सलीम कुत्ते की अजीब दास्तान! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

डिअरम डिअर होम मिनिष्टरसाहेब, सलीम कुत्तेका बाअदब सलाम. आपली डायरेक वळख नाही, पण सलीम कुत्ता म्हटले तर आख्ख्या होल इंडियात कोण वळखत नाही? दोन-चार मुल्कांमध्ये आपला धंदापाणी चांगला चालला असून खंडणी, हापमर्डर, धमकी देणे अशी कामे इज्जतीत पार पाडत असतो. माफिया सरगना, डॉनचा राइट हॅंड, कुख्यात गुंड, मोस्ट वाँटेड असा हा सलीम कुत्ता (याने की आपण) न्यूजमधे असला की सगळ्यांना सगळे भेटते! जास्त बोलत नाही...

डिअरम डिअर होम मिनिष्टरसाहेब, सलीम कुत्तेका बाअदब सलाम. आपली डायरेक वळख नाही, पण सलीम कुत्ता म्हटले तर आख्ख्या होल इंडियात कोण वळखत नाही? दोन-चार मुल्कांमध्ये आपला धंदापाणी चांगला चालला असून खंडणी, हापमर्डर, धमकी देणे अशी कामे इज्जतीत पार पाडत असतो. माफिया सरगना, डॉनचा राइट हॅंड, कुख्यात गुंड, मोस्ट वाँटेड असा हा सलीम कुत्ता (याने की आपण) न्यूजमधे असला की सगळ्यांना सगळे भेटते! जास्त बोलत नाही...

अज्ञात ठिकाणाहून हे लेटर लिखत आहे. लेटर लिखनेका कारण येईच की अपने शीबीआय में आजकल भोत लोच्ये होरेल्ले है, ऐसा सुनने में आया. खराखोटा आपणच सांगा. शीबीआयच्या एक-दोन लंबरच्या लोकांनी काय तरी हपला-घपला केला आणि एकमेकांच्या कॉलरी धरल्या असे मला बंट्याभाई भाटी ऊर्फ सोनामुखी म्हणाला. आमचा भाटी अंडरकरंट असला तरी थोडाफार पढालिखा है. तो हातात घोडा घेऊन उभा राहिला की शेठिया लोकांची हालत पतली होते. ‘हाजमा ठीक करना हो तो भाटी का फोन काफी है’ असे त्याच्याबद्दल बोलतात. (इसीलिए उसकू सोनामुखी भी बोलते है. जाने दो.) भाटी आपला राइट हॅंड आहे. तो बोलला का ‘‘भाई सीबीआय में ऐसा ऐसा हुआ है, अभी आपुनकू डरने की जरुरत नही. खुल्लेआम घूमो...हिते कोतवालच असले धंदे करायला लागले तर आपल्यासारख्या अंडरवर्ल्डवाल्यांना कोण रोखंल?’’
मामला शीरिअस आहे, एवढे कळल्यावर आधी लेटर लिहायला घेतले. शीबीआयचा दरारा आठवून जाम खराब वाटले. कुछ भी हो मुल्क की पुलिस हमेशा उसूलवाली होनी चाहिए. एक टाइम असा होता की शीबीआयचा साहेब गाल खाजवत सामने हुबा ऱ्हायला की भले भले डॉन गळपाटत होते. (आपलं काय?) कुठलीही केस पोलिसलोकांच्या हाताबाहेर गेली की ‘सीबीआयकडे तपास द्या’ अशी बोंबाबोब सगळे पोलिटिकल लोक करत होते. आजभी वैसाही चलता है. कितीतरी पोलिटिकल लोक आज शीबीआयमुळे अंदर जाऊन आले आहेत. ‘भगवानसे मत डरो, लेकिन शीबीआयसे डरो’ असे बोलले जायचे. मलेशियातून उचलून नेलेल्या एका छोट्या डॉनने शीबीआयसमोर सरेंडर केले, नंतर आपल्या पोरांना मेसेज पाठवला की ‘‘जान गेली तरी सरेंडर करू नका बे पोट्टेहो, लईच मारतेत!’’

त्याच शीबीआयच्या लोकांनी असले धंदे सुरू केले तर आमच्यासारख्या सामान्य खंडणीवाल्यांनी जायचे कुठे? कुणाला घोडा टेकवायचा? कुणाचा गेम वाजवायचा? कुणाला वडापाव द्यायाचा? आमच्यासारख्या हातावर पोट असलेल्या कुख्यात सरगन्याबद्दल जरा तरी तरस खावी, अशी आपली रिक्‍वेष्ट आहे.
कुणाकडे आता पाच-पंचवीस पेट्या (लाख) मागायचीही लाज वाटून राहिली आहे. शीबीआयवाले कधीच खोक्‍यात (कोटीत) पोचले, तुम्ही भिकाऱ्यासारखे पेटीतच का? असे कुणी म्हटले तर आपली काय इज्जत ऱ्हायली सांगा ना! आमच्या आंडरवर्ल्डच्या धंद्यात एक उसूल आहे. जनरल पब्लिकला कधी तरास देयाचा नाही. पाकिटमारी, चिंधीचोरी सुरवातीला ठीक आहे, पण धंद्यात सेटल झालेला अंडरवर्ल्डवाला पब्लिकसाठी गणपती, गरबा, हे ते भरपूर खर्च करत असतो. साहेब, आम्ही कोणाच्या अध्यात मध्यात नाही. आपण बरे, आणि आपला घोडा बरा! ज्याला पैसे मागायचे त्यालाच टेकवावा! पण आता आमचे हे अंडरवर्ल्ड खतऱ्यात आले आहे, असे वाटू लागले आहे. कोतवालानेच चोराचा कावा साधला तर चोराने कुठे जायचे? साहेब, कुछ करो! आपका अपना. सलीम कुत्ता.

ता. क. : ह्या लोकांना टायरमधी कोण बसवणार? हा खरा सवाल आहे. वेळ भेटला तर कळवा! स. कु.

Web Title: editorial dhing tang british nandi article