अग्रलेख : अणुरणिया थोकडा..!

विश्‍वाची सुरुवात कुठून झाली या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांनी केला.
world
worldsakal

विश्‍वाची सुरुवात कुठून झाली या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांनी केला. आदिकणांना वस्तुमान प्राप्त करणाऱ्या ‘देवकणां’च्या शोधातील महत्त्वाचे संशोधन त्यांनी केले.

नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् ।

किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ १॥

- ऋग्वेद, दहाव्या मंडलातील सूक्त

सृष्टीची रचना, उत्पत्ती आणि विश्वाच्या प्रारंभाबद्दलचे माणसचे कुतूहल फार प्राचीन काळापासून आपल्याला दिसते. सृष्टीच्या आधी येथे सत् नव्हते, असत् नव्हते, आकाशतत्त्व नव्हते, अंतरिक्षही नव्हते. अस्तित्व नव्हते, न-अस्तित्वदेखील नव्हतेच. किंबहुना कुठलेच तत्त्व नव्हते. होते ते एक नि:शब्द, निराकार व्योम... असे नासदीय सुक्तात वर्णन आहे.

या सृष्टीचा कर्ता-धर्ता कोण? हा विश्वाचा पसारा कोण चालवतो? या अथांग विश्वाचा आदि-अंत कुठे आहे? विश्वाची उत्पत्ती नेमकी केव्हा आणि कशी झाली? आपल्या अस्तित्वाचा अर्थ काय? असे कितीतरी प्रश्न हजारो वर्षांपासून मानवाला पडले आहेत.

मध्ययुगीन काळात धर्ममार्तंडांनी दिलेल्या याच्या काही उत्तरांकडे जेव्हा विज्ञानयुगातील अनेक जण चिकित्सक नजरेने पाहू लागले, तेव्हा विषाचे पेले रिचवण्यापर्यंत त्यांना बरेच काही सहन करावे लागले. इतिहासाच्या पुढच्या टप्प्यात विज्ञानाच्या मदतीने काही प्रश्नांची उत्तरे सापडली. काही नवे प्रश्नही निर्माण झाले! एका महास्फोटात विश्वाचा प्रारंभ झाला, असा एक सिद्धांत मांडला गेला.

हा सिद्धांत बव्हंशी स्वीकारला गेला, तरी त्यात बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली नव्हतीच. साठीच्या दशकाच्या पूर्वार्धात पीटर हिग्ज नावाच्या ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञाने या विश्वाच्या खेळाची सुरुवात कुठून झाली, या चिरंतन प्रश्नाचे वैज्ञानिक उत्तर शोधण्याची धडपड केली आणि त्यांच्या पुढ्यात विषाचा नव्हे, तर अमृताचा प्याला आला. आरंभकणाचा शोध होता तो. काही काही कूटप्रश्न शतकानुशतके सुटत नाहीत.

पण विज्ञान आपला हट्ट कधी सोडत नसते आणि शोधकार्य अखंड सुरू राहते. पीटर हिग्जपुढले कोडे असेच कूट होते. चराचराचा आरंभ झाला, तेव्हाचा आदिकण कोणता असावा, याचा शोध घेताना त्यांनी काही गणिती आडाखे मांडले. त्या कणाला ‘गॉड्स पार्टिकल’ अर्थात ‘देवाचा कण’ असे म्हटले गेले. ही सृष्टी अणुरेणूंनी बनली. अणूपेक्षा थोकडे काही नाही, असेच जग मानून चालले होते, तेव्हा इलेक्ट्रॉनचे अस्तित्व विज्ञानाला समजले.

मग इलेक्ट्रॉन कुठल्या द्रव्याने बनला, हा प्रश्न उरलाच. कोलकात्याच्या सत्येंद्रनाथ बोस या अफाट प्रतिभेच्या शास्त्रज्ञाने क्वांटम फिजिक्सच्या संदर्भात काही शोधनिबंध लिहिले होते. पण विज्ञानजगताने त्यांची दखल घेतली नाही. अखेर आपले संशोधन त्यांनी जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांना कळवले. त्यांनी ते लेख शास्त्रीय नियतकालिकात छापून आणले, तेव्हा कुठे बोस यांची दखल घेतली गेली.

