या जगण्यावर :...तोचि साधू ओळखावा

Sant Tukaram Maharaj
Sant Tukaram MaharajSakal

-डॉ. दिलीप धोंडगे

‘जे का रंजले गांजले’ या चरणाने सुरू होणारा तुकोबांचा अभंग सर्वश्रुत आहे. माणसाने आपल्या जगण्याला जर काही कसोट्या लावून घेतल्या तर जगणे अर्थपूर्ण होते. स्वतःसाठी कोणीही जगते; पण स्वतःबरोबर इतरांसाठीही जगायचे परिमाण मिळवून दिले तर ते जगणे उच्च पातळीवर पोचते. असे जगणे उच्च पातळीवर पोहोचवणाऱ्या संतांचे वर्णन प्रस्तुत अभंगात आहे.

सामान्यतः मानवी स्वभाव किंवा प्रवृत्ती ही रंजल्या-गांजलेल्यांना झिडकारण्याची असते. आप्तस्वकीय असले तरी ओळख दाखवायची वृत्ती नसते. पण जे मोठे, उच्चपदस्थ असतात, त्यांच्याशी रुढार्थाने संबंध नसतानाही ओढूनताणून प्रस्थापित करायची सवय मात्र मुरलेली असते. जगण्याचा अर्थ गवसलेल्या व्यक्तींना मात्र ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे ‘हे विश्वचि माझे घर। ऐसी मति जेयाची स्थिर। किंबहुना चराचर। आपणचि जाहला।।’ असे वाटते. संतसज्जनांचे चित्त कसे असते? तर नवनीतासारखे. अंतर्बाह्य मृदू. ओले मूळ जसे खडकाला भेदते, तसे सज्जनाचे मन कठीण वास्तवालाही भेदून त्याचा स्वीकार करते. ज्याला अंगिकारणारे कोणीच नाही त्याला जो हृदयासी धरतो, अंतःकरणात स्थान देतो तोच संतसज्जन. आपल्या पोटच्या मुलावर जे प्रेम करायचे, तसेच घरी काम करणाऱ्यांवरही प्रेम करायचे, असा ज्याचा स्थायीभाव असतो, तो साधू असतो.

पहिल्या कडव्यातच तुकोबांनी साधू कसा ओळखावा, हे स्पष्ट केले आहे. दीन आणि दुःखी लोकांना जो आपले म्हणतो, ती व्यक्ती साधू समजावी. इतकेच नव्हे तर त्या व्यक्तीतच देव असल्याचे जाणावे. नराने चांगली कृती केल्यास नराचा नारायण होतो, असे हिंदीत वचन आहे. त्याचा अर्थ हाच होय. तुकोबा अशा सज्जनाच्या गुणसंकीर्तनात इतके रंगून गेले आहेत की, किती सांगू आणि किती सांगू नये, असे त्यांना झाले आहे. म्हणून अभंगाच्या अखेरच्या कडव्यात ते म्हणतात की: ‘तुका म्हणे सांगू किती। तोचि भगवंताची मूर्ती।’. सज्जन व्यक्तीच्या गुणांचे किती वर्णन करायचे! सज्जन व्यक्तीच्या गुणांचा प्रकर्ष म्हणजे ती भगवंताची मूर्तीच असते. देवरुप जाणावी यापासून ती साक्षात देवाची मूर्तीच असते, असे तुकोबांनी क्रमशः स्पष्ट केले आहे.

एखाद्याच्या मनात अशी शंका येऊ शकते की; रंजल्या गांजलेल्याला आपले म्हणणे काय अवघड आहे? खरोखरच अवघड आहे. या अभंगामध्ये तुकोबांनी ज्या तीन कसोट्या सांगितल्या आहेत, त्यांपैकी ही एक. केवळ शब्दाने आपले म्हणणे इथे अभिप्रेत नाही तर त्यांना प्रेम देणे, त्यांच्या अडीअडचणींचे निवारण करणे, त्यांच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी त्यांना समान लेखणे इत्यादी. हे सोपे अजिबात नाही. मानदंभासाठी सर्वसाधारणपणे जो आटापिटा असतो, त्यामध्ये हे बसत नाही. निरपेक्ष वृत्तीने दीनदुःखी लोकांना आपले म्हणणे, त्यांच्यासाठी सर्वस्व अर्पण करणे हे लौकिकाची आकांक्षा असणाऱ्यांच्या दृष्टीने अवघड आहे. मनापासून, अंतःकरणापासून निराश्रीताला, निराधाराला आपला म्हणून अंगिकारुन प्रेम देणे ही अवघड गोष्ट आहे.

माणसाची मूलभूत प्रवृत्ती ही आपपर भावावर आधारित असते. साहजिकच पोटचा मुलगा प्रिय आणि नोकरचाकर परके म्हणून त्याला आपल्या मुलाइतके जवळ करणे व प्रिय मानणे ही अवघड गोष्ट आहे. मुख्य म्हणजे स्वतःच्या मुलावर प्रेम करणे आणि इतरांना तत्सम प्रेमापासून दूर ठेवणे हे समाजसंमत आहे. तेच झिडकारून वागणे ही कसोटीच आहे. दीनदुःखी लोकांना आपले म्हणणे, ज्याला कोणी नाही त्याचा वाली होणे आणि हे समाजसंमत नसताना, ते करणे हे सज्जनपणाचे लक्षण आहे. सर अलेक्झांडर ग्रँट यांना हा अभंग फारच आवडत असे. तसेच महात्मा गांधी यांनी येरवड्याच्या जेलमध्ये गाथा वाचली, तेव्हा या अभंगाने त्यांच्या चित्ताचा ठाव घेतला होता. दोघांनी या अभंगाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com