स्वप्न की वास्तव? (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

बेटा : (जबरदस्त एण्ट्री घेत) टाडाऽऽऽ...टाडा टाडा टाडाऽऽऽ...!!!
मम्मामॅडम : (हर्षभरित होत्साती) आओ मेरे लाल!! जियो मेरे लाल!!.. तुझ्यासाठी काय करू? तुला कुठे कुठे ठेवू?
बेटा : (खुशीत) क्‍यों दिखाया की नहीं जलवा!!
मम्मामॅडम : (दोन्ही गालांवर हात ठेवत) खर्रर्रच! मला कित्ती आनंद झालाय म्हणून सांगू?
बेटा : (फिल्मी अंदाजात) मां, तुम्हारा हर एक सपना मैं पूरा करूंगा!!
मम्मामॅडम : (कौतुकानं) कुठून आणलंस रे एवढं बळ आणि शहाणपण?
बेटा : (अमिताभ स्टायलीत) जिसने अपने मां को सालोंसाल हर दिन, हर वक्‍त, हर पल-
मम्मामॅडम : (घाईघाईने) जाऊ दे ते! ये दिन देखने के लिए तुम्हारी मां तरस रही थी, बेटा!
बेटा : (सहजपणे खिशातून गाजर काढून खात) आय नो, आय नो! मुझे पता है, मां! ये लो, तुम भी खा लो!!
मम्मामॅडम : (गोंधळून) हे काय आहे?
बेटा : (कुरुम कुरुम खात) खुशी के गाजर!!
मम्मामॅडम : (खोट्या रागाने) काहीतरीच तुझं! खा तूच!! मी आज तुझ्यासाठी छान पिझ्झा करणार आहे!! माझं टेन्शन दूर झालं!!
बेटा : (दिलासा देत सहजतेनं) गेली किती तरी वर्षं तुम्हाला मी हेच सांगत होतो की बुवा, चिंता मत करो, मैं हूं ना!! मैं हूं ना... पण कोणीही विश्‍वास ठेवला नाही!! आता दिसतंय ना मी काय करून दाखवलं आहे ते?
मम्मामॅडम : (जावळातून हात फिरवत) लेकिन मुझे तुमपर पूरा भरोसा था!! आपल्या सगळ्या नेत्यांना मी सांगत असे, थोडं थांबा, मग बघाच चमत्कार!!
बेटा : (केसातून स्टायलीत हात फिरवत) पब्लिकनं मला पप्पू ठरवलं, त्यानं एक बरं झालं... ‘कमळ’वाला शत्रू बेसावध झाला!!
मम्मामॅडम : (संतापाने) नतद्रष्ट कमळवाले मेले!! नाव काढू नकोस त्यांचं!! हिंदी पिक्‍चरच्या व्हिलनप्रमाणे त्यानंच आपला खेळ उद्‌ध्वस्त केला! पण आमच्या हिरोनं शेवटी बदला घ्यायचा तो घेतलाच!! हो की नाही?
बेटा : (किंचित हसत) हिरो म्हंजे मीच... ना?
मम्मामॅडम : (कवतिकानं) दुसरं कुणी दिसतंय का आसपास? आता सगळे भराभरा येतील, आघाडी करू या म्हणून सांगत!! आपले जुने कार्यकर्तेसुद्धा सकाळपासून चकरा मारायला लागलेत! तेव्हा सांगत होते की माझ्या मुलावर विश्‍वास ठेवा, नाही ऐकलंन!! बघतेच मी आता त्यांना!!
बेटा : (पोक्‍तपणे) असं नको करूस मम्मा! शेवटी काहीही झालं तरी आपल्या मित्रांची आणि आपली विचारधारा एकच आहे! ज्येष्ठांचा आदर करूनच आपण आपलं राजकारण पुढे नेऊ!!
मम्मामॅडम : (प्रेमळपणे) किती परिपक्‍व झाला आहेस तू?
बेटा : (नम्रतेनं) हा देशसुद्धा मला कमळमुक्‍त किंवा मोदीमुक्‍त करायचा नाहीए मम्मा! मोदी अंकलकडून मी कितीतरी शिकलो!! मी त्याबद्दल त्यांचा कृतज्ञ आहे!! मागल्या खेपेला त्यांना मिठी मारून हेच सांगायचं होतं मला!!
मम्मामॅडम : (अलाबला घेत) यू आर अ रिअल जंटलमन इन पॉलिटिक्‍स!!
बेटा : (भविष्यवाणी उच्चारत) ये तो सिर्फ झांकी है, पिक्‍चर अभी बाकी है!!
मम्मामॅडम : (चक्रावून) म्हणजे?
बेटा : (गूढ स्मित करत) पुढल्या वर्षीच्या इलेक्‍शनमध्येही मी सगळ्यांना मागे टाकणार आहे! बस, तुम देखते रहना!!
मम्मामॅडम : (अभिमानाने) खात्री आहे मला... तू तसं करशीलच!!
बेटा : (अचानक आठवून) मम्मा एकदाच फक्‍त मला चिमटा काढ ना... हे सगळं खरंच घडतंय ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com