सत्येंद्रनाथ बोस यांनी १९२४ मध्ये इलेक्‍ट्रॉन, फोटॉन, आदी कणांच्या समूहांचे संख्याशास्त्रीय नियम शोधून काढले. या कणांच्या संख्याशास्त्राला ‘बोस-आइनस्टाइन स्टॅटिस्टिक्‍स’ असे नाव आहे. जे मूलकण ‘बोस-आइनस्टाइन स्टॅटिस्टिक्‍स’चे नियम पाळतात, त्या सर्व कणांना ‘बोसॉन्स’ म्हटले जाते. सत्येंद्रनाथ बोस यांच्या सन्मानार्थ हे नामकरण करण्यात आले. या संशोधनाच्या जोरावरच साठीच्या दशकात इलेक्ट्रॉनपेक्षाही सूक्ष्म कणांचा शोध लागू शकला.

पीटर हिग्ज यांनी मांडलेला ‘गॉड्स पार्टिकल’च्या (देवकण) अस्तित्वाचा सिद्धांत आज ‘हिग्ज- बोसॉन सिद्धांत’ म्हणूनच ओळखला जातो. ‘हिग्ज-बोसॉन’ हा ‘देवकण’ वस्तुमान प्रदान करतो, असा सिद्धान्त डॉ. हिग्ज यांनी १९६४ मध्ये मांडला. या जगात निर्वात, अस्तित्वहीन असे काहीच नाही. जेथे काही नाही, तेथेही एक विशिष्ट ‘क्षेत्र’ असतेच. त्याला ‘हिग्ज फील्ड’ असे म्हटले जाते.

हिग्ज यांच्या सिद्धांताला प्रत्यक्ष स्वरुपात सिद्ध करता यावे म्हणून चार देशांनी मिळून ‘युरोपीयन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च’ (‘सर्न’) ही संस्था स्थापली, आणि एक महाप्रचंड ‘हॅड्रॉन कोलायडर’ तयार केला. कित्येक किलोमीटर पसरलेली ही भूमिगत यंत्रणा विश्वाच्या उत्पत्तीचे कोडे सोडवण्यासाठी उभी करण्यात आली होती.

चार जुलै २०१२ रोजी हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात ‘देवकणा’चे अस्तित्व सिद्ध झाले. पुढे या संस्थेच्या विशाल हॉलमध्ये सन्मानाने पाचारण करुन हिग्ज यांचा वैज्ञानिकांनी सत्कार केला. तेव्हा डॉ. हिग्ज यांच्या रुद्ध कंठातून शब्द बाहेर पडले : ‘ओह, माय गॉड!’

अणुरेणूंना वस्तुमान नसते, तर ही सृष्टी एकसंध राहिलीच नसती, तारे निर्माणच झाले नसते. वस्तुमान नसेल तर हे विश्वच निरर्थक ठरते. आता हे ‘देवकण’ कुणी निर्मिले, आणि त्याची निर्मिती मानवाला करता येते का, यावर संशोधन सुरू आहे. त्यामध्ये यश आले तर अवघ्या विश्वाला नव्याने पालाण घालायला मानवप्राणी सज्ज होईल. रीत समजली की गणित सुटते, हा साधा नियम आहे.

नोबेल विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांनी विश्वनिर्मितीच्या शोधप्रवासातील एक महत्त्वाची रीत शोधून काढली, असे म्हणता येईल. नुकतेच वयाच्या ९४व्या वर्षी त्यांचे देहावसान झाले. सृष्टीच्या निर्मितीचे सगळ्यात अवघड कोडे सोडवणारा माणूस म्हणून त्यांची नोंद इतिहासात कायमची झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com