

Impact of Ladakh Tensions on Security and Regional Stability
sakal
लोकशाही व्यवस्थेत सहमतीएवढेच असहमतीलादेखील महत्त्व असते. प्रत्येक असहमती म्हणजे राष्ट्रद्रोह नसतो. सरकारने तसे मानण्याचे कारण नसते. याचे कारण विरोधामुळे दुसरी बाजू कळते. व्यवस्थात्मक सुधारणांची एक मोठी संधी मिळू शकते. त्या संधीचे सोने करायचे की त्या विरोधकाला तुरुंगामध्ये डांबायचे, हे सत्ताधीशांनी ठरवायचे असते. तरुणाईच्या गळ्यातील ताईत आणि सामाजिक तसेच पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यासारख्या व्यक्तीवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई (रासुका) करून केंद्र सरकारने हा दुसरा पर्याय निवडला होता, असेच म्हणावे लागेल. आता लेह-लडाखमधील स्थिती पूर्वपदावर यावी, तेथे स्थैर्य निर्माण व्हावे, या हेतूने त्यांना सोडण्यात आले आहे.