esakal | कोरोना त्सुनामीला वेळीच आवरा 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. देशातील एकूण बाधितांच्या निम्म्याहून अधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळताहेत. मृत्यूची संख्याही वाढत आहे. अतिवेगाने वाढणाऱ्या या कोरोना त्सुनामीला यंत्रणा व लोकांनीही वेळीच आवार घातला नाही, तर महाभयंकर स्थिती उद्‍भवण्याचा धोका आहे. 

कोरोना त्सुनामीला वेळीच आवरा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. देशातील एकूण बाधितांच्या निम्म्याहून अधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळताहेत. मृत्यूची संख्याही वाढत आहे. अतिवेगाने वाढणाऱ्या या कोरोना त्सुनामीला यंत्रणा व लोकांनीही वेळीच आवार घातला नाही, तर महाभयंकर स्थिती उद्‍भवण्याचा धोका आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वर्षभरात जगातील अनेक देशांचे कंबरडे मोडले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला झळ बसून मोठी किंमत चुकवावी लागली. अलीकडे बऱ्यापैकी जनजीवन सुरळीत झाले होते. लसींच्या उपलब्धतेमुळे मोठे आश्वासक वातावरण निर्माण झाले. असे असताना देशाच्या काही भागांत कोरोनाच्या विळख्याने पुन्हा डोके वर काढले. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या दोन दिवसांचा आढावा घेतला, तरी देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी निम्म्याहून अधिक बाधित एकट्या महाराष्ट्रातील आहेत. बळींची संख्याही वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित ४६ जिल्ह्यांपैकी २५ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई उपनगरे, ठाणे, नगर, जळगाव, अकोला, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ, जालना, बीड, लातूर, नंदूरबार, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, पालघर, रायगड, सांगली, सोलापूर आदींचा समावेश आहे. परिणामी काही अधिक प्रभावित भागांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाशिक, मराठवाड्याचा काही भाग व राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात सध्या हे निर्बंध लागू आहेत. तरीही रोजच कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक वाढत आहे.

हेही वाचा - रेकॉर्ड ब्रेक वाढ! यंदाच्या वर्षात एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद

केंद्रीय आरोग्य यंत्रणेनेही महाराष्ट्राला धोक्याचा इशारा दिला आहे. परिस्थितीत झपाट्याने सुधारणा झाली नाही, तर राज्यात पुन्हा कडक लॉकडाउन लागू शकते, असा इशारा सरकारने दिला आहे. कडक लॉकडाउन आपल्याला परवडणारे नाही. त्याला राज्याच्या विविध भागांतून विरोधही होत आहे. लॉकडाउनमुळे हातावर पोट असणारे सर्वसामान्य, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि छोटे व्यापारी यांना सर्वाधिक झळ बसते. अनेकांपुढे जगण्याची भ्रांत निर्माण होते. आता पूर्वी ज्याप्रमाणे लोकांना मदत केली गेली, तसे दातेही समोर येताना दिसत नाहीत. त्यामुळे कडक लॉकडाउनला विरोध हा होणारच. अशी स्थिती का उद्भवली, हा प्रश्न आहे. मध्यंतरी परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाल्याने कोरोनाची भीती जणू निघूनच गेली होती. त्यामुळे लोकही निष्काळजी झाले अन् यंत्रणाही सुस्तावली. या हलगर्जीमुळे आजची स्थिती निर्माण झाली. चाचण्यांची संख्या वाढवत नेऊन संपर्कात येणाऱ्यांचा शोध सुरूच ठेवला असता, तर आजच्या स्थितीला मोठा अटकाव बसला असता. गेल्या वर्षभरापासून सातत्याने कोरोना नियंत्रणाचा ताण यंत्रणेवर आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारते असे दिसत असतानाच यंत्रणा सुस्तावली. विलगीकरण केंद्रे थंडावली. गेल्या वर्षीच्या तुलनेत लोकांमधील भीतीही कमी झाली. अशा रितीने सर्वच बेसावध असताना कोरोनाने पुन्हा फणा काढला. त्याचा वेगही गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे. दिलासा केवळ एवढाच की, मृत्युसंख्या ही कमी दिसत आहे. मात्र, बाधितांची संख्या वाढत जाईल तशी बळीसंख्याही वाढण्याची भीती आहे. त्यामुळे या स्थितीला वेळीच आळा घालण्याची गरज आहे; अन्यथा अनियंत्रित परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. 

हेही वाचा - आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना दिल्ली सरकार पुरवणार सुरक्षितता; SOP जाहीर
लोकसंख्येचा वाढता भार पाहता कोरोना नियंत्रणाचे उपाय तोकडे पडताहेत. कितीही प्रयत्न करतो म्हटले तरी आरोग्य यंत्रणेच्या काही मर्यादा आहेत. एकवेळ अल्पावधीत जम्बो हॉस्पिटल उभे होईल; पण त्यासाठी लागणारा प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी कोठून आणणार? ते अल्पावधीत तयार होऊ शकणार नाहीत. कोरोनाच्या या संकटात केवळ यंत्रणांवर दोषारोप करीत बसण्यापेक्षा त्याचा सामना सर्वांनी मिळूनच करावा लागेल. लोकांनीही आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. कुठे आहे कोरोना? निवडणुका आहेत त्या राज्यांतील लोकांना नियम नाहीत का? हे प्रश्न विचारण्यापुरते ठीक आहेत. पण, आज आपल्याकडील स्थिती पाहता सरकारी यंत्रणेच्या सूचना काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. खरेदी, हॉटेलिंग, चित्रपटगृहे, लग्नसोहळा आदी ठिकाणी होणारी बेजबाबदार गर्दी टाळावी लागेल. होळी- धूलिवंदनाचा सण साजरा करताना आपल्याला अनावश्यक गर्दी टाळावी लागेल. आपल्याला संसर्ग हवा की संयम पाळायचा, हे पुन्हा एकदा ठरवावे लागणार आहे. सरकारी यंत्रणेनेही आपली जबाबदारी चोख बजावण्याची गरज आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी पंचस्तरीय उपाययोजना अमलात आणाव्या लागतील. पूर्वीप्रमाणे अधिक संसर्ग असलेल्या भागांची निवड करून तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतील. बाधित संख्येनुसार प्रभावी प्रतिबंधात्मक क्षेत्रे तयार करून तेथे किमान दोन आठवडे संपर्क शोधमोहीम राबवावी लागेल. औषधोपचार करावे लागतील. लक्षणे नसलेल्या किंवा थोडीफार लक्षणे असलेल्या बाधित रुग्णांच्या मोकाट फिरण्यावर निर्बंध आणावे लागतील. ही जबाबदारी केवळ उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर टाकून चालणार नाही. आवश्यक संख्येत विलगीकरण केंद्रे सुरू करावी लागतील. आज अनेक शहरांत संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित असल्याचे दिसत आहे. त्याला कारण बाधा झाल्यानंतर विलगीकरणाची पुरेशी सोय नाही. त्यामुळे घरातील एक सदस्य बाधित झाल्यास संपूर्ण कुटुंबाला लागण होते. सोबतच लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व सेवाकार्यात सक्रिय संघटनांची मदत घ्यावी लागेल. लोकांना लसीकरण केंद्रांपर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यासोबतच लसीकरण केंद्रांवरील सोयींबाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज आहे. एकूणच काय तर कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जे काही करावे लागेल ते करून ही साखळी वेळीच तोडणे गरजेचे आहे; अन्यथा पुढ्यात भयंकर धोका दिसत आहे.

loading image