वडापाव ट्रिप! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

बेटा : (नेहमीची सॉलिड एण्ट्री) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (कागदपत्रं हातावेगळी करण्यात मग्न...) हं!
बेटा : (कमरेवर हात ठेवत) मी कुठे जाऊन आलो, विचारलं नाहीस!!
मम्मामॅडम : (मान वर न काढता) कशी झाली मुंबईची ट्रिप?
बेटा : (विजयी मुद्रेने) ॲज युज्वल...फॅण्टॅस्टिक आणि ग्रेट! आय कॉल इट वडापाव ट्रिप!! हा गेलो, हा आलो!!
मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) ह्यावेळी लोकल गाडीत बसला नाहीस ना? मागल्या खेपेला त्या गर्दीत-
बेटा : (आरशात बघत) नोप! ह्यावेळी नो लोकल बिझनेस! मी बाय रोड फिरलो!!
मम्मामॅडम : (सहजगत्या) एवढ्या गाड्या नि घोडे दिमतीला असताना तुम्हा लोकांना लागतात कशाला रे रेल्वेगाड्या? मी तर एकदाही बसले नाही त्या मुंबईच्या लोकलमध्ये!!
बेटा : (टुकटुक करत)...मी एक मस्त रिक्षा राइड एन्जॉय केली!!
मम्मामॅडम : (धसका घेत) ओह गॉड! मुंबईच्या रिक्षावाल्यानं गंडवलं नाही ना तुला?
बेटा : (डोळे मिचकावत) उलट मीच त्याला गंडवलं!!
मम्मामॅडम : (हताशपणे) तू ज्या दिवशी कुणाला गंडवशील, खरा नेता होशील!! तू मनानं चांगला आहेस, म्हणून तर-
बेटा : (साफ दुर्लक्ष करत) रिक्षावाल्याला म्हटलं, ‘एअरपोर्ट चलोगे?’ तो म्हणाला, ‘क्‍यों नहीं? जरूर जाएंगे’ मी म्हटलं, ‘तो फिर जाते क्‍यों नही?’ हाहा!!
मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) जुना जोक आहे रे हा!!
बेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) बरं नवा जोक सांगतो!! त्या रिक्षावर काय लिहिलं होतं माहितीये?
मम्मामॅडम : (कंटाळून) रिक्षावर हल्ली काहीही लिहितात!
बेटा : (खुश होत...) ‘मां का आँचल!’ हाहा!! खरंच सांगतोय! नो जोक!! मी रिक्षातून उतरलो तर तो रिक्षावाला पैसे घ्यायला तयार होईना!! म्हणाला, ‘‘आपकीही गाडी है समझो! आपसे क्‍या पैसा लेना?’’
मम्मामॅडम : (किंचित नाराजीनं) मुंबईत तू पाच मिनिटांत पत्रकार परिषद गुंडाळलीस म्हणे! माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत!! पत्रकार सक्‍काळी उठून आले होते तुझ्यासाठी! तू काही बोललाच नाहीस म्हणे!!
बेटा : (खांदे उडवत) त्यात काय बोलायचंय? नोटाबंदी, जीएसटी, श्रीमंतांची कर्जमाफी, पेट्रोलचे भाव...विषय संपला!! ह्या पलीकडे ह्या देशात बोलण्यासारखं आहे तरी काय?
मम्मामॅडम : (समजूत घालत) एक कायम लक्षात ठेव...पत्रकारांना कधीही सकाळी बोलावू नये!! फार चडफडतात!! दुपारी किंवा संध्याकाळी बोलवावं! हे म्हंजे सुग्रास पार्टीचं आमंत्रण देऊन वडापाव पुढे करण्यासारखं झालं!!
बेटा : (आपली बाजू मांडत) वडापाव मी त्यांना दिला नाही, त्यांनी मला दिला!! तोच घाईघाईत खाऊन मी तिथून नांदेडला निघालो!! आता ह्यात माझं काय चुकलं?
मम्मामॅडम : (नाद सोडत) मुंबईतले पत्रकार तुला वाटतात तितके सोपे नाहीत हं! डू नॉट अंडरएस्टिमेट द पावर ऑफ मुंबईकर पत्रकार!!
बेटा : (अचानक काहीतरी आठवल्यासारखं...) मम्मा, डू यू नो वन थिंग...मोदीजी मला जाम घाबरतात!
मम्मामॅडम : (घाबरून) कोणी सांगितलं हे तुला?
बेटा : (आत्मविश्‍वासानं) चेहऱ्यावर दिसतं ना त्यांच्या!!
मम्मामॅडम : (घाईघाईनं विषय बदलत) तुला भूक लागली असेल तर फ्रीजमध्ये पास्ता ठेवलाय!
बेटा : (पोटावरून हात फिरवत) छे, पाच वडापाव पोटात आहेत माझ्या!!
मम्मामॅडम : (आवंढा गिळत)...आज आपली इफ्तार पार्टी आहे ना? तू स्वत: यजमान आहेस!
बेटा : (विचार करत) पण तिथंही पाच मिनिटं उभ्या उभ्या जाऊन येऊ!! आहे काय नि नाही काय!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com