कबीरा खडा बाजार में...! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

सकाळ होती, दुपार किंवा
असेल संध्याकाळ
रिपरिप होता पाऊस तेव्हा
होती हवा ढगाळ

अवचित सर ती आली मोठी,
पाऊस होता खोटा
लयीत बरसे जणू दिवाणा
विणकर चालवि धोटा

वळून पाहिले मीही आणिक
थक्‍क जाहलो तेव्हा
खरेच विणकर बसला होता
मुखात होता दोहा

सुरेल विणकर गात राहिला
सुरेल त्याची वाणी
मुखातूनी अन्‌ सदैव त्याच्या
आभाळाची गाणी

खरेच का हा विणकर आहे?
वा सतरंगी बैरागी?

धोट्याच्या तालावर त्याच्या
गीते का अनुरागी?

बैस म्हणाला, सतरंजीवर
त्याने केली खूण
आणि छेडिली तार मनाची
अन्‌ स्वर्गाची धून

माती सांगे कुंभाराला
फुका भाजशी मला
एके दिवशी माझ्याठायी
मिळेल थारा तुला!

खरे काय अन्‌ कसले खोटे
जीवन हे भ्रमजाल
पेठ भक्‍तीची लुटे कुणी जो
होईल मालामाल

कशास गुंतुनी पडसी मूढा
दुनिया मोह नि माया
हरिनामाचे काम सोडुनी
वृथा शिणविसी काया

काम आजचे झणी करावे,
आणि उद्याचे आज
प्रलयाचे जळ पळात येईल
कुठुनी आणशी जहाज?

काचकड्याची दुनिया इथली
बेगड झाले सोने
काचहि खपते हिरा म्हणोनी
उंच जाहले बौने!

बाजाराच्या चौकामध्ये
घेऊनि हाती काठी
तिठ्यावरी मी उभा गड्यांनो,
यावे माझ्या पाठी!

वेडा विणकर गात राहिला
गात राहिला काही...
बरसत गेला मेघ बावरा
उसंत त्याला नाही...

दोहे गाऊन दमला विणकर
घेई जळाचा घोट
‘काय नाव?’ अन्‌ पुसता त्याला
दावी वरती बोट!

म्हटले त्याला, विणकरदादा,
कशास रचता दोहे?
उमर जाहली, घ्या विश्रांती
खाऊनी बशीभर पोहे!

विणकरदादा आता तुमची
दुनिया उरली नाही
उलटे लटके वाघुळ तरिही
तेही सरळच पाही!

लटिक्‍या गाण्यावरती आता
बसवा लटिके बोल
नक्‍कल झाली अव्वल आणिक
अस्सल मातीमोल!

मजार तुमची सांगत असते
आपण सारे भाई
राजकारणापल्याड त्याची
किंमत उरली नाही!

कबीरा खडा बाजार में..
घेऊन हाती काठी
तिथे अता रे मॉल उभा हा
आणि ‘सेल’ची पाटी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com