वनमंत्री वाचवा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

मु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या अथवा पाहिल्या (अथवा वाचल्या) असतील. स्वातंत्र्योत्तर काळात अशा किमान दीडेक हजार प्रकारच्या वाचवा मोहिमा निघाल्या, त्यातील काही वाचल्या, म्हंजे यशस्वी झाल्या, तर काही फसल्या. ‘झाडे वाचवा’ ह्या मोहिमेअंतर्गत चिपको आंदोलन झाले. पण ह्या चिपको आंदोलनाचा इतका प्रसार शहरभागातही झाला की पुढे त्याचे रूपांतर ‘मी टू’ आंदोलनात झाले असे म्हंटात. खरे खोटे देव जाणे. पण ते जाऊ दे. ‘कासवे वाचवा’ ह्या मोहिमेला कूर्मगतीने का होईना, पण जबरी प्रतिसाद मिळाला.

मु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या अथवा पाहिल्या (अथवा वाचल्या) असतील. स्वातंत्र्योत्तर काळात अशा किमान दीडेक हजार प्रकारच्या वाचवा मोहिमा निघाल्या, त्यातील काही वाचल्या, म्हंजे यशस्वी झाल्या, तर काही फसल्या. ‘झाडे वाचवा’ ह्या मोहिमेअंतर्गत चिपको आंदोलन झाले. पण ह्या चिपको आंदोलनाचा इतका प्रसार शहरभागातही झाला की पुढे त्याचे रूपांतर ‘मी टू’ आंदोलनात झाले असे म्हंटात. खरे खोटे देव जाणे. पण ते जाऊ दे. ‘कासवे वाचवा’ ह्या मोहिमेला कूर्मगतीने का होईना, पण जबरी प्रतिसाद मिळाला. उदाहरणार्थ, कोकण किनारपट्टीवर विशिष्ट जातींची कासवे (हळूहळू) किनाऱ्यावर येऊन खड्डेबिड्डे खणून त्यात अंडीबिंडी घालून पुन्हा समुद्रात-बिमुद्रात (हळूहळू) निघून जातात. ती अंडी सांभाळत बसण्याचे जिकिरीचे काम पर्यावरणवाद्यांना करावे लागते. पूर्वीच्या काळी उन्हाळ्यात गच्चीवर पापडबिपड वाळत घातल्यावर कावळ्या-बिवळ्यांनी टोचा मारू नयेत, म्हणून पाळत ठेवावी लागत असे. त्यातलाच हा प्रकार! खाडीच्या मुखाशी असलेल्या मॅनग्रूव्हज ऊर्फ तिवरे ऊर्फ खारफुटी ऊर्फ कांदळवने वाचवण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करण्यात आले. पण व्यर्थ! कांदळवनांना चिपकायला जायला कोणी तयार नव्हते!! ‘गिधाडे वाचवा’ अशीही मोहीम मध्यंतरी सुरू करण्यात आली होती, पण गिधाडे वाचवण्यासाठी जे काही करावे (पक्षी : मरावे) लागते, ते करण्याची स्वार्थी माणसाची तयारी नव्हती. अखेर त्या मोहिमेचेही लचके तोडण्यात आले... जाऊ दे.

तथापि, ‘वाघ वाचवा’ ह्या मोहिमेत मात्र महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे. विशेषत: चारेक वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या निबीड अरण्यात फार तर काही डझन वाघ जीव मुठीत धरून राहात होते. कारण त्यांना काही खायलाच मिळत नव्हते. कारण तेवढ्यात ‘काळवीट वाचवा’ ही मोहीम सुरू झाल्याने वाघांची उपासमार होऊ लागली. हरणे मारायची नाहीत, मग रानडुकरे तरी मारू, असा काही वाघांनी सुज्ञ विचार केला; परंतु तोवर ‘डुकरे वाचवा’ ह्या मोहिमेची मुहूर्तमेढ रचली गेली!! तथापि, तरीही गेल्या चारेक वर्षांत आपल्या वन खात्याने जंगलात हिंडून हिंडून वाघांची संख्या बेमालूम वाढवली. इतकी की वाघांना जंगलात जागा उरली नाही. आजमितीस गावात शिरून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांच्या आणि वाघांच्या बातम्या दर एक दिवसाआड येऊ लागल्या आहेत, हा त्याचाच पुरावा होय.

पांढरकवड्याच्या नरभक्षक अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचा खून झाल्यानंतर (होय, खूनच तो!) तिची दोन बछडी अनाथ झाली होती. त्यांनाही खतम करण्याचा विडा महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांनी उचलला असून, तो विडा संपण्याच्या आत वनमंत्र्यांनाच उचलावे, अशी शिफारस दिल्लीतील सुप्रसिद्ध पर्यावरणप्रेमी सुश्री मेनकाबाई ह्यांनी केली असून, येत्या अधिवेशनात वनमंत्र्यांच्या विरोधात हाकारे उठणार अशी चिन्हे आहेत. त्यातच चंद्रपूर येथे रेल्वेगाडीखाली येऊन मृत झालेली वाघाची तीन बछडी सापडल्याने संभ्रम निर्माण झाला. सदर बछडी ही अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचीच होती, अशीही खबर पसरली. साहजिकच उचललेला विडा संपवून वनमंत्री लोटाभर पाणी पीत आहेत, असा गैरसमज वाऱ्यासारखा पसरला. तथापि, अवनीचे बच्चे अजूनही सुरक्षित असल्याचे समजते. अशा परिस्थितीत ‘वनमंत्री वाचवा’ मोहिमेला जोर चढला असून, येत्या अधिवेशन काळात योग्य ती उपाययोजना न केल्यास वनमंत्र्यांची खुर्ची जाण्याचे भय काही वनप्रेमी व्यक्‍त करीत आहेत. मुलांनो, मग वाचवणार ना आपल्या वनमंत्र्यांना? वाचवणार ना त्यांची खुर्ची? कारण वरील सर्व वाचवा मोहिमांच्या मुळाशी ‘खुर्ची वाचवा’ हीच मोहीम असते, हे बेसिक लक्षात ठेवा! कळले ना? आता लागा बरे कामाला!!

Web Title: editorial dhing tang british nandi article