पुन्हा सलाम! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 31 डिसेंबर 2016

सलाम, पाडगावकर, तुम्हाला पुन्हा एकदा सलाम
लाथेच्या भयानं नाही, तर दोन्ही हात जोडून सलाम
खालमानेनं तुमच्या प्रतिभेला एक कडकडीत सलाम
आणि आणखी एक ज्यास्तीचा, कृतज्ञतेचाही सलाम!

कित्येक वर्षांपूर्वी तुम्ही मारलेल्या
अस्सल बारानंबरी सलामाला सलाम!
त्या अफलातून सलामाच्या 
कालातीततेलाही सलाम
तस्सेच्या तस्से वागून त्यात
शष्प फरक पडू न देणाऱ्या
आम्हालाही एक कडक सलाम!

लांडग्यापाठी धावणाऱ्या मेंढरांना सलाम
रोज डोचक्‍यात पडणाऱ्या खेटरांना सलाम

सलाम, पाडगावकर, तुम्हाला पुन्हा एकदा सलाम
लाथेच्या भयानं नाही, तर दोन्ही हात जोडून सलाम
खालमानेनं तुमच्या प्रतिभेला एक कडकडीत सलाम
आणि आणखी एक ज्यास्तीचा, कृतज्ञतेचाही सलाम!

कित्येक वर्षांपूर्वी तुम्ही मारलेल्या
अस्सल बारानंबरी सलामाला सलाम!
त्या अफलातून सलामाच्या 
कालातीततेलाही सलाम
तस्सेच्या तस्से वागून त्यात
शष्प फरक पडू न देणाऱ्या
आम्हालाही एक कडक सलाम!

लांडग्यापाठी धावणाऱ्या मेंढरांना सलाम
रोज डोचक्‍यात पडणाऱ्या खेटरांना सलाम

न बदललेल्या काळाला सलाम
नव्या पिढीच्या नव्या बाळाला सलाम
नव्याने लागलेल्या चळालाही सलाम
रात्रभर गळणाऱ्या नळालाही सलाम
पोपटपंचीच्या नवीन खुळाला सलाम
नव्याने उठलेल्या वळालाही सलाम
व्हाट्‌सॲपला सलाम सलाम
ट्‌विटरच्या हरेक हॅंडलला सलाम
लिंक्‍डइनला सलाम
इन्स्टाग्रामला सलाम
सोशल मीडिया नावाच्या निराकाराला सलाम!

रोजच्या रोज नवनवी स्वप्ने वाटणाऱ्याला सलाम
रोजच्या रोज नव्या छडीने दाटणाऱ्यालाही सलाम
‘मित्रों’म्हणत टाचेखाली चिरडणाऱ्यांना सलाम
चिरडूनही कधीही न ओरडणाऱ्यांनाही सलाम
‘नोटाबंदी झिंदाबाद’ म्हणणाऱ्यांना सलाम
‘नोटाबंदी मुर्दाबाद’ म्हणणाऱ्यांनाही सलाम

प्यारे सवासों करोंड देशवासीयों,
तुम्हे मेरा प्यार भरा सलाम!

हरहमेशा गार राहणाऱ्या मारुतीच्या बेंबीला सलाम
श्‍वासोच्छ्वासासाठी घेतल्या जाणाऱ्या झोंबीला सलाम
सोकॉल्ड जलयुक्‍त शिवारात डोलणाऱ्या लोंबीला सलाम
देशभर उठलेल्या चित्कारांच्या आगडोंबीला सलाम

नव्याकोऱ्या हिरव्या-गुलाबी नोटांना सलाम
पन्नास दिवसातल्या नरडीच्या घोटांना सलाम
तरीही परडी भरभरून देणाऱ्या व्होटांना सलाम
येड्यासारखे मागे धावणाऱ्या भोटांना सलाम

गेलेल्या वर्षाच्या मढ्याला सलाम
डोळे लावलेल्या आढ्याला सलाम
उघड्यावर उरकलेल्या झाड्याला सलाम
दिवसभर झोपून केलेल्या खाड्याला सलाम

रांगेतल्या प्रत्येक जनधन खात्याला सलाम
शंभर सोनारांना विकणाऱ्या लोहाराच्या भात्याला सलाम
सुपातले गिळंकृत करणाऱ्या जात्याला सलाम
भुकेपोटी संपलेल्या प्रत्येक नात्याला सलाम

दाढेखाली रगडून क्‍यालिंडरं खाणाऱ्या काळाला सलाम
गेलं वर्ष पुरून आणलेल्या नववर्षाच्या बाळाला सलाम
जेहत्ते काळाचे ठायी खाटल्यावरच्या दरीला सलाम
खाटल्यावर दुर्दैव आणून देणाऱ्या हरीला सलाम

सलाम, पाडगावकर, खरंच सलाम!
लाथेच्या भयानं नव्हे, तर एक कृतज्ञतेचा सलाम!

Web Title: editorial dhing tang