केरळात पूर! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

आदरणीय प्रिय मा. ना. नानासाहेब फडणवीस यांसी, शतप्रतिशत प्रणाम. ठरल्याप्रमाणे केरळात शंभर डॉक्‍टर आणि काही टन औषधे घेऊन गेल्या आठवड्यात (सुखरूप) पोचलो आहे. पुरामुळे इथे प्रचंड नुकसान झाले असून, घराघरांत घुसलेले पाणी निघता निघत नव्हते. अखेर मी येथे येऊन ठेपल्यानंतर पुराच्या पाण्याने काढता पाय घेतला आहे. पत्र लिहिण्याचे कारण एवढेच की महाराष्ट्रातर्फे मदतकार्य जोरात सुरू झाले असतानाच वेगळेच अनुभव येऊ लागल्याने येथील पूरग्रस्त जनता च्याट पडली असून, मीही बऱ्यापैकी हादरलो आहे.

आदरणीय प्रिय मा. ना. नानासाहेब फडणवीस यांसी, शतप्रतिशत प्रणाम. ठरल्याप्रमाणे केरळात शंभर डॉक्‍टर आणि काही टन औषधे घेऊन गेल्या आठवड्यात (सुखरूप) पोचलो आहे. पुरामुळे इथे प्रचंड नुकसान झाले असून, घराघरांत घुसलेले पाणी निघता निघत नव्हते. अखेर मी येथे येऊन ठेपल्यानंतर पुराच्या पाण्याने काढता पाय घेतला आहे. पत्र लिहिण्याचे कारण एवढेच की महाराष्ट्रातर्फे मदतकार्य जोरात सुरू झाले असतानाच वेगळेच अनुभव येऊ लागल्याने येथील पूरग्रस्त जनता च्याट पडली असून, मीही बऱ्यापैकी हादरलो आहे.

येथे शंभर डॉक्‍टरांचा एक जत्था घेऊन आलो असून, पाच-पाच डॉक्‍टरांच्या टोळीला होडीने ठिकठिकाणी पोचवण्याची जबाबदारी मी स्वत: अंगावर घेतली आहे. पूरग्रस्तांच्या शिबिरातील लोक आमच्या उपचारांनी बहुधा दोन-तीन दिवसांतच खडखडीत बरे झाले आहेत. कारण आम्ही गेलो रे गेलो की ते दोन्ही पंजे हवेत ‘नको नको’ असे हलवून आम्हाला काहीही होत नसल्याचे अजीजीने सांगू लागले आहेत.
पुराच्या पाण्यात अडकलेल्या काही लोकांवर औषधोपचार करण्यासाठी परवा मी होडी पाण्यात घातली. अचानक एका घराच्या छतावर घोळका दिसला. त्यांना वाचवले पाहिजे असे वाटून होडी तिथे हाकारली. माणसे होडीत घेणार, इतक्‍यात कानावर (परिचित आवाजात) शब्द पडले, ‘‘काय महाजनसाहेब, बरं चाललंय ना? काही मदत हवी का?’’ चमकून पाहिले तो काय! आपले आरोग्यमंत्री दीपक्राव सावंत डॉक्‍टर गळ्यात स्टेथास्कोप घालून उभेच्या उभे!! मी म्हटले, ‘‘तुम्ही कसे इथं अडकलात?’’ तर म्हणाले, ‘‘छे, अडकलोय कुठे? मदतीला आलोय!’’ ह्या गृहस्थाने येथे येण्यापूर्वी मा. उधोजीसाहेबांची परवानगी काढली आहे काय? जरा चौकशी करावी!! हा माणूस दिसेल त्याला इंजेक्‍शने देत सुटला आहे!! अशाने मदत नको, महाराष्ट्रातले डॉक्‍टर आवरा’ असे म्हणण्याची पाळी येईल.अजून काही दिवस येथेच थांबेन असे म्हणतो. (महाराष्ट्रात काम तरी काय आहे?) पण आरोग्यमंत्र्यांना परत बोलावून घ्या ही विनंती. बाकी सर्व ठीक. कळावे. आपला आज्ञाधारक. गिरीशभाऊ. (मुख्यमंत्री,) जळगाव.
* * *

प्रिय गिरीशभाऊ, केरळातील लोकांना तारण्यासाठी तुम्ही तेथे गेलात, हे बरेच झाले. पालघर निवडणूक असो, नांदेड असो किंवा जळगाव...तुम्ही हमेशा मुक्‍काम टाकता. फत्ते करूनच येता. केरळातही तसेच कराल, ह्याची खात्री आहे. तुमचे पत्र आले, त्याच्याआधीच आरोग्यमंत्री सावंतडॉक्‍टर मुंबईत परत आले आहेत. पण काही दिवसांनी ते परत केरळात जाणार आहेत, असे म्हणत होते. आपले एक क्‍याबिनेट सहकारी दिवाकरजी रावतेजी ह्यांनीही ब्याग भरायला घेतली असल्याचे कळते!! आणखी एक सहकारी, ‘सार्वजनिक बांधकाम’चे एकनाथभाऊ ठाणेकर हेसुद्धा केरळात जायला निघाले आहेत. केरळ पूरग्रस्तांसाठी आपल्या सरकारने वीस कोटींची मदत देऊ केली आहे. ‘आणखी देता येईल का?’ अशी विचारणा मी राज्याचे खजिनदार श्रीमान सुधीर्जी मुनगंटीवार्जी ह्यांना केली असता ते तणतणत उठून म्हणाले, ‘‘मीसुद्धा केरळात जातो कसा?’’ थोडक्‍यात, जो मंत्री उठतोय, तो केरळात जाऊ पाहातो आहे. असे कसे चालेल? पुढली क्‍याबिनेट मीटिंग केरळाच्या पाण्यात उभे राहून घेण्याची माझी तयारी नाही!! आपल्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे सध्या केरळ पर्यटन सुरू असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियावर दणकून चालल्या आहेत. सबब तुम्हीही आता परतीच्या प्रवासाला लागा, ही विनंती!
कळावे. नाना फडणवीस.
ता.क. : केरळात पुराच्या पाण्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्याचा पूर आल्याची टीका होत आहे. परत या! नाना.

Web Title: editorial dhing tang british nandi article