न्योता! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

सकाळची वेळ होती. राजधानी दिल्लीस्थित ‘७, लोककल्याण मार्ग’ ह्या साध्याशा निवासस्थानी गर्मागर्म ढोकळ्यांवरील सुगंधित फोडणीचा वास दर्वळत होता. मोहरी-तिळाच्या फोडणीमुळे ठसका लागलेल्या राष्ट्र-कोतवाल अजितभय्या डोव्हाल ह्यांनी नाकास रुमाल लावूनच प्रधानसेवकांच्या अंत:पुरात प्रवेश केला. कोतवाल घरात शिरले, तेव्हा प्रधानसेवक अर्धमत्स्येंद्रासनाच्या पवित्र्यात होते. हे अवघड योगासन आहे. पाय कुणीकडे नेऊन मानगूट तिसरीकडे वळवायची. हाताने पायाची अंगुष्ठे पकडून स्वत:स जेरबंद करावयाचे. हे करताना आपापत: श्‍वास कोंडत असल्याने प्राणायामाचेही फायदे मिळतात. तथापि, ह्या योगासनाचा तोटा असा की पाय कुणीकडे, कंबर कुणीकडे आणि मस्तक कुणीकडे ह्या पिळदार स्थितीत साधकाच्या खालील सतरंजीचा बोळा होतो व त्याची सुते पायाच्या अंगुष्ठात सांपडून उठताना धडपडायला होते. असो.

‘‘ट्रम्पसाहेबाने माती खाल्ली साहेब..!,’’ नाकावरील रुमाल कढून कोतवाल डोव्हाल म्हणाले.
‘‘हम्फ..!,’’ क्षणार्धात प्रतिसाद आला. प्रधानसेवकांनी नेमका तेव्हाच पायाचा अंगठा धरला होता. लालबुंद चेहऱ्याने त्यांनी कोतवालास जरबेने थांबवले.
‘‘माटी खाव्या? अरे, पण कशाला?,’’ जोरदार नि:श्‍वास सोडून प्रधानसेवकांनी पृच्छा केली.
‘‘ येत्या प्रजासत्ताकाला आपल्या चित्ररथांचे प्रदर्शन पाहण्यासाठी ते येणार नाहीत...तसं त्यांनी कळवलंय!,’’ कोतवाल डोव्हाल म्हणाले.
‘‘असा कसा च्यालेल? मी स्वत:नी त्यांना न्योता दिला होता ने..!,’’ प्रधानसेवकांनी कोतवालास जामले. जणू काही ही आपलीच चूक आहे, असा चेहरा करून कोतवाल डोव्हाल थोडा वेळ उभे राहिले.
‘‘हो, पण तेव्हा ते ‘येतो’ म्हणाले होते, आता चक्‍क येणार नाही असं म्हणतायत!,’’ कोतवालाने तक्रार केली.

‘‘आ तो रडीना डाव छे!! आधी येतो सांगायच्या, आता नाय येत म्हणायच्या, हे अमरिकन लोकांना सोभते काय?,’’ प्रधानसेवक खवळले. ट्रम्पसाहेबाला बोलावून त्यास पायाचे अंगठे जुळवून, त्यातून हात घालून कान पकडून उभे करण्याची शिक्षा करावी, असे त्यांना वाटत होते. पण त्यांनी स्वत:स आवरले.
‘‘ऐन वेळी आता दुसरा पाहुणा कोण शोधून आणायचा? मी सगळी तयारी केली होती. हॉटेल बुक केलं होतं. ताजमहालची ट्रिप अरेंज केली होती. शाळकरी मुलांना त्यांच्या स्वागतासाठी तयार केलं होतं. बटर चिकनची ऑर्डरही दिली होती. पण ऐनवेळी ह्यांनी-’’ कोतवाल डोव्हाल रडकुंडीला आले होते.
प्रधानसेवकदेखील विचारात पडले. पद्‌मासनात मांडी घालून थोडावेळ बसले तर हा तिढा सुटेल, अशी शक्‍यता होती. पण पद्‌मासन हे चक्रव्यूहासारखे असते. घालणे एकवेळ जमते, पण सुटणे अवघड! त्यांनी विचार सोडला.

जपानचे मित्र शिंजोसान आबे ह्यांना धरून आणावे काय? जुना स्नेह आहे. ऐनवेळी बोलावले तर वृक्षारोपणालासुद्धा येतील! पण एकाच माणसाला किती वेळा बोलवायचे? शिवाय ते आले की बुलेट ट्रेनचा विषय निघणार...त्यापेक्षा नकोच!
‘‘पण डोनाल्ड इज ए गुड फ्रेंड ऑफ माइन...अमरिकामधी मी त्यांना ठेपला अने फाफडा दिला होता! नाऊ व्हाय ही इज नॉट कमिंग?,’’ प्रधानसेवक अविश्‍वासाने म्हणाले. हल्ली ते इंग्रजीचा सप्पाटून सराव करू लागले आहेत, हे हुशार कोतवाल डोव्हाल ह्यांच्या लक्षात आले.
‘‘न...नकोच म्हणाले ते!,’’ मान हलवत कोतवालाने सांगितले.
‘‘पण रीझन काय? का नाय येत?,’’ प्रधानसेवकांनी खोदून खोदून विचारले. अखेर कोतवाल डोव्हाल ह्यांचा नाइलाज झाला.
‘‘ आता हे असंच होणार...देशोदेशीचे पाहुणे इथे येण्याचं टाळणार! हे आपल्या सततच्या परदेश दौऱ्यांमुळे घडलंय!,’’ कोतवाल डोव्हाल ह्यांनी स्पष्ट काय ते सांगून टाकले, ‘‘ विवेकानंदांची पुस्तकं भेट म्हणून देणं आणि तुमच्या मिठ्या महागात पडू लागल्या आहेत...क्‍या करें?’’
...आणि येथे प्रधानसेवकांनी शवासन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com