावे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. या कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले तेव्हा मोदी-शहा कर्नाटकाच्या स्वारीवर होते आणि आता पंतप्रधान राजस्थानात मेळावे घेत आहेत. खरे तर आपल्या कायद्यात लैंगिक शोषणाचा आरोप होताच, आरोपीला अटक करण्याची तरतूद आहे. पण आजवर ना कायदेशीर पातळीवर ब्रिजभूषणवर ठोस कारवाई झाली, ना राजकीयदृष्ट्या कारवाईचे पाऊल उचलले गेले. एकूणच कायदाव्यवस्थेविषयी अनेक प्रश्न निर्माण करणारे हे विदारक वास्तव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com