अग्रलेख : अटी, शर्ती गैरलागू !

‘नरेंद्र मोदींसाठी मी महायुतीला पाठिंबा देणार आहे’, अशा शब्दांत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. हा पाठिंबा बिनशर्त आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.
Raj Thackeray & Narendra Modi
Raj Thackeray & Narendra Modiesakal

राजकीय अवकाश शोधण्याच्या धडपडीत असलेला पक्ष हीच प्रतिमा राज ठाकरे यांच्या भाषणाने पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली.

महाराष्ट्राच्या राजकीय पटावर एका नव्या नायकाने नव्या भूमिकेत प्रवेश केला आहे. पण हा प्रवेश आहे न खेळण्याच्या अटीवर! गेल्या निवडणुकीतही स्वत: न खेळण्याच्या अटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात सभा घेत, व्हिडिओ दाखवत फिरलेल्या राज ठाकरे यांनी पाच वर्षांच्या अवकाशानंतर आपल्या आधीच्या भूमिकेत ३६० अंशात बदल केला आहे.

‘नरेंद्र मोदींसाठी मी महायुतीला पाठिंबा देणार आहे’, अशा शब्दांत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. हा पाठिंबा बिनशर्त आहे, असे त्यांनी ठासून सांगितले. खरे तर राजकारणात अशाप्रकारच्या कोलांटउड्या नित्याच्याच झाल्या आहेत. तरी अटीतटीवर येणाऱ्या आजकालच्या प्रचलित राजकारणात, राज ठाकरे यांच्या शब्दांत बोलायचे तर, ‘व्यभिचारी वर्तमाना’त या ‘बिनशर्ती’मागची कारणे काय असतील, असा प्रश्न जनतेला पडणे स्वाभाविक आहे.

धूमकेतूप्रमाणे क्षितिजावर उगवलेला राज ठाकरे यांचा पक्ष काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत २००९ मध्ये ५.७ टक्के मते मिळवू शकला होता. २०१९ ला केवळ दहा वर्षांत हा आकडा अर्ध्याहूनही कमी म्हणजे सव्वादोन टक्क्यांवर आल्याने ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ स्वत:चे राजकीय अस्तित्व राखण्यासाठी धडपडते आहे, हे स्पष्ट होते.

राजकीय अवकाश शोधण्याच्या धडपडीत असलेला पक्ष हीच प्रतिमा राज ठाकरे यांच्या भाषणाने ठळकपणे समोर आली. या पक्षाला पुन्हा एकवार मोदींच्या छावणीत जाण्याची संधी मिळाली ती प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे यांच्यामुळे. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतली. त्यामुळे होत्याचे नव्हते झाले. जिथे उद्धव आहेत तिथे राज असू शकत नाहीत.

रक्ताच्या नात्याचा महाभारतीय संघर्ष या मातीचा स्वभाव आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून विभक्त झालेले भाजपचे नेते त्यानंतर राज यांच्या घराचे उंबरठे आशाळभूतपणे चढू लागले होते. ठाकरे ही भाजपची मानसिक गरज असावी! या निवडणुकीत बेरजेचे राजकारण करत भाजपने येईल त्याला स्वीकारायचे, न येईल त्याला यंत्रणांच्या माध्यमातून ईडी फेऱ्यात टाकायचे; मग नेता पटला तर आपल्यात घ्यायचा, नाही तर आत टाकायचा, असे धोरण स्वीकारल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

ईडीच्या कार्यालयात राज ठाकरे एकदा जाऊन आले होते अन् नंतर भाजपच्या फेऱ्याही वाढल्या होत्या. या तपाचे फळ मिळाले असून भाजप आता ‘मेरे पास माँ है’च्या धर्तीवर ‘हमारे पास ठाकरे है’ असे म्हणू शकेल. मुंबई ,ठाणे, नाशिक, पुणे या पट्टयात भाजपसाठी दोनतीन टक्क्यांची मतांची बेगमीही महत्त्वाची आहे. बाळासाहेबांचा खरा वारसदार आमच्याकडे आहे, असे आता सांगितले जाईल. मते खेचण्यासाठी मनसेच्या सभा होतील.

प्रकाशझोत आवडणारे राज त्यांच्या अमोघ वाणीने यावेळी मोदी हेच देशाचे भाग्यविधाते असल्याचे सांगत फिरतील. मोदी हे पंतप्रधान होण्यास लायक असल्याचे सर्वप्रथम म्हणाले होते राज ठाकरेच. ‘मुख्यमंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी त्यांच्यावर टीका करत नव्हतो, तर अपेक्षा पूर्ण होत नसल्याने टीका करीत होतो,’ हा राज ठाकरे यांचा खुलासा भाजपच्या अडचणीचा नाही, तर पथ्यावर पडणारा आहे. उद्धव ठाकरे सत्तांध झाले होते, हे ‘राजमुखा’तून बाहेर येणे निवडणुकीच्या रणात भाजपसाठी फार उपयोगाचे आहे. भाजपचा कार्यभाग साधला आहे; पण मनसेचे काय?

व्यभिचाराला कडाडून विरोध करतानाच जागावाटपाच्या व्यवहारात आपल्याला गम्य नसल्याचे ‘नायका’ने घोषित केले आहे. सगळे काही बिनशर्त आहे. बिनशर्तींमागच्या शर्ती त्यामुळेच समजून घेणे आवश्यक आहे. राज ठाकरे यांचे सभेतील महत्त्वाचे वाक्य आहे ते म्हणजे ‘कार्यकर्त्यांनी ‘विधानसभे’च्या तयारीला लागावे’ हेच.

महाराष्ट्राच्या भल्यासाठी काही महिन्यातच होणाऱ्या विधानसभेत नवा पट रचला जाणार आहे का? कार्यकर्त्यांनी स्वतःहून लोकसभेचा प्रचार करीत विधानसभेतील जागावाटपात ‘मनसे’साठी बेगमी करणे ही ‘बिनशर्त’मागची शर्त तर नसेल ना, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. राजकीय पुनरागमनासाठी ‘मनसे’ भाजपप्रणित महायुतीत स्वत:ची किंमत मोजून जागा पदरात पाडून घेणार हे उघड आहे.

मोदीप्रेमापासून सुरु झालेली ‘राज’यात्रा पुन्हा मोदीप्रेमापर्यंत येऊन पोहोचली आहे. सत्ता संधी मिळवून देत असते. देशातील हिंदुत्वमय वातावरणात पक्षाचे अन मुलगा अमितसह सर्व कार्यकर्त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या भावनेने मोदीटप्प्याच्या वळणावर विसावायचे असे तर गणितही असू शकते.

कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सत्तातुर असतात. त्यांना या निर्णयाचा आनंद होईलही; पण हा पाठिंबा नावापुरता आहे, जुलमाचा रामराम आहे की भविष्याची बेगमी म्हणून आहे, हे येणारा काळ सांगेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com