सल्ला आणि तिजोरी! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

बेटा : (अत्यंत सळसळत्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅण टढॅऽऽण! मम्मा आयॅम बॅक!!
मम्मामॅडम : (चष्म्यातून वर्तमानपत्र वाचत) हं!
बेटा : (अचंब्याने) हे काय? मी परत आलोय, ह्याचा तुला आनंद नाही झाला मम्मा?
मम्मामॅडम : (थंडपणाने) होतास कुठे इतके दिवस?
बेटा : (खांदे उडवत) वेल, भयंकर बिझी होतो! पक्षाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर मी एक मिनीटही आराम केलेला नाही आणि एक दिवसही सुट्टी घेतलेली नाही!!
मम्मामॅडम : (पेपरावर टिचकी वाजवत) ते दिसतंच आहे इथं पेपरात!!

बेटा : (अत्यंत सळसळत्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅण टढॅऽऽण! मम्मा आयॅम बॅक!!
मम्मामॅडम : (चष्म्यातून वर्तमानपत्र वाचत) हं!
बेटा : (अचंब्याने) हे काय? मी परत आलोय, ह्याचा तुला आनंद नाही झाला मम्मा?
मम्मामॅडम : (थंडपणाने) होतास कुठे इतके दिवस?
बेटा : (खांदे उडवत) वेल, भयंकर बिझी होतो! पक्षाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर मी एक मिनीटही आराम केलेला नाही आणि एक दिवसही सुट्टी घेतलेली नाही!!
मम्मामॅडम : (पेपरावर टिचकी वाजवत) ते दिसतंच आहे इथं पेपरात!!
बेटा : (अभिमानाने) देअर यू आर...मला माहीतच होतं की पेपरात माझ्याच हेडलायनी असणार आणि तू अभिमानानं त्या वाचत असणार!!
मम्मामॅडम : (उसासा टाकत) पक्षात तू भाकरी फिरवलीस म्हणे!!
बेटा : (गोंधळून) भाकरी? नोप! फिरवलाच तर मी पिझ्झा फिरवीन!!
मम्मामॅडम : (खुलासा करत) बेटा, पक्षात बदल केले की भाकरी फिरवली, असं म्हणायची पद्धत आहे!!
बेटा : (ओठांचा चंबू करत) ओह, आय सी! तरीच मागल्या वेळेला मला महाराष्ट्रातले एक काका भाकरी फिरवण्याबद्दल सांगत होते! मी त्यांना खरीखुरी भाकरी फिरवून दाखवली तर समोरून उठून गेले!!
मम्मामॅडम : (कपाळाला आठ्या घालत) माझ्या माणसांच्या बदल्या करून काय साधणार आहात तुम्ही लोक?
बेटा : (सपशेल नकार देत) छे, मी कुठे बदल्या केल्या!
मम्मामॅडम : (हाताची घडी घालून जाब विचारल्यागत) आज दरवाजाबाहेर तुला अहमद अंकल भेटले?
बेटा : (मान हलवत) नाही! का?
मम्मामॅडम : (नापसंतीच्या सुरात) कारण तुम्ही भाकरी फिरवलीत म्हणून!!
बेटा : (डोक्‍यात प्रकाश पडत) हां हां!! मी त्यांच्या हातात काल पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या ना! म्हटलं तुम्ही इथंच तिजोरीची राखण करा!
मम्मामॅडम : (उदास स्वरात) उरलंय काय त्या तिजोरीत? आणि राखण तरी कशाची करणार? चांगले माझे राजकीय सल्लागार होते, त्यांची खुर्ची उचलून रिकाम्या तिजोरीजवळ नेऊन ठेवलीत! हे तुमचं भाकऱ्या फिरवणं म्हणायचं का?
बेटा : (समजूत घालत) अहमद अंकलचं प्रमोशन करणं मला भाग होतं! किती दिवस ते असे दाराबाहेर खुर्ची टाकून बसणार होते?
मम्मामॅडम : (निक्षून) प्रमोशन? राजकीय सल्लागार मोठा की खजिनदार?
बेटा : (मूठ हापटत) अर्थात खजिनदार! ज्याच्या हाती चावीची तिजोरी, तो पक्षाते उद्धारी!!...(गोंधळून) अशीच काहीशी ती म्हण आहे ना? चावीची तिजोरी की तिजोरीची चावी?...जाऊ दे! आधीचे खजिनदार वयानं थकले होते, त्यांना धड हिशेब सांगता येईना, म्हणून अंकलना मी तिथं पाठवलं...काय चुकलं?
मम्मामॅडम : (नाक मुरडत) ओसाडगावच्या पाटीलकीला काय अर्थ आहे? पण मी काही बोलायची नाही, तुम्हा तरुणांच्या हातात पक्ष दिलाय ना, आता घाला गोंधळ काय घालायचाय तो! मी रिटायर झालेय!
बेटा : (नाटकीपणाने) ऐसा दिल खट्टा ना करो, मम्मा!! अंकलचा सल्लासुद्धा आपण अधूनमधून घेऊ की! मणिशंकरकाकांनाही मी परत बोलावलंय पक्षात! सगळ्यांचे सल्ले मला हवे आहेत! ऐकावे जनाचे, करावे मनाचे...अशीच म्हण आहे ना?
मम्मामॅडम : (नाराजी न लपवता) मला काही हे पटलेलं नाही, पण मी कोण सांगणारी!! आता तू मोठा झालायस, तुझे निर्णय तुलाच घ्यायला हवेत! मला फक्‍त एवढंच सांग की आता राजकीय सल्लागार म्हणून कोणाला नेमायचं? त्या दाराबाहेरच्या खुर्चीत कोण बसणार?
बेटा : (उत्साहात डोळे मिचकावत) कोणीही नाही! राजकीय सल्ला म्हणशील तर...मैं हूं ना!!

Web Title: editorial dhing tang british nandi article