चल चल मुंबई संग चल...! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

(...अर्थात डायरीतील एक नोंद)

(...अर्थात डायरीतील एक नोंद)

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९३९ फाल्गुन शु. एकादशी. (शिमग्याला तीन दिवस बाकी)
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : सखे गं वैरिण झाली नदी!
..............................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) हल्ली एक स्वप्न सारखे पडू लागले आहे... गॉगल लावलेल्या अवस्थेत मी आलिशान मोटारीतून उतरून हजारो चाहत्यांकडे पाहून चुम्मे फेकत आहे. एखादी डान्सिंग स्टेप करून लाखोंचा दिल बेहलवत आहे... ‘नानाऽऽ, नानाऽ नानाऽ नानाऽ ’ असा कल्लोळ करत गर्दी पुढे येते आहे. त्यांना आवरताना बॉडीगार्डांची दमछाक होते आहे... लोकांच्या हातात स्वाक्षऱ्यांच्या वह्या आहेत. त्यांना माझा आटोग्राफ हवा आहे... मी उदार चेहऱ्याने गर्दीला पुढे येऊ देण्याची सूचना बॉडीगार्डांना करतो... गर्दी पुढे येते... समोर कागद आणि पेन सरकवले जातात... स्वाक्षरी ठोकण्यासाठी पेन टेकवणार इतक्‍यात लक्षात येते... अरे, हे तर कर्जमाफीचे कागद!!... गर्दीतील चाहत्यांचे चेहरे बदलून त्याजागी उग्र आंदोलक दिसू लागतात.... आणि मी दचकून जागा होतो.

सध्या यूट्यूबवर धुमाकूळ घालणारे रिव्हर अँथम ज्यांनी बघितले असेल, त्यांना मी काय म्हणतो आहे, ते कळेल! होय, मी आता स्टार झालो आहे!!  ‘चल चल मुंबई चल’ ह्या मुंबई अँथममध्ये मी लीड रोल केला आहे. आमची नायिका म्हणून आमचेच कुटुंब आहे. साइड हिरो म्हणून वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवारजीदेखील आहेत. मुंबईचे कमिश्‍नर अजोयभाय मेहतापण आहेत. (पण त्यांना क्‍यारेक्‍टर रोल आहे!!) नायक आणि नायिका नदीच्या काठी जाऊन नद्या वाचवण्याचे आवाहन ड्यूएट गात गात करतात. नायकाचा जानी मित्र त्यांना सामील होतो. नायिकेचे काका ह्या मोहिमेला साथ देतात आणि जालीम जमाने कू सबक शिकवतात, अशी थीम आहे.
ह्या अँथममध्ये मी डिट्टो सोनू निगमच्या आवाजात गायलो आहे. ड्यूएट येणेप्रमाणे :
ती : चल चल मुंबई संग चल, कहता नदियों का जल,
हम आज अगर मिल जाये तो, बेहतर होगा कल...
तो : ... इस मां का दर्द हम समझ न पायें (इथे छातीवर हात!)
ये बहना चाहती चारो दिशाएँ (शाहरुख खान स्टाइल बाहें...)
रुक रुक के इस की सांसे घूट रहीं है (पुन्हा छातीवर हात!)
जैसे कोई सजा वो भुगत रहीं है... (डोळ्यांत पाणी... नदीचे नव्हे!! नुसतेच!!)
उसकी पुकार, आवाज दें वो बार बार... (एक हात आभाळाकडे!)
इसमें ही सबका भला ये वक्‍त की मांग है (येकमेकांकडे बघून हसणे)
इसको अभी बचाना हम सबका लक्ष्य है...
...ह्यातील ‘तो’ म्हंजे मीच!! सुधीरजी मुनगंटीवारजींना दगडी शिळेवर उभे करून दोन ओळी गायला दिल्या आहेत. (त्यांना प्लेब्याक माझाच होता... मला सोनू निगमचा होता! असो!!) कमिश्‍नर मेहता एक बोट वर करून छॉन गायले आहेत!! असू दे, शिकतील हळूहळू!!

सदर यूट्यूब व्हिडिओला इतक्‍या हिट्‌स आल्या की प्रिया प्रकाश वारियरचा ‘अखियोंसे गोली मारे’ व्हिडिओ पार मागे पडला आहे. (...असे वनमंत्री मुनगंटीवारजी सांगत होते!) हे अँथम बघून सगळे लोक ताबडतोबीने नद्या वाचवायला घेतील, ह्याची मला खात्री आहे. गाणे इंटरनेटवर वाजायला लागल्यापासून मला लाखो फोन येत आहेत; पण आमचे सन्मित्र मा. उधोजीसाहेब बांद्रेकर ह्यांनी फोन केला, आणि रागावून म्हणाले : हा काय चावटपणा आहे? नद्या वाचवा वगैरे सगळं झूठ आहे. हे आमच्याच मनधरणीचं गाणं आहे, हे कळत नाही का आम्हाला? शब्दच सांगतात खरे काय ते!!
....तेव्हापासून वाईटसाईट स्वप्ने पडू लागली आहेत. असो.

Web Title: editorial dhing tang british nandi article