
जागतिक क्रमवाऱ्या, मानांकने, पदकतालिका इत्यादींबाबत भारताचे स्थान नेमके कोठे आहे, यांविषयी आपल्याला स्वाभाविक उत्सुकता असते. त्यामुळेच अशा प्रकारची आकडेवारी जर वास्तवाचा आरसा दाखवत असेल तर तिची दखल घ्यायला हवी, यात काही शंका नाही. नीती आयोगाच्या बैठकीनंतर आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ‘मोठी अर्थव्यवस्था’ या बाबतीत भारत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले. अमेरिका, चीन, जर्मनी यांच्यापाठोपाठ आता भारत आहे. जपानध्ये सध्या सुरू असलेल्या आर्थिक पेचप्रसंगांमुळे त्या देशाची अर्थव्यवस्था आकुंचन पावली, हे त्यामागचे एक कारण आहे.