dhing tang
dhing tang

आजोबा आले तेव्हा...! (ढिंग टांग)

‘‘हा य देअर बॅब्स..,’’ हातात आयपॅड घेऊन चि. आदू खोलीत शिरला, तेव्हा बॅब्स आवराआवर करत होते. त्यांची गडबड उडाली होती. बॅब्सना सगळे साहेब म्हणतात, पण मागल्या खेपेला एक गोलगरगरीत चेहऱ्याचे गेस्ट आले होते, तेव्हा बॅब्स त्यांनाच साहेब म्हणत होते !! चि. आदूला आश्‍चर्य वाटले.
‘‘बॅब्स, आपल्याकडे कुणी गेस्ट येणार आहेत का?’’ चि. आदूने मोठ्‌ठे मोठ्‌ठे डोळे करून विचारले.
‘‘का रे? असं कां विचारतोस?’’ बॅब्सनी डोळे मिचकावत पसरलेले न्यूजपेपरचे गठ्‌ठे पलंगाच्या खाली सरकवले.
‘‘नीट घडी करून ठेवा ते पेपर बॅब्स! आई ओर्डेल!!’’ चि. आदूने सावधगिरीचा इशारा दिला. बॅब्सनी चडफडत सगळे पेपर बाहेर काढून त्याच्या घड्या घालून ठेवल्या. पेपरांच्या पसाऱ्याची ही कटकट असते. नुसते दृष्टिआड करून चालत नाहीत, घड्या घालून एकावर एक ठेवून बरोब्बर पंचेचाळीस दिवसांनी रद्दीवाल्याकडे नेऊन द्यावे लागतात. पंचेचाळीस दिवसांची रद्दी करेक्‍ट होते, असा ‘मंडळीं‘चा आदेश आहे. आता पंचेचाळीसच का? तर त्याला काही ग्रेट असे उत्तर नाही. आले मंडळींच्या मना!!...विचाराच्या तंद्रीत असलेल्या बॅब्सना पुन्हा ताळ्यावर आणले ते चि. आदूनेच.
‘‘घरातले सगळे लोक आवराआवर करतायत. आपल्याकडे पाहुणे येणार असतील तरच आपण आवरतो ना? मिलिंदाकाकानी मला सगळी खेळणी खोक्‍यात भरून ठेवायला सांगितलंय!..’’ चि. आदूने आपला अंदाज वर्तवला.
‘‘मिलिंदाकाका काय करतोय तिथं?’‘ बॅब्सने विचारले.
‘‘तो ना...फिश टॅंकचं पाणी बदलतोय...सांगा ना कोण येणार आहेत गेस्ट आपल्याकडे?’’ चि. आदूला आता अगदी राहवेना. गेस्ट आले की धम्माल येते. मस्त कोळंबीची खिचडी, तळलेली तुकडी, आइस्क्रीम...मज्जा असते.
‘‘आईला सांग, साधी तुरीची बिन तिखट खिचडी बनवून ठेव!’’ बॅब्सने चि. आदूला पिटाळण्यासाठी काम सांगितले. पण तो जाम जागचा हलला नाही. गेस्ट कोण येणार आहेत, हे आपल्याला हे लोक सांगत का नाहीत? आणि गेस्टसाठी कुणी तुरीची खिचडी करतं का? हॅ:!!
‘‘बंडल खिचडी खाणारे कोण गेस्ट येणारेत सांगा ना बॅब्स!’’ चि. आदू पाय हापटत म्हणाला.
‘‘अरे, एक मोठ्‌ठे आजोबा येणारेत आपल्या घरी! दिल्लीहून...कळलं?’’ बॅब्सने समजूत घातली.
‘‘मोदीअंकल?’’ निरागस चि. आदूने विचारले.
‘‘हॅ:!!’’
‘‘मग कोण येणारे?’’ चि. आदूने हट्‌ट सोडला नाही.
‘‘एक जोशीआजोबा म्हणून आहेत! ते येणार आहेत...कडक आहेत हं! त्यांच्यासमोर मस्ती नाही करायची. आल्या आल्या नमस्कार करायचा... चॉकलेट मागायचं नाऽऽही!! तुमच्या कपाळावर चित्र कसलं काढलंय, असं विचारायचं नाऽऽही...गंध म्हंटात त्याला!! कळलं?’’ बॅब्सने सूचना केल्या.
‘‘जोशीआजोबा म्हंजे आपले दादरचे मनोहर जोशीआजोबा ना?’’ चि. आदूचे कुतूहल वाढतच होते.
‘‘ते नुसतेच मनोहर जोशीआजोबा! हे मुरली मनोहर आहेत!!’’ लहान मुलांचे कुतूहल संयमाने शमविणे, हे पालकांचे कर्तव्यच असते. नव्हे काय?
‘‘ते मला गोष्ट सांगतील का?’’ चि. आदूने विचारले. बॅब्सना काय उत्तर द्यावे, ते कळेना!
...थोड्या वेळाने काठी टेकत मुरली मनोहर जोशी आजोबा आले. त्यांनी बॅब्सकडे मिठाईचा पुडा दिला. गरम पाणी मागवले. चि. आदूचा गालगुच्चा घेतला. चि. आदूने त्यांच्या मांडीवर जागा पटकावली, आणि तो गोड आवाजात म्हणाला, ‘‘आजोबा, गोष्ट सांगा ना!’’
‘‘आदू बेटा, आजोबांना त्रास नाही द्यायचा असा!’’ बॅब्स उगीचच ओरडले.
‘’असू दे, असू दे...सांगतो हं बाळा गोष्ट!’’ थोडेसे खाकरून जोशीआजोबांनी गोष्टीला सुरवात केली, ‘‘बरं का, एका होता कोल्हा...’’
...बॅब्स आणि चि. आदू दोघेही तन्मयतेने गोष्ट ऐकू लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com