dhing tang
dhing tang

आम्ही लटिके न बोलू..! (ढिंग टांग)

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रेगड.
वेळ : खडाखडीची!
प्रसंग : बांका!
पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज आणि साग्रसंगीत अलंकृत सौ. कमळाबाई.
..............................

(कमळाबाईंच्या अंत:पुरात उधोजीराजे ताठ्यातच प्रविष्ट होतात...अब आगे.)

उधोजीराजे : (घुश्‍शात) आमची याद केली होतीत?
कमळाबाई : (उसासा सोडत) याद आनेके लिए तुम्हे भूलना तो पडेगा!!
उधोजीराजे : (गोंधळून) मराठीत बोला ना!
कमळाबाई : (मान खाली घालून) काय बोलू? कसं बोलू? बोलले तरी तुम्ही विश्‍वास ठेवणार आहात का?
उधोजीराजे : (मिशीवरून बोट फिरवत) ते आम्ही ऐकल्यावर ठरवू!!
कमळाबाई : (आवंढा गिळत) ह्या जगात कुणीही कुणाचं नसतं हेच खरं!
उधोजीराजे : (फिल्मी पॉज घेत) हे असं वागायला आम्हाला आवडतं असं समजू नका! पण तुम्हीच तशी वेळ आणलीत!! गोड बोलून केसानं गळा कापण्याची तुमची जुनी खोड कधी तरी अंगलट येणारच होती तुमच्या!!
कमळाबाई : (संतापाचा स्फोट होत)...आम्ही खोटं बोलून सत्ता मिळवली असं म्हणालात! मी म्हणत्ये, असं म्हणताना जीभ कशी झडली नाही तुमची!! आम्ही खोटं बोललो? आम्ही मिळवली सत्ता? सत्ता तुम्हालाच हवी होती ना? एवढं बोलता आहात तर हिंमतीनं करून दाखवा ना काहीतरी!! काही चांगलं केलं की आम्ही केलं, वाईट झालं की कमळाबाईवर पावती फाडायला सगळ्यांच्याही पुढे!! किती दिवस चालवून घ्यायची तुमची ही थेरं? खोटं बोलत्ये, खोटं बोलत्ये, खोटं बोलत्ये!!...काय हो खोटं बोलल्ये मी? उगीच आपलं काहीतरी टुमणं लावायचं? एवढी होती हिंमत तर तेव्हाच दाखवायची होती ना? सत्तत चारचौघात मला वाट्‌टेल तसं बोलता! मी म्हणून इतकी वर्षं ऐकून घेतलं, दुसरी कुणी असती तर...
उधोजीराजे : (गडबडून) खोटं बोलिलात म्हणून तर एवढं रामायण झालं!!
कमळाबाई : (फणकारून) तुम्हीच खोटं बोलता! मला खुर्चीचा मोह नाही, असं म्हणत बसलाय अजून ठाण मांडून!! आम्ही खोटं बोलतो की तुम्ही? आम्ही गेलो तर कोण तुम्हाला जवळ करणारे, पाहात्येच मी!! मग फिरा इथे तिथे टाळ्या मागत!!
उधोजीराजे : (दुप्पट कडाडत) खामोश!! ही खुर्ची आम्हाला चिकटली आहे, आम्ही खुर्चीला नाही!! एक शब्द अधिक बोललात तर...
कमळाबाई : (पदर खोचून) काय कराल? काय कराल सांगा ना!!
उधोजीराजे : (बोट रोखत) परिणाम बरे होणार नाहीत हां, सांगून ठेवतो!
कमळाबाई : (चुटकी वाजवत आक्रमकपणे) सांगा ना काय कराल?
उधोजीराजे : (मागे सरत) गाठ माझ्याशी आहे लक्षात असू द्या! वेळ आली की आपल्यासारखा वाईट माणूस नाही!!
कमळाबाई : (फुल ऑन आक्रमक...) फू:!! ऐकेल कुणी!! काय कराल ते एकदा सांगून टाका ना!!
उधोजीराजे : (डोळे वटारत) वेळ आली की कळेलच!
कमळाबाई : (कमरेवर हात ठेवत) कधी येणारे ती वेळ? आत्ताच्या आत्ता सांगा!!
उधोजीराजे : (अचानक पवित्रा बदलत) जाऊ दे ना बाईसाहेब!
कमळाबाई : (अरेरावीने) का? आता का गप्प झालात?
उधोजीराजे : (अस्वस्थपणे) अयोध्येला जाऊन आलो की बोलू!
कमळाबाई : (खुदकन हसत) अयोध्येला तुमचा पाहुणचार आमचीच मंडळी करणार आहेत! अयोध्या हे आमचं माहेरघरच आहे, हे लक्षात असू द्या! झोडून या पाहुणचार!! अयोध्येनंतर तुम्ही काय बोलणार, हे आम्हाला कळलं हो!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com