
बदलते युद्धतंत्र आंतरराष्ट्रीय संबंधांत, राजकीय संघर्षांच्या स्वरूपात आमूलाग्र बदल घडवून आणेल काय, अशी चर्चा सुरू असतानाच भारताने अचूक लक्ष्यभेद करणाऱ्या क्षेपणास्त्रवाहू ड्रोनची यशस्वी चाचणी केली, ही निश्चितच उल्लेखनीय अशी घटना. तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत आता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, हे आश्वासक आहे. लक्ष्य ठरविणे आणि नेमक्या ठिकाणी मारा करणे हा अत्याधुनिक युद्धतंत्रज्ञानाचा भाग बनला आहे आणि भारत या तंत्रज्ञानाच्या बाबतीत आगेकूच करीत आहे, हेच आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे यशस्वीरीत्या झालेल्या चाचणीने सिद्ध केले आहे. अर्थात संशोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि भारताला याबाबतीत सतत जागरूक राहावे लागणार आहे, यात शंका नाही.