अग्रलेख : परीक्षांचे मूल्य आणि मापन!

परीक्षापद्धतीतील बदल हा सर्वसमावेशक शैक्षणिक सुधारणांमधील एक महत्त्वाचा भाग आहे.
Exam
Examesakal

परीक्षापद्धतीतील बदल हा सर्वसमावेशक शैक्षणिक सुधारणांमधील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्या बाबतीत होणाऱ्या प्रयोगांमागची नेमकी भूमिका लक्षात घेऊन त्यांचे स्वागत करायला हवे.

सृष्टिव्यापारात घडणाऱ्या घटना-घडामोडींविषयी जवळजवळ प्रत्येकाला स्वाभाविक कुतूहल असते. त्यातून त्याला प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी तो जी धडपड करतो, तोच त्या व्यक्तीचा ज्ञानमार्गावरील प्रवास असतो. जी पद्धती अशा प्रकारच्या वाटचालीला सहाय्यभूत ठरते, प्रोत्साहन देते, ती चांगली शिक्षणपद्धती.

हे सूत्र लक्षात घेतले तर नववी ते बारावी या टप्प्यासाठी परीक्षा घेताना ‘ओपन बुक सिस्टिम’चा अवलंब करण्याच्या प्रस्तावाचे महत्त्व अधोरेखित होते. शिक्षणपद्धतीत सुधारणा घडविण्याच्या प्रयत्नांशी सुसंवादी असा हा बदल आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (‘सीबीएसई’) सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा बदल करणार असून त्यातून जाणवणाऱ्या बाबी, अनुभव लक्षात घेऊन त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल.

नुकत्याच तयार झालेल्या राष्ट्रीय माध्यमिक अभ्यासक्रम आराखड्यात या पद्धतीचा उल्लेख आहे. शिकवणे आणि शिकणे या दोन्ही गोष्टी खरे तर शिक्षणात महत्त्वाच्या. शिकविण्याचे शास्त्र, तंत्र, मंत्र याविषयी भरपूर चर्चा होत असते; परंतु शिकायचे कसे याचाही सखोल विचार व्हायला हवा. शैक्षणिक सुधारणांना त्यातूनच भक्कम पाया लाभेल. परीक्षापद्धतीतील बदल हा अशा सर्वसमावेशक सुधारणांमधील एक भाग निश्चितच आहे.

परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवताना पुस्तके पाहण्याची मुभा देणे म्हणजे कॉपीला दिलेली राजमान्यताच, असा अनेकांचा गैरसमज असतो. खरे तर हे कॉपीला प्रोत्साहन नसून उलट आपल्या सगळ्या शिक्षणव्यवस्थेत धुमाकूळ घालणाऱ्या ‘कॉपी’नामक विकारावरचा उतारा आहे, हे नीट समजून घ्यायला हवे.

राज्यात एकाचवेळी होणाऱ्या शालान्त परीक्षेच्या काही केंद्रांवर कॉपी पुरविणाऱ्यांच्या खटाटोपाच्या बातम्या आणि छायाचित्रे नेहेमीच प्रसिद्ध होत असतात. ‘कॉपी’ला रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठिकठिकाणी केला जातो. त्यासाठी मनुष्यबळ लागते. साधने पुरवली जातात. परंतु परीक्षा पद्धतीत बदल घडविल्यास एवढा सगळा जामानिमा ठेवण्याची गरजच उरणार नाही.

पुस्तकांमध्ये जे ज्ञान संग्रहित केले आहे, ते आपल्या उत्तरपत्रिकेत पुन्हा उतरवून काढायचे आणि त्यासाठी पाठांतर करायचे, यावर सध्याच्या पद्धतीत भर आहे. पाठांतर हे अजिबातच उपयोगी नाही, असे नक्कीच नाही. पण सगळा भर त्यावर असेल तर अनेक क्षमतांचा विकास होण्याची संधी हुकते. मनात प्रश्न उपस्थित होतात का, याला जास्त महत्त्व आहे.

‘झाडावरून सफरचंद खाली पडणे’ ही अगदी स्वाभाविक आणि कधीही अनुभवाला येऊ शकेल, अशी घटना. पण त्या सहज वाटणाऱ्या घटनेतूनही न्यूटनला ‘ते खालीच का पडते’ या प्रश्नाने छळले. त्यातून ‘फळ’ मिळाले ते एका सिद्धान्ताचे. अर्थात हे अगदी सर्वविदित असे उदाहरण आहे. परंतु कुतूहल जागे असणे आणि ते शमविण्यासाठी धडपड करणे या गोष्टी प्रत्येक स्तरावरील ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक असतात.

परीक्षा देताना पुस्तके वापरण्याची परवानगी असली तरी नेमके उत्तर शोधण्यासाठी आधीचा अभ्यासच उपयोगी पडतो. पुस्तके हाताळणे, चाळणे, वाचणे, त्यावर विचार करणे याची सवय लावलेली असली तर अशाप्रकारची परीक्षा देणे हे आनंददायी वाटेल. पुस्तकातला कोणता भाग प्रस्तुत आहे आणि त्याचा उपयोग करून घेत उत्तराची मांडणी कशी करायची, याचे कौशल्य विद्यार्थ्यांचेच असेल. प्रोत्साहन द्यायला हवे ते अशा प्रकारच्या अभ्यासाला.

एखादा उतारा पाठ आहे किंवा नाही, यापेक्षा त्या उताऱ्याचा आस्वाद विद्यार्थ्याला घेता येतो का, त्याचे विश्लेषण करता येते का किंवा त्यावर भाष्य करता येते का, याचे मोल केव्हाही जास्तच. या गोष्टींसाठी प्रवृत्त करणे हे शिक्षणपद्धतीतून साधले पाहिजे. एखादे सूत्र पाठ असायला हवे; पण त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करायचा, हे कळणे जास्त महत्त्वाचे.

उच्चशिक्षण संस्थांतील संशोधनप्रकल्पांचे स्वरूप हेही विविध प्रकारच्या ज्ञानस्रोतांचा वापर करून स्वतः घेतलेला शोध असेच असते. ‘ओपन बुक सिस्टिम’ परीक्षेच्या निमित्ताने शालेय स्तरावर त्याचा प्राथमिक का होईना परिचय होईल. या सर्वच दृष्टिकोनातून हा बदल स्वागतार्ह आहे. मात्र त्यात कस लागणार तो प्रश्नांची रचना करण्याचा. ती अधिक कल्पक रीतीने करावी लागेल. चिकित्सक विचार करण्यास प्रवृत्त करणारी असावी लागेल.

नवीन शैक्षणिक धोरणात जी ध्येय-धोरणे नमूद केली आहेत, ती नेमकी यावरच भर देणारी आहेत. परंतु केवळ परीक्षापद्धती बदलली आणि शालेय पातळीवरील शिक्षणाचे स्वरूप सध्या आहे, तसेच ठेवले तर मात्र यामागचा हेतूच निष्फळ ठरेल. त्यामुळेच शिक्षणाची ‘इकोसिस्टिम’ पूर्णतः बदलण्याच्या व्यापक आव्हानाचे क्षितिज डोळ्यासमोर ठेवायलाच हवे. त्या दिशेने जाताना सध्याच्या परीक्षापद्धतीची ‘परीक्षा’ केली जाणे अटळ आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com