उन्हात काळजी घ्या...! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 28 मार्च 2018

सर्वपक्षीय, बिगरपक्षीय राजकीय व अराजकीय नेते व कार्यकर्ते आणि सहकारी -

सर्वपक्षीय, बिगरपक्षीय राजकीय व अराजकीय नेते व कार्यकर्ते आणि सहकारी -
अत्यंत गंभीर परिस्थितीत सदर पत्रक जारी करण्याची वेळ आली आहे. उन्हाची तलखी एवढी वाढली आहे, की हा नुसता मार्च नसून, लाँग मार्च वाटावा ! गेल्या महिन्याभरात मुंबईत इतके मोर्चे आले की त्यास गणती नाही. मुंबईचे सोडा, गावोगाव इतके मोर्चे निघू लागले आहेत, की लोकांना (मोर्च्याशिवाय) दुसरी काही कामे आहेत की नाही, असा कुणा बिगर मराठी माणसाला (पक्षी : दिल्लीतील माणसाला) प्रश्‍न पडावा. मार्च ह्या महिन्याबद्दल विरोधकांचा काही गैरसमज झालेला नाही ना, हे तपासून पाहण्याची वेळ आली असून, हे निव्वळ एका महिन्याचे नाव आहे. श्रावणात व्रतेवैकल्ये असतात, तसे मार्चमध्येच मोर्चे काढावेत, असा काही नियम नाही, ह्याकडे संबंधितांनी (कृपया) लक्ष द्यावे. मार्च महिन्यात उन्हे जरा जास्तच कडक असतात. तशात मोर्चे येऊ लागल्याने सरकारचे तोंड कोरडे पडू लागले आहे. असेच चालू राहिले तर उर्वरित वर्षभरात अच्छे दिन आणण्याचे महत्कार्य लांबणीवर पडेल व त्याची जबाबदारी सरकारवर राहणार नाही, ह्याची नोंद घेण्यात यावी.

...अशा भयानक उन्हात शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण सारे जनतेचे सेवक. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण जनसेवेसाठी वेचणे आपले कर्तव्य. (हो ना?) त्यामुळे आपल्याला अधिक चांगल्या रीतीने जगणे भाग असते. त्यामुळे स्वत:च्या शरीराची काळजी घेणे ही एक प्रकारे जनसेवाच ठरते. सध्या उन्हाचा ताप प्रचंड वाढला असून, मुंबईतले तापमान बेचाळीस डिग्रीपर्यंत गेले आहे. त्याची आम्हाला सवय आहे. आमच्या नागपुरात बेचाळीस म्हंजे काहीच नाही. ह्या तापमानाला आम्ही कुलरमध्ये पाणीदेखील टाकत नाही. वाळ्याचे तट्टे लावून ‘पडले राहण्या’साठी टेंपरेचर पंचेचाळीस क्रॉस व्हावे लागते. पण मुंबईतल्या दमट हवेत घाम फार येतो. उन्हामुळे डीहायड्रेशन होते व थकवा लौकर येतो. परवा मंत्रालयात एक पुढारी चक्‍कर येऊन पडले. धावाधाव झाली. हल्ली मंत्रालयाच्या एरियात कोणी साधी चक्‍कर येऊन पडले, तरी तीनशे टीव्ही क्‍यामेरे आणि चौदाशे पत्रकार जमा होतात. पोटात गोळा येतो !! असो. उन्हाळ्याची म्हणून प्रत्येक जनसेवकाने खालीलप्रमाणे काळजी घ्यावी अशी कळकळीची विनंती.

१. मार्च संपेपर्यंत सर्व प्रकारचे शॉर्ट आणि लाँग मार्च लांबणीवर टाकावेत ही विनंती.
२. मोर्च्यांमुळे कार्यकर्त्यांची पायपीट होतेच, पण नेत्यांचे हाल होतात ! आपल्यासाठी झिजणाऱ्या नेत्यांना असे उन्हात उभे करणे बरे नव्हे !
३. ह्या दिवसांत उपोषण तर फारच वाईट ! करू नये !! केले तर दिल्लीत करावे !!
४. पाण्याची बाटली कायम जवळ ठेवावी. (टीप : पाण्याची हे ठळक टायपात लिहिलेले आहे.)
५. रोज किमान चार लिटर पाणी प्यावे. (सकाळी सात ते सायं. सात..!)
६. ज्यूस, उसाचा रस, लिंबूपाणी असे सतत मागवत राहावे.
७. मटणमुर्गी जरा कमी खावे... एकंदरितच ‘काहीही’ जरा कमीच खावे !!
८. घर, कार्यालय, मोटार येथे चोवीस तास एसी लावावा.
९. मतदारसंघात फार हिंडू नये. तसेही हल्ली उघड्यावर हिंडणे थोडे अडचणीचे झालेच आहे !! कशाला उगीच उन्हात हिंडायचे?
१०. हमेशा कांदा जवळ ठेवावा. (वि. सू. : ही सूचना ‘नाफेड’साठी नाही !! प्लीज नोट !!)
...वरील पथ्ये पाळा, तंदुरुस्त राहा. पुढील पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे चालले आहे. तिथे तेव्हा हवा बरी असते. तिथे भेटणे उभयता सोयीचे जाईल असे वाटते. तोपर्यंत संबंधितांनी कळ काढावी.
कळावे.

Web Title: editorial dhing tang british nandi article