डिनर डिप्लोमसी! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 12 एप्रिल 2017

मित्रवर्य नानासाहेब-

मित्रवर्य नानासाहेब-
शेवटी (तुमच्या आग्रहानुसार) दिल्लीत येऊन पोचलो. आता (तरी) तुमचा जीव भांड्यात पडला असेल. दिल्लीहून समग्र वृत्तांत कळवा, असे तुम्ही बजावल्याने हे पत्र पाठवत आहे. सुरवातीपासून सांगतो. त्याचे असे झाले की, गेल्या गुरुवारी तुमचे शहंशाह अमितशहा ह्यांचा फोन (मातोश्रीवर) आला. तो चुकून मीच उचलला! ‘दिल्लीला जेवायला या, चांगला मेनू ठेवीन’ असे निमंत्रण त्यांनी दिले. मी म्हटले ‘बघू’! ते म्हणाले, ‘तुम्हाला विमानाने यायला काही हरकत नाही.’ मी पुन्हा म्हटले ‘बघू बघू’! शेवटी ‘वाट पाहातो’ असे सांगून त्यांनी फोन ठेवला. तथापि, अमितशहाजींचा फोन येऊन गेल्यावर लागलीच तुमचा फोन आला! ‘आमचे अमितशहाजी तुम्हाला फोन करणार आहेत, सबब फोन स्वीचऑफ करू नका’ असे सांगणारा. आम्ही फोन येऊन गेल्याचे सांगितल्यावर तुम्ही च्याट पडलात!! तुम्हीही ‘दिल्लीला जायला हरकत नाही. मेनू चांगला असतो’ असा सल्ला दिलात. तुमच्या शब्दावर विसंबून मी (विमानाने हं!) दिल्लीत आलो. आमचे युवराज निरागस आहेत. ‘इथून परत विमानानेच जायचे ना? असे विचारत होते. मी म्हटले ‘बघू’! त्यावर ते बोलले, त्याने हृदयाला घरे पडली. ‘‘त्यांनी परत जाऊ दिलं नाही तर आपण कसे निसटायचे?’’ असे ते विचारत होते. असो.

दिल्लीत आमचे सरनोबत रा. संजयाजी राऊत ह्यांची हवेली आहे. तेथेच दुपारी मुक्‍काम केला. ‘दुपारी जेवले, तर संध्याकाळी धड जेवण जाणार नाही’ असे बजावून सरनोबतांनी कलिंगडाच्या तीन फोडी आणून ठेविल्या. काय बोलणार? थोडावेळ तेथे काढून आम्ही ‘प्रवासी भवन’ला गेलो. 

...दरबारात आमची आवभगत चांगली झाली. पहिल्या रांगेतला पास मिळाला!! खुद्द नमोजी ह्यांनी तर आल्या आल्या, ‘‘उधोजी, आपका स्वागत है’’ असे म्हणून माझा हात मोजून बारा मिनिटे गदागदा हलवला. ह्या माणसाला शेकहॅंड कसा करतात, हे शिकवून ठेवले पाहिजे. खांदा दुखावल्यासारखा झाला आहे!! शहंशाह अमितशहा आमच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होते. माणूस उगीच हसायला लागला की वैताग येतो. पण मी काही बोललो नाही. एकतर भयंकर भूक लागली होती. त्यात संपूर्ण मेनू शाकाहारी असल्याची खबर आमच्या कानाला लागली. म्हंजे पुन्हा कलिंगडाच्या फोडी खाणे आले!! एवढ्यासाठी मी ‘मातोश्री’वर बैठक घ्या, असे म्हणत होतो. ठरल्याप्रमाणे भोजनही झाले. आमच्या ‘मातोश्री’वर याहून अधिक चांगले भोजन मिळते, हेच माझे मत अधिक घट्ट झाले. शहंशाह अमितशहाजींना ‘आता एनडीएची पुढली भिशी मुंबईला आमच्याकडे’ असे सांगूनही टाकले आहे. काळजी नसावी! बाकी दिल्लीची मात्र रया गेली असे म्हणावेसे वाटते. ज्या दिल्लीत एकेकाळी परांठे आणि छोले मिळत, तेथे आता ‘बाजरानां रोटला’ अने ‘रिंगणां बटाकानुं साक’ मिळू लागली आहे. जिथे समोश्‍यांनी अधिराज्य गाजवले, तिथे ढोकळा वरचढ ठरू लागला आहे. जिथे ‘सरसोंदा साग’चा रुबाब असे, तिथे ‘आपडो उंधीयो बहु सरस!’ हे उच्चार कानावर पडू लागले आहेत. कालाय तस्मै नम: दुसरे काय? माझे तर मत असे की, ज्या गावात निनावे, कोळंबीची खिचडी आणि खडखडले मिळत नाही, त्याला राजधानी म्हणावे तरी कसे? 
बाकी भेटी अंती बोलूच.
 कळावे. 
आपला. 
उ.ठा.
ता. क. : भोजनाच्या आधी अमिशहाजींना बंद दाराआड भेटलो. ‘तुमचा फोन आला, हे बरं झालं!’ असे उगाच काहीतरी गोड बोलायचे म्हणून म्हणालो. तर त्यांनी चष्म्यातून पाहात ‘मी फोन केलाच नव्हता!’ असे सांगितले. पोटात गोळा आला. आवाज बदलून तुम्हीच हा उद्योग केला नव्हता ना? 
आपला.उ. ठा.

Web Title: editorial dhing tang