काय करावे?(दोन समस्या...) (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 6 एप्रिल 2017

प्रिय मित्र उधोजीसाहेब 
यांसी शतप्रतिशत मुजरा.

प्रिय मित्र उधोजीसाहेब 
यांसी शतप्रतिशत मुजरा.
फारा दिवसांत गाठभेट नाही. बोलणेचालणेही नाही. (तुमचा फोन बंद लागतो आहे...) प्रारंभी वाटलं, महापालिका निवडणुकीचा शीण घालवण्यासाठी आपण सहकुटुंब परदेशी (फोटो काढण्यासाठी) गेला असाल. किंवा नवीन घराच्या बांधकामात सिमेंट-वाळूच्या ढिगाऱ्यातून फिरत असाल. म्हटले कशाला त्रास द्या? पण शेवटी संकटकाळी माणूस आपल्या माणसाकडेच धावा करतो. त्यानुसार हा पत्रप्रपंच. कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधक आम्हाला किती छळत आहेत, हे आपण पाहताच आहात! जीव नको केला आहे. ह्या सरकारचे जगणे हराम करा, असा सल्ला थेट शेतीतज्ज्ञ बारामतीकरांनी दिल्याने तर आगीत तेल ओतले गेले आहे. तुम्ही हा मुद्दा किती संयतपणाने लावून धरलात. ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे हं,’ असे तुम्ही खडसावून बजावले आणि गप्प बसलात.पण ह्या विरोधकांनी चांदा ते बांदा चांगली सहल उरकून घेतलीन. दिवस इतके जिकिरीचे आणि हे सहली काढताहेत. ही संघर्षयात्रा की खाद्ययात्रा? हे सगळे (घरचे) थोडे झाले म्हणून बहुधा आमच्या (उत्तर प्रदेशातल्या) व्याह्याने घोडे धाडले!! काल-परवा आले नाहीत, तर कर्जमाफीची घोषणा करून मोकळे!! आम्ही इथे अजून अभ्यासच करत बसलो.

मुख्यमंत्री संन्यासी असला, की निर्णय घेणे किती सोपे जाते, याचे उत्तम उदाहरण म्हणून उत्तर प्रदेशाकडे पाहता येईल. ‘काहीही करा, पण यूपीत कर्जमाफी करू नका. त्यांनी केली, की आम्ही साफ मेलो’ हे दिल्लीत सांगून आम्ही दांताच्या कण्या केल्या. पण व्यर्थ! अखेर रामनवमीला कर्जमाफीचा बाण आमच्या जिव्हारी येऊन लागलाच. इथून पुढे आमची कंबख्ती होणार आहे. आपल्यासारख्या मित्राची साथ मिळाली तर निभावून नेऊ. तेव्हा विचार करा. कळावे. 
आपला, नाना फडणवीस.

नानासाहेब-
आपले पत्र मिळाले. वाचून आश्‍चर्य वाटले. आपण आम्हाला मदतीची याचना करताना पाहून जो काही धक्‍का बसला, त्यातून सावरू शकलेलो नाही. हे म्हंजे ऐन थंडीत उघड्याने अधिक उघड्याकडे जाऊन कांबळं मागण्यापैकी आहे. तुम्हाला शेतकऱ्यांची चिंता पडलेली आहे. आम्हाला आता निराळाच घोर लागला आहे. ‘पक्षाची घडी नीट बसवण्यासाठी आम्ही भाकरी फिरवणार,’ असे म्हणताच आमचे (तुमच्याकडे असलेले) मंत्री रोज शेतकऱ्यासारखा चेहरा करुन दारात हजर होत आहेत. काही मंत्र्यांना आम्ही डच्चू देणार, अशा बातम्या त्यांच्या(ही) कानावर गेल्याच. परिणामी, ‘भाकरी फिरवा, पण आम्हाला आहे तिथेच राहू द्या,’ असा आग्रह सुरू झाला आहे. आता ह्यांना तिथेच ठेवून आम्ही भाकरी कशी फिरवणार? ह्या गहन चिंतेत आम्ही सध्या आहोत. तुम्हाला जसे घरचे थोडे झाले आहे, तसेच आम्हालाही झाले आहे, एवढेच सांगतो. 

सुभाषजी देसाईजी घाम पुसत सांगून गेले : त्या रावतेजींचे खाते बदला. रावतेजी सांगून गेले : सुभाषजींचे काही तरी करायला हवे. रामदासभाई कदम चार तास बसून शेवटी चिठ्ठी लिहून गेले : देसाई-रावतेंची विकेट घेतलीत, तर पक्ष सुतासारखा सरळ येईल! दीपकमामा सावंतसाहेब सांगून गेले : इतर तिघांनाही पंचकर्म चिकित्सा करून यायला सांगा. केसरकरमामा म्हणतात, की बाकी कुणाचे काहीही करा, आम्ही टिकून राहू येवढे बघा. नाहीतर यंदा आंब्याची पेटी विसरा!! अशा परिस्थितीत करायचे काय आम्ही? त्यात तुम्हाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमच्याकडून पाठबळ हवे आहे. आम्ही कुणाकडे जायचे? तेव्हा आमच्याकडून सध्या मदत होणे असंभव आहे, असे मानावे. पन्नास रुपये आधीच थकलेल्या शेजारच्या काळेकाकांनी पुन्हा पन्नास रुपये उधार द्यायला नकार दिला, तर पलीकडल्या गोरेकाकांकडून शंभर मागावेत आणि काळेकाकांचे पन्नासही त्यातून फेडावेत, असे अर्थशास्त्र सांगते. तेवढाच सल्ला आम्ही देऊ. बाकी ईश्‍वरावर भरवसा ठेवावा. 
जगदंब जगदंब. 
आपला, उधोजी.

Web Title: editorial dhing tang