योद्धा! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

सूडभावनेने धगधगणाऱ्या
अंबेच्या मुखातून उधळल्या,
सहस्रावधी संतप्त ठिणग्या,
दात-ओठ खात तिने
झटकला तिचा उसळणारा केशसंभार,
म्हणाली, ‘‘ हे देवव्रता,
चुलीत घाल तुझी ती
ब्रह्मचर्याची ढोंगी प्रतिज्ञा...
ही प्रतिज्ञा नव्हे, पळवाट आहे,
पळवाट!
तुझ्या अहंमन्य पुरुषार्थामुळे
माझे आयुष्य झाले राखेसमान,
मी सूड घेईन ह्याचा!
स्त्रैणत्वाचा अपमान करणाऱ्या
तुझा मृत्यू युद्धभूमीत येईल,
पण तो नसेल योद्‌ध्यासारखा.
तुझ्यातील पौरुषाला लागेल
वाट बघावी सूर्याच्या दिशायनाची.
तुझा मृत्यूदेखील होईल एका
किन्नराच्या हाती, आणि
तो किन्नर मी असेन!’’

अंबेने घोर तपश्‍चर्या केली,
तदपश्‍चात प्रसन्न झालेल्या
भगवान सुब्रमण्यमाने तिजला
दिली एक कमलफुलांची
आरक्‍त अमोघमाला...
सुब्रमण्यम म्हणाले : अंबे,
ही अमोघमाला जो कुणी
करील परिधान, तोच घालील
अजेय भीष्माला कंठस्नान...
तथास्तु!

पुढील जन्मात अंबेने घेतला
द्रुपदाच्यापोटी जन्म कन्येचा.
त्या कन्येने द्रुपदमहालाच्या
दारालाच टांगून ठेवली,
ती कमलफुलांची आरक्‍तमाला.
आणि नानाविध आयुधांचे
चालचलन घेतले शिकून
अफाट संघर्षाने. अथक यत्नांनी.
एका यक्षाच्या औदार्यामुळे
ह्याच शिखंडिनीने अखेर
बदलली काया, आणि
घेतले रुप शिखंडी नामक
तेज:पुंज महायोद्‌ध्याचे.

भारतीय युद्धाचे रणशिंग ऐकताच
शिखंडीने उचलले धनुष्य,
उतरवली दारावरली
कमलफुलांची अमोघमाला.
आणि उभा राहिला,
भीष्माच्या दिव्य रथासमोर.

किन्नरावतारातील शिखंडीला
पाहून भीष्म ओरडले : अरेरेरे!
संपूर्ण जगताला ज्याच्या
खड्‌गाचा भयगंड, त्या
ह्या अजेय भीष्माला
तृतीयपंथीयाशी लढावे लागणार?
शी: शी: त्यापेक्षा मरण बरे!’’
एवढे बोलून भीष्मांनी खरोखर
ठेवून दिले आपले धनुष्य
दिव्य रथाच्या कोपऱ्यात.

तेव्हा-
किंचित हसून शिखंडी म्हणाला :
देवव्रता, अखेर तुझी जीवनयात्रा
निरर्थकातीलच ठरली!
असत्याला साथ देणारे सत्यदेखील
अंतिमत: असत्यच ठरते, तसे.
स्त्रीचे हृदय आणि पौरुषाचा देह
हे समीकरण तुला कधीच
नाही समजले...
देवव्रता, ही विकृती नव्हे,
ह्याला पूर्णत्व म्हणतात!
खऱ्या पौरुषाची ढाल असते
हे पूर्णत्व...कळले?’’

...आणि मग शिखंडीच्या पाठीमागे
दडलेल्या पार्थाने सोडले
भीष्मांवर अगणित बाण.

कमलफुलांच्या अमोघ मालेचे
पुढे काय झाले ते कळले नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com