अग्रलेख : काळोखात दोन तास!

चोवीस तास हाताशी अन्‌ उशाला असलेली माध्यमे माणसाला एकटे राहू देत नाहीत. उलट एकटे असतानाच ती अधिक शिरजोर होतात. त्यामुळेच अवघ्या दीड-दोन तासांत सारे जग ‘मेटा’कुटीला आले.
facebook and instagram
facebook and instagramsakal

चोवीस तास हाताशी अन्‌ उशाला असलेली माध्यमे माणसाला एकटे राहू देत नाहीत. उलट एकटे असतानाच ती अधिक शिरजोर होतात. त्यामुळेच अवघ्या दीड-दोन तासांत सारे जग ‘मेटा’कुटीला आले.

रात्रीचे नेमस्त भोजन आटोपून निवांत शतपावली करताना अचानक संपूर्ण गावातले दिवे जावेत, आणि मिट्ट अंधारात सारा आसमंत गुडुप होऊन जावा, तसे काहीतरी मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडले. रात्री नवाच्या सुमारास अचानक फेसबुक, इन्स्टाग्राम आदी समाजमंचांनी असहकार पुकारला. या मंचावर रमून गेलेल्यांची ‘खाती’ धडाधड ‘लॉगआऊट’ होऊ लागली.

कुणाशी बोलता येईना की काही लिहिता येईना. संपूर्ण जगाशी असलेला संपर्कच तुटून गेला. नाही म्हणायला ‘एक्स’वर थोडीफार संदेशांची रहदारी चालू होती, तिथे थोड्याच वेळात महापूर लोटला. ऐन रणभूमीवर असताना हातातील बंदुकीचा खटकाच जाम व्हावा, आणि गोळीच सुटू नये, अशा परिस्थितीत एखाद्या सैनिकाची जी अवस्था होईल, तशीच ‘यूजर्स’ची झाली.

फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आदी समाजमाध्यमे आता जनसामान्यांची सोबती झाली आहेत. चोवीस तास हाताशी आणि उशाला असलेली ही माध्यमे माणसाला एकटे राहू देत नाहीत. कारण ही माध्यमे आपण एकटे असतानाच अधिक शिरजोर होतात. ‘गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा’ हा दिलासा साथीला असतोच. म्हणूनच एकमेकांमधला संवाद कमी झाला आणि ही समाजमाध्यमेच ऊरावर बसली.

ही गुऱ्हाळे दोन तास बंद पडली आणि किती हाहाकार उडाला, हे आपण साऱ्यांनी पाहिलेच. विशेष म्हणजे ही ‘बंदी’ सरकारी यंत्रणेने लादलेली नव्हती की स्थानिक पातळीवरची नव्हती. संपूर्ण जगातील ‘यूजर्स’ना या दोन तासांत निराधार वाटले. मध्यरात्रीच्या सुमारास भारतात माध्यमांचे गाडे रुळावर आले; पण तेव्हा अमेरिका-युरोपात सकाळची गजबज सुरु झाली होती. दिवसाच्या सुरुवातीलाच त्यांना या निराधारावस्थेने गाठले होते.

नेमके असे काय घडले? अचानक ही माध्यमे मूक का झाली? खुद्द ‘मेटा’ या माध्यमांच्या मातृसंस्थेने काहीच धड खुलासा केला नाही. अंतर्गत यंत्रणा कोलमडल्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगीर आहोत, काम चालू असून लौकरच सारे काही पूर्ववत होईल’ एवढेच स्पष्टीकरण ‘मेटा’ कंपनीतर्फे देण्यात आले.

‘मेटा’चे जनक मार्क झुकेरबर्ग दोन दिवसांपूर्वीपर्यंत भारतात जामनगरला जागतिक विवाह सोहळ्यात रमले होते. त्यामुळे ‘लग्न अजून उतरलेले दिसत नाही’ अशी टोमणेबाजी लागलीच सुरू झाली. जगभरातील या संपर्कजाळ्याला अवकाशातल्या उपग्रहांची कुमक असते. परंतु, तेवढेच पुरत नाही.

इंटरनेटच्या महाजालासाठी सप्तसागरात अंदाजे २५ हजार किलोमीटर लांबीच्या केबल टाकल्या गेल्या आहेत. याद्वारेही माहितीचे दळणवळण चालू असते. या अवाढव्य केबलजाळ्यातील काही भाग लाल समुद्रातही आहे. तिथे हौथी दहशतवाद्यांनी काही केबल तोडल्या असल्याची खबर दोन दिवसांपूर्वीच हाँगकाँगच्या एका वृत्तसंस्थेने दिली होती. या घातपातामुळे अनेक माध्यमकंपन्यांनी आपापले दळणवळणाचे मार्ग बदलले होते.

मंगळवारचे समाजमाध्यमांचे बंद होणे, या कारणामुळे होते असे म्हणता येणार नाही. कारण बाकीचे इंटरनेट जाळे व्यवस्थित कार्य करत होते. किंबहुना ‘एक्स’ (माहेरचे आडनाव ‘ट्विटर’) या मंचाचे नवे मालक-चालक इलॉन मस्क यांनी ताबडतोब ‘ तुम्ही माझा संदेश वाचत असाल, तर याचा अर्थ आमचा सर्वर उत्तम काम करत आहे’ असे आपल्या ‘हँडल’वर जाहीर करुन टाकले! याला खवचटपणा म्हणायचे की व्यवसायसंधी, हे ज्याचे त्याने ठरवावे.

यामुळे जगभरच्या सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या नसत्या तरच नवल होते. वॉशिंग्टनमधून ‘व्हाइट हाऊस’ या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानातूनही ‘आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून आहोत’ अशी त्रोटक सूचना जारी करण्यात आली. तरीही नेमके कारण अद्यापही कळू शकलेले नाही.

'मेटा’ कंपनीच्या खुलाशावर विश्वास ठेवावा तर अंतर्गत व्यवस्था कोलमडल्यामुळे जागतिक संपर्कव्यवहार थांबला. याहून अधिक काही घडले नाही. अर्थात आजकालच्या युद्धखोरीने ग्रासलेल्या जगात एवढ्या खुलाश्यावर विश्वास ठेवणे जड जाते, हे खरेच.

अवघ्या दीड-दोन तासांत सारे जग ‘मेटा’कुटीला आले. ‘मेटा’च्या शेअरचा भाव उतरला. समाज माध्यमे ही काही निव्वळ मनोरंजनाची साधने नाहीत. अनेकांचे व्यवसायही त्यायोगे चालू असतात. त्यांनाही जबर फटका बसला. मुळात सतत जागृत असलेला हा माहितीचा ज्वालामुखी अचानक विझू शकतो, याची चुणूक मिळाली.

ही माध्यमे नसती तर किती बहार आली असती, नातीगोती पूर्ववत जिव्हाळ्याने जोडली गेली असती, असा एक हळवा सूर लावला जातो. पण तसे काहीही होत नसते, हे या दोन तासांत कळून चुकले! सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आपण सारेच या माध्यमांच्या किती आहारी गेलो आहोत, त्याचा छोटासा अंदाज आला.

फेसबुक किंवा इन्स्टावर तिन्हीत्रिकाळ ‘पडिक’ असणाऱ्या, आणि उत्साहाने आपल्या मतांच्या ‘भिंती चालवणाऱ्या’ सायबरयुगातील उटपटांग सोशल ज्ञानेश्चरांना आपल्या अवलंबित्वाचा साक्षात्कार या दोन तासांमध्ये झाला असावा, अशी एक भाबडी आशा तेवढी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com