पापमुक्‍तीचा मार्ग! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

फा र्फार्पूवीची गोष्टबिष्ट नव्हे. ही दोनेक वर्षांपूर्वीचीच आहे. एक किनई दरोडेखोर होता. आता हा इसम दरवडेखोर होता की वाटमारी करणारा भुरटा ह्याबद्दल थोडेसे क्‍नफ्यूजन आहे. पण काहीही असेनाका, (हा मराठी शब्दप्रयोग आहे, जपानी नाव नव्हे!) दाखलेबाज गुन्हेगार होता इतके पुरे. आपला हा कथानायक आहे किनई, तो जो एका जंगलात राहात असे. जंगलातील वाटसरुंवर हल्ला करून त्यांचा छळ करणे आणि त्यांस लुबाडणे हा त्याचा व्यवसाय होता. एक दिवस त्या वाटेने एक ज्येष्ठ पत्रकार (म्हंजे आम्हीच) जात होते. दरोडेखोराने त्यांना (पक्षी : आम्हाला) गाठले.
‘‘पैसे काढ!,’’ दरोडेखोर डर्काळला.

‘‘मी पत्रकार आहे रे!,’’ आम्ही म्हणालो. आमच्या चेहऱ्यावर स्तंभलेखकाच्या महिनाअखेरीची अजीजी होती. (आज तारीख काय राव!) आमच्या चेहऱ्यावर विस्मय होता. पत्रकाराला का कुणी पैसे मागते? काहीतरीच ह्याचे!!
‘‘अर्रर्र...’’ त्याने अस्फुट उद्‌गार काढले. पत्रकार म्हटले की लोक सहानुभूतीने बघतात, खरे. पण दरोडेखोराच्या उद्‌गारात अनुकंपा होती. त्याच्या डोळ्यांत किंचित पाणीही तरळले. ‘गुनाहगार कू भी दिल होता हय’ हा कुठल्याशा हिंदी चित्रपटातील डायलॉग आम्हाला आठवला. आम्हीही डोळे पुसले.
‘‘ तुझ्याकडेच काही निघतात, का पहा बरं!,’’ आम्ही विक्रमादित्याचे वंशज असणार. सहजासहजी हट्ट सोडत नाही. समोर आलेल्या माणसाची सांपत्तिक स्थिती जाणून घेण्यात आम्ही वाकबगार आहो! संधी मिळताक्षणी उसनवारी करावी, हा आमचा पंचमस्तंभी बाणाच आहे.
‘‘कुठले...छे! तूच पैला! बोहनीलाच नर्पती लागली तुझ्यामुळे...,’’ दरोडेखोराने ओठांची भेदक हालचाल केली. त्यावरून त्याने आमच्या आई व बहिणींची चौकशी केल्याचे आमच्या लक्षात आले...
‘‘कशाला हे धंदे करतोस? माणसाने कसे शहाजोग असावे. सभ्यपणे उद्योगधंदा करावा...हल्ली किती ष्टार्टप निघताहेत...किंवा एखादी बरीशी नोकरी कर, आणि पोट जाळ! कळले?,’’ आम्ही. ह्या पापी जिंदगानीतून त्याची सुटका व्हावी, असा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता.
‘‘हिते आपला सेट धंदा आहे...तुझ्यासारका येकांदुसरा कंडम मानूस येतोय, पन-,’’ तो म्हणाला.
‘‘तुझ्या ह्या पापात तुझ्या आयाभैणी सहभागी होणार आहेत का? जा विचारून ये!,’’ आम्ही नीडरपणाने म्हणालो. खिश्‍यात दमडा नसलेल्या माणसासारखा शूर कुणीही नसतो. त्याने तात्काळ मोबाइलवरून आपल्या आई-बहिणीस फोन लावला. पलीकडून फारसे प्रोत्साहन मिळाले नसणार! कारण त्याने पुन्हा ओठांची भेदक हालचाल केली.
‘‘च्या**...खायला ** महा जोर करत्यात...आता स्वोच्छ कमाईचा पैसा ***...कुठून आणून **...***** ह्यांच्या..!’’ त्याची भाषाही बरीच बिघडलेली दिसत होती. (संपादकांकडे पाठवावे का? ते आम्हाला हेच ऐकवतात...) त्याला आम्ही ‘राम राम’ हा जप करायला सांगितला आणि आम्ही तिथून सटकलो.
बारा वर्षांनंतर : दरोडेखोराने जपजाप्य करून बराच पुण्यसंचय केला असेल, असे तुम्हाला वाटले का? नाही, तसे नाही!! इथेच कहानी में मोड आहे!! दरोडेखोराने पुढे डॉक्‍टरेट मिळवलीन! ‘हिंदुत्त्व : एक जीवनशैली,’ ‘रामराज्य : अर्थात अच्छे दिन’ ह्या टाइपचे दोनेक ग्रंथ लिहून तो प्रसिद्ध झाला. त्याच रस्त्यावरून आम्ही जात असताना तो मोटारीतून उतरून आला, आणि त्याने आम्हाला नमस्कार केला. आम्ही च्याटंच्याट पडलो!
‘‘काय आयडिया केलीस रे?,’’ आम्ही बावळटासारखे विचारले.
‘काय नाय...आपन कमळ पार्टी जॉइन केली नाऽऽ...’’ तो हसून म्हणाला. आम्ही गारद!
...अखेर ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याचा एकमेव उपाय’ ह्या विषयावर एक (दोनशे रुप्पय मानधनवाला) लेख लिहायला तूर्त बसलो आहो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com