

Union Budget India 2026-27
sakal
अर्थसंकल्प हा जमाखर्चाच्या ताळेबंदापुरता नसतो, तर उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या साऱ्या आकांक्षा-अपेक्षांचा विचार करून तयार केलेला पथदर्शी आराखडा असतो, या उक्तीचा प्रत्यय यावेळच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अधिक ठळकपणे जाणवतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सादर केलेल्या आपल्या सलग नवव्या अर्थसंकल्पाकडे (२०२६-२७) त्या दृष्टिकोनातून पाहावे लागेल. जागतिक परिस्थितीचे वास्तवभान राखून आणि भारताच्या दूरगामी वाटचालीचा विचार करून साकारलेला हा ऐवज आहे. युद्धे आणि ‘व्यापारतंटे’ सुरू असताना त्याची झळ कमी-अधिक प्रमाणात सर्वच देशांना बसते आहे. भारत त्याला अपवाद नाही. अर्थसंकल्पात या आव्हानाचे ठळक प्रतिबिंब पडले आहे. जागतिक पातळीवर अनिश्चित परिस्थिती असल्याने देशांतर्गत क्षमतांचा विकास करण्यावर आणि जिथे प्रगतीच्या शक्यता जास्त आहेत, त्या क्षेत्रांना पाठबळ देण्यावर अर्थमंत्र्यांचा भर आहे.