इफ्तार पार्टी! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 5 जून 2018

‘बहूनि मे व्यतीतानि, जन्मानि तवचार्जुन:।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परमतप:।।’

श्‍लोकार्थ : भगवद्‌गीतेतील वरील श्‍लोक सर्वांना माहीत असेलच. त्याचा एक ‘सुबोध’ अर्थ असा की ‘अरे पार्था, परमतपा, माझा जन्म मे महिन्यातला असून तू चार जूनचा आहेस. मी तुझ्यापेक्षा थोडा मोठा आहे हे उघड असल्याने माझा वेदोपदेश (मुकाट्याने) ऐक बरे!!’

‘बहूनि मे व्यतीतानि, जन्मानि तवचार्जुन:।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परमतप:।।’

श्‍लोकार्थ : भगवद्‌गीतेतील वरील श्‍लोक सर्वांना माहीत असेलच. त्याचा एक ‘सुबोध’ अर्थ असा की ‘अरे पार्था, परमतपा, माझा जन्म मे महिन्यातला असून तू चार जूनचा आहेस. मी तुझ्यापेक्षा थोडा मोठा आहे हे उघड असल्याने माझा वेदोपदेश (मुकाट्याने) ऐक बरे!!’

...तर मंडळी चार जूनचा महिमा हा असा आहे. अशा पवित्र दिवशी ठेवलेल्या इफ्तार स्नेहभोजनाला उपस्थित राहण्याची संधी आम्हास मिळाली हे आमचे अहोभाग्य. फक्‍त पुण्यश्‍लोकांनाच हा खाना नसीब होतो, असे म्हंटात. पवित्र रमजानच्या महिन्याच्या निमित्ताने इफ्तारीचे मांडव जागोजाग पडले असले, तरी चार जूनच्या मेजवानीला विशेष महत्त्व आहे. येथे मेजवानीतील पदार्थांपेक्षा मांडवाला अधिक महत्त्व आहे. सदर मेजवानीचा वृत्तांत आपल्याला देणे, हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

मलबार टेकडीच्या रम्य परिसरात स्थित असलेल्या सह्याद्री अतिथिगृहाच्या विशाल दालनात सदर ऐतिहासिक मेजवानी पार पडली. ऐतिहासिक अशासाठी की अशी मेजवानी यापूर्वी कधीही न झाली, यापुढे कधीही न होईल. सदर वृत्तांत वाचून ज्यांना ‘कोल्ह्याघरी करकोचा’ ह्या कहाणीची आठवण येईल, त्यांना आम्ही समाजवादी म्हणू!!

गिरगाव चौपाटीला डावीकडे टांग मारून मलबार टेकडीकडे आमची गाडी जाऊ लागली, तसतसा सुग्रास व्यंजनांचा वास आम्हाला येऊ लागला. तीन बत्तीच्या सिग्नलला आल्यावर तर आम्ही खलासच झालो. परंतु, तो गंध शेजारच्या हाटेलातून येतो आहे असे कळल्यावर आम्ही नाद सोडला. सह्याद्री अतिथीगृहासमोर आम्ही गाडी उभी केली. तेथील सुरक्षारक्षकाने आम्हाला हातगाडी इथे आणायला मनाई आहे, असे सांगितले. त्याच्या हाती दंडुका होता. तो अचानक रोखून त्याने कठोर स्वरात विचारणा केली, ‘‘शत्रू की मित्र?’’

‘मित्र’ असे आम्ही म्हणताच त्यांनी दंडुका म्यान करून आम्हाला शतप्रतिशत वंदन केले. सामान्य माणसे एकमेकांना भेटली तर नमस्कार करतात, इथे वंदन केले जात होते. उपविश, आराम (‘म’ पूर्ण) असे म्हणून आम्हाला पंगतीत बसविण्यात आले. दीड-दोन महिन्यापूर्वी आम्हाला ब्लेड लागल्यामुळे आम्ही दाढी करणे काही काळ थांबवले होते. त्याचा हातभर फायदा येथे झाला. कारण ‘जिसकी दाढी बडी, उसकी थाली बडी’ ह्या नियमानुसार आमचा नंबर पहिल्या पंगतीत लावण्यात आला.
‘‘फर्माइए, क्‍या पसंत करोगे आप?’’ एका स्वयंसेवकाने मोठ्या अदबीने विचारले. आम्ही पन्हे मागवले. लिंबूसरबत आले! ‘लिजिए’ वर हे!! दोस्ती, भाईचारा, नागपूर का पैगाम, जलेबी, मालपुवा वगैरे शब्दांची आतिशबाजी होत होती. पदार्थांची नावे सटासट अंगावर आल्याने आमची भूक सणकून वाढली. कबाबाचा थाळा आला की टिच्चून चोवीस टिक्‍के खाण्याची कसम आम्ही (भुकेल्या पोटी) तिथल्या तिथे खाल्ली.
‘‘दोस्तों, ह्या इफ्तारशरीकच्या अवसरवर आपण सारे एकसाथ आलो आहोत. इन्शाल्ला, तसेच राहू. सर्वप्रथम आपण आमचे प्रचारक-ए-मावळ पू. बाबा बर्वे ह्यांचे बौद्धिक ऐकू. मग पेटपूजेला लागू,’’ अशी घोषणा करून एक स्वयंसेवक बाजूला उभा राहिला.

‘‘आपण सारी धरतीची लेकरं...काय?’’ पू. बाबा बर्वे म्हणाले. आम्ही माना डोलावल्या.
‘‘आपण भाई भाई आहोत...काय?’’ पू. बा. ब. आम्ही माना डोलावल्या.
...सहोदरभाव म्हंजे काय, भगवद्‌गीतेत काय म्हटले आहे, बंधुभाव, उत्तरदायित्व, बांधिलकी असे अनेक शब्द एकात एक गुंतत गेले. कानाशी नुसती गुणगुण ऐकू येऊ लागली. होत्याचे नव्हते झाले आणि आमची ब्रह्मानंदी टाळी लागली...
...जाग आली तेव्हा एक स्वयंसेवक ताटे उचलत होता. आम्हाला बघून तो करवादला : ‘‘आता उठा...लय झालं!’’

Web Title: editorial dhing tang british nandi article