एक मफलर! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

गेली दोन वर्षे मी ह्या कपाटात पडून आहे. आसपास राहणाऱ्या कुर्त्यांशी कधी बोललो नाही. कोपऱ्यात पडलेल्या शालीकडे ढुंकूनही पाहिले नाही. शालीचा आगाऊपणा मला मुळीच आवडत नाही. तिने दोन-चारदा माझ्याशी संभाषण छेडण्याचा प्रयत्न केला. पण मी दुर्लक्ष केले. कुर्ता काय, शाल काय... माझे स्थान ह्यांच्यापेक्षा वरचे आहे. पण गेली दोन वर्षे माझ्या नशिबी वनवास आला. गर्भश्रीमंत लक्ष्मीपुत्राने महालक्ष्मीच्या रेसकोर्सवर एका दिवसात खंक व्हावे, तसे घडले...मी कपाटात गेलो.

दोन वर्षांपूर्वी मी कसा होतो? अंगावर तारुण्याची लकाकी होती. कांती तुकतुकीत होती. इतरांसारखा माझ्या अंगाला बामचा वास येत नव्हता. (दिल्लीत हे बामवाले खूप सापडतील... आम आदमी लेकाचे !) मी खास आदमी होतो. त्यामुळे विदेशी सुगंधाची शिंपण झाल्याशिवाय कधीही घराबाहेर पडलो नाही. पण आता दोन वर्षांत जिथे अंगाला पाणी लागले नाही, तिथे तो सुगंध कसा टिकावा? दिवस फिरले की सुगंधही उडून जातो. जीवनाचे वस्त्र विटून, विरून जाते... ज्याने आयुष्य चाहत्यांच्या, भक्‍तांच्या घोळक्‍यात घालवले, त्याच्या नशिबी अचानक विजनवास यावा? हा दैवाचा खेळ निराळा हेच खरे.

एखादा बंदी भायखळ्याच्या तुरुंगात दोन वर्षे खितपत पडावा, तसा मी ह्या कपाटात पडून आहे. नशिबानं माझी अशी थट्टा का मांडली? कां, कां, कां? काकांवरून आठवले... पूर्वी दिमाखाने मी काकांच्या पाया पडत असे. म्हणजे मी ज्यांच्या खांद्यावर दिमाखात रुळत असे, ते खांदे काकांसमोर वाकले की मीही काकांच्या पायाला स्पर्श करत असे ! अतिशय पवित्र भावना होती ती...
पण दिवस फिरले. ती काळरात्र आली. काही धटिंगणांनी घरात येऊन कपाटे उपसली. मी गपचूप पडून राहिलो. मग सारे काही शांत झाले. माझा प्रेमाने प्रतिपाळ करणारे समर्थ खांदे वाकलेल्या अवस्थेत भायखळ्याला दिवस कंठू लागले. आता मी कुणाच्या गळ्यात पडून रडावे? कुठल्या फोटोत दिसावे आणि हसावे? ज्याच्यावर पडून रडावे, असे खांदेच उरले नाहीत. अंगावर शिंपण झालेला परदेशी सुगंध केव्हाच उडून गेला आहे. किंबहुना, दोन वर्षांत अंगाला पाणी लागलेले नाही. कपाटातला अंधार हीच माझी सोबत होती. दैवाने मला ही एकांतकोठडीची शिक्षा कां दिली? असा मी काय गुन्हा केला?

माझ्यासारखे काही भाईबंद दिल्लीत राहतात. ते संख्येनेही खूप आहेत. पण ती मंडळी फार सामान्य कुळातली आहेत. माझ्यासारखी खानदानी नाहीत. खोकला, सर्दीसारखी गरज निर्माण झाली की हे कुडमुड्या वैद्यासारखे चार महिने गळ्याभोवती गुंडाळले जातात. पण माझा त्यांच्याशी संबंध नाही. आम आदमीच्या गळ्यात गळा घालून हिंडणाऱ्यांबद्दल मी काय बोलायचे? मी एक चालतीबोलती फॅशन होतो. माझ्याठायी सौंदर्यदृष्टी होती. एक स्वतंत्र बाण्याचे व्यक्‍तिमत्त्व होते. माझ्यासाठी माझे मालक किती जीव टाकायचे. म्हणायचे, ‘‘तूच माझे स्टाइल स्टेटमेंट... तू माझं प्रतीक आहेस !’’ मी भरून पावलो. आयुष्यात तसे प्रतीक झालो, ह्याचा विलक्षण अभिमान मला होता. मालकाने असे म्हटल्यावर मी लाजेने चूर व्हायचो. आपण वेटोळे मारून राहातो, ती मान हमेशा ताठ राहायला हवी, अशी एकनिष्ठेची शपथ मी घेतली होती.
पण दैववशात सारे बदलले. मालकाच्या गळ्यातून मी हद्दपार झालो आणि आरोपीची पाटी आली !! मी एकटा पडलो...पण नुकतेच कळले की माझी साडेसाती दोन वर्षांत संपली आहे. साडेसातीचे हे बेक्‍कार अडीचके एकदाचे संपले. आता पुन्हा चांगले दिवस येणार...

थांबा... कुणाची तरी पावले वाजताहेत. कुणीतरी ओळखीचे नजीक येत आहे. मी पुन्हा त्याच गळ्यात पडेन !! त्या गळाभेटीसाठी मी दोन वर्षे पिचत पडलो होतो. दादा, या ना !!
...मफलरचाही गळा भरून येतो, हे आत्ता कळते आहे...खरंच !!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com