चलो, अयोध्या! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : अंतिम युद्धाची.
प्रसंग : समर!
पात्रे : खणखणीत...आय मीन, राजाधिराज उधोजीमहाराज आणि त्यांचा कदीम सेवक मिलिंदोजी फर्जंद.
..........................
उधोजीराजे : (त्वेषाने प्रविष्ट होत) कोण आहे रे तिकडे?
मिलिंदोजी फर्जंद : (आरामशीर येत) बोला म्हाराज...काय पाह्यजेल?
उधोजीराजे : (संतापून) उर्मटा, आठ-दहा दिवस आम्ही परदेश मोहिमेवर काय गेलो, दरबारी रीतीरिवाज विसरलास? मुजरा राहिला त्याचे काय?
मिलिंदोजी : (जीभ चावून मुजरा करत) चुकी झाली, माफी असावी...घ्या मुजरा!
उधोजीराजे : (उदारपणे) पुन्हा अशी आगळीक घडली, तर मुंडके मारले जाईल!!
मिलिंदोजी : (चतुराईने) आपला इटली दौरा कसा झाला, म्हाराज? काय तरास तर नाय ना?
उधोजीराजे : (संशयानं) तुला रे काय ठाऊक आम्ही इटलीला गेलो होतो ते? आगाऊ कुठला!! आपले धनी कोठे जातात, ह्यावर नजर ठेवो नये!! आम्ही लगोलग दुसऱ्या मोहिमेवर निघत आहोत! तयारीला लागा!!
मिलिंदोजी : (कुतुहलानं) पुन्ना मोहीम? आता काय भरू ब्यागेत म्हाराज? कापडंच उरली न्हाईत!!
उधोजीराजे : (उसळून) काय म्हणालास? महाराष्ट्राच्या दौलतीच्या ह्या मुखत्याराला कापडं कधीपासून कमी पडायला लागली?
मिलिंदोजी : (खुलासा करत)...आपल्या परदेश प्रवासाची कापडं अजून धड वाळली बी न्हाईत म्हाराज!! आता लग्गीच दुसरी मोहीम कशी काडनार?
उधोजीराजे : (त्वेषाने) आम्ही तस्सेच जाऊ!!
मिलिंदोजी : (पुटपुटत) लई वंगाळ दिसंल!!
उधोजीराजे : (गर्जना करत) खामोश!! जातीच्या योद्‌ध्याचा खरा अलंकार म्हणजे त्याचं शस्त्र! तेवढं असली की ब्यागा-कपड्यांची काय गरज? बस हत्त्यार हवं, हत्त्यार!!
मिलिंदोजी : (चौकशी करत) कुटलं हत्त्यार घेऊ? हॉकी स्टिक, चॉपर, सळई, कांब, फरशी, तलवार, चाकू...
उधोजीराजे : (किळस येऊन) शी, शी, शी! ही कुठली अंडरवर्ल्डच्या गुंडांच्या हत्त्यारांची नावं घेतोस? शोभतं का आपल्याला हे? (अभिमानानं) अरे, ह्या मराठी दौलतीची मान हरहमेश ताठ ठेवणाऱ्या ह्या उधोजीच्या शस्त्राला अवघी दुनिया डरते!! गनिमाचे पाय लटपटतात आणि शस्त्र उगारण्याआधीच विजयश्री आमच्या गळ्यात माळ घालते!...हा इतिहास विसरलास वाटतं!
मिलिंदोजी : (आपुलकीनं) म्हाराज, म्या काय म्हंतो की, प्रवासानं दमगीर झाला असाल, न्हाई म्हटलं तरी मोठी दौड मारून आलाय तुम्ही! वाईच विश्रांती घ्या, चांगलंचुंगलं खाऊन धष्टपुष्ट व्हा, मग जावा की नव्या मोहिमेला! हे उगा आपलं ह्या घोड्यावरून, त्या घोड्यावर जान्यात काय पॉइण्ट आहे?
उधोजीराजे : (कपाळावर मूठ हापटत) मराठी दौलतीसाठी आम्हाला हे करावं लागतं, फर्जंदा!! आमचा बाणा पडला लढाऊ! शिपाईगिरी हाच आमचा धर्म आहे...तेव्हा मोहिमा उघडणं हेच आमचं कर्तव्यदेखील आहे! अयोध्येचा श्रीराम आम्हांस सादावत आहे, म्हणत आहे की, ‘ये रे ये! माझ्या घराची वीट रचून जा!’ काल अयोध्येचे महापुजारी आम्हाला स्वत: सांगोन गेले की ‘येणेचे करावे!’ प्रत्यक्ष भगवंताच्या वास्तुपूजेचं निमंत्रण आम्ही कसे नाकारू? सबब जाणे भाग आहे!
मिलिंदोजी : (समजून घेत) ते बी खरंच...लग्नकार्याला परदेशी जाता येतं, तर देवळाच्या कामाला काचकूच करून कसं चालंल म्हना!
उधोजीराजे : (भानावर येत)...ज्यास्त बकबक न करता आमचं लाडकं हत्त्यार घे बरं!
मिलिंदोजी : (शंकेनं) कुठलं? छत्री?
उधोजीराजे : (हात उगारत) चेचीन!!
मिलिंदोजी : (गोंधळून) तलवार?
उधोजीराजे : (वेडावत) असा कसा रे तू वेंधळा! आमचं लाडकं हत्त्यार म्हंजे धनुष्यबाण नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com