
India's Roads: Where Potholes are Permanent and Accountability is Absent.
Sakal
सार्वजनिक दळणवळण व्यवस्था ही देशाच्या अर्थकारणाची महत्त्वाची नाडी असते. रस्ते चांगले तर वाहतूक सुरळीत. पण हल्ली देशभरातील रस्त्यांची स्थिती पाहिली की खड्डे हीच आपल्याकडच्या रस्त्यांची ओळख बनली आहे की काय, असा प्रश्न मनात येतो. आर्थिक राजधानी बृहन्मुंबई असो की विद्येचे माहेरघर असलेले पुणे किंवा ‘आयटी’सीटी बंगळूर.. आपल्याकडे रस्त्यांमधील खड्डे चांद्रभूमीवरील खड्ड्यांप्रमाणे जणू चिरस्थायी आहेत. बरे ते बुजविले जाण्याचा प्रयोग केला जातो, तोच मुळी ते पुन्हा पडावेत यासाठीच! पावसाच्या एका सडाक्यातच डांबर, खडी अन् सिमेंट सगळे काही अदृश्य होऊन जाते. ग्रामीण भागांत वाड्या, वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था नित्याचीच; पण जिथे उद्योग, व्यवसायांची दाटी आहे, तिथेही तीच अवस्था निर्माण होणार असेल तर ‘स्मार्ट’ वगैरे शब्द शहरांसाठी वापरणेदेखील हास्यास्पद वाटते